
डॉ. मनोज माळी, डॉ. सचिन महाजन
हळद पिकामध्ये (Turmeric crop) शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शेणखतातून विविध तणवर्गीय वनस्पतींचे बी शेतात येते. या तणवर्गीय वनस्पती विविध कीड-रोगांसाठी यजमान वनस्पती म्हणून कार्य करतात. त्यामुळे हळद पिकावर कीड-रोगांचा लवकर प्रादुर्भाव होतो. त्यासाठी तणांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे.
हळद लागवडीपासून ६०, ९० आणि १२० दिवसांच्या अंतराने तणांच्या तीव्रतेनुसार मजुरांच्या मदतीने निंदणी करून घ्यावी. तणनियंत्रणासाठी हळद उगवणीनंतर कोणतेही तणनाशक फवारू नये. तणनाशकांच्या वापरामुळे पिकाच्या शारीरिक क्रियांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. परिणामी उत्पादन घट येऊ शकते.
फुलांचे दांडे न काढणे ः
शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर हळदीला फुले येण्यास सुरुवात होते. जातीपरत्वे फुलांचे दांडे येण्याची संख्या कमी जास्त असते. हळद पिकास फुले येणे हे शाकीय वाढीचा कालावधी संपून कंद सुटण्यास सुरुवात होण्याचे लक्षण आहे. फुलांचे दांडे तसेच झाडावर ठेवल्यास उत्पादनावर कोणत्याही प्रकारे घट येत नाही.
सामान्यपणे फुलांचे दांडे काढण्याची प्रक्रिया अति खर्चिक आहे. तसेच फुलांचे दांडे येणे ही न संपणारी प्रक्रिया आहे. एकदा दांडे काढल्यानंतरही ते नव्याने येतच राहतात. फुले काढताना हळदीच्या खोडाला इजा होण्याची शक्यता असते. इजा झालेल्या भागातून दुय्यम बुरशींचा पिकामध्ये शिरकाव होऊन कंदकुजीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे हळदीला आलेली फुले काढू नयेत.
कीड, रोगनियंत्रण ः
सद्यःस्थितीतील हवामान पाहता हळद पिकावर कंदमाशी, खोडकिडा आणि कंदकुज, करपा इत्यादी कीड, रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
१) कंदमाशी ः
- नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी प्रादुर्भावीत क्षेत्रामध्ये किमान २ ते ३ वर्षे सामूहिकरीत्या उपाययोजनांचा अवलंब करावा.
- उघडे पडलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते. त्यामुळे उघडे पडलेले कंद वेळोवेळी मातीने झाकून घ्यावेत. हळदीची भरणी वेळेवर करावी.
रासायनिक नियंत्रण (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
- क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि
- माती किंवा प्लॅस्टिकच्या पसरट भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम अधिक १ लिटर पाणी मिसळून आमिष तयार करावे. ही भांडी हेक्टरी सहा या प्रमाणे शेतामध्ये ठराविक अंतरावर ठेवावीत. या मिश्रणातून ८ ते १० दिवसांनी विशिष्ट उग्र वास येतो. या वासाकडे कंदमाशा आकर्षित होऊन, त्यात पडून मरतात. कंदांचे नुकसान करण्याअगोदरच कंदमाशा मरत असल्याने विशेष प्रभावी उपाययोजना आहे.
(ॲग्रेस्को शिफारस आहे.)
२) खोडकीड ः
- निंबोळी तेल ५ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- प्रकाश सापळे एकरी १ याप्रमाणे लावावेत. या सापळ्यांमध्ये किडीचे प्रौढ आकर्षित होतात. त्यांना नष्ट करावे.
३) कंदकुज, करपा नियंत्रण ः
- रोगग्रस्त पाने वेचून नष्ट करावीत.
(फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
- मॅन्कोझेब २ ते २.५ ग्रॅम किंवा
- कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ते ३ ग्रॅम
जास्त दिवस धुके राहिल्यास १५ दिवसांच्या अंतराने पीक सात महिन्याचे होईपर्यंत आलटून-पालटून फवारणी करावी.
४) कंदकूज ः
शेतामध्ये अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वेळोवेळी चर काढून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
- डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४
- डॉ. सचिन महाजन, ९४२११ २८३३३
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत
हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.