Cotton Dust Mites : साठवणीतील कापसात वाढतात ‘डस्ट माइट्‍स’

कापूस साठवलेल्या घरामध्ये किंवा गोदामामध्ये काही कालावधी धूळ जमा होते. या धुळीमध्ये कोळी ही कीड वाढू लागते.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

डॉ. बाबासाहेब फंड, डॉ. विश्‍लेश नगरारे, डॉ. शिवाजी ठुबे, डॉ. वाय. जी. प्रसाद

Cotton News : वेचणीनंतर कापूस दीर्घकाळ साठवला जातो. अशा कापसाची हाताळणी केल्यामुळे त्वचेला खाज येणे, अंगावर पुरळ येणे, श्‍वसनासाठी त्रास होणे अशा अनेक तक्रारी शेतकरी, शेतमजूर व जिनिंग मिलमधील कामगारांकडून केल्या जातात.

विशेषतः कापूस हंगाम (Cotton Season) संपल्यानंतर साठवण गृहातील अथवा गोदामांतील कापूस हाताळणीमुळे ॲलर्जी झालेल्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे.

कापूस साठवलेल्या घरामध्ये किंवा गोदामामध्ये काही कालावधी धूळ जमा होते. या धुळीमध्ये कोळी (dust mites) ही कीड वाढू लागते. ही कीड आकाराने सूक्ष्म असून, उघड्या डोळ्यांनी दिसत नाही.

कापूस साठवणीचा काळ जितका जास्त तितकी ‘डस्ट माइट्‍स’ची पैदास वाढत जाते. उभ्या पिकामध्ये येणाऱ्या बहुतांश किडीबाबत शेतकरी बऱ्यापैकी जागरूक असून, त्याविषयी सखोल अभ्यास झाल्याने नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना उपलब्ध आहेत.

मात्र काढणी पश्‍चात किंवा साठवणीतील धूळ कोळीसंदर्भात नियंत्रणविषयक माहिती उपलब्ध नाही. जगभरात साठवणूक केलेल्या कापसात वाढणाऱ्या जवळपास २२ वेगवेगळ्या प्रकारच्या ‘डस्ट माइट्‍स’ प्रजातींची नोंद आहे.

Cotton
Cotton Production : भारताचे कापूस उत्पादन ३१३ लाख गाठींपर्यंत घटले

...ही लक्षणे दिसतात

१) ‘डस्ट माइट्‍स’च्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना अंगाला खाज येणे, अंगावर पुरळ किंवा गांध्या येण्याची लक्षणे दिसून येतात. -व्यक्तीच्या संवेदनशीलतेनुसार येणारी खाज मध्यम ते अधिक तीव्र स्वरूपाची असू शकते.

२) कोळीच्या संपर्कात आल्या नंतर काही तासांतच खाज येण्यास सुरुवात होते. त्वरित उपचार न घेतल्यास साधारणत: १२ ते २४ तासांत खाजेचे रूपांतर मोठ्या पुरळांमध्ये होऊ शकते.

३) सामान्यतः शरीराचा न झाकलेल्या भागावर (उदा. तोंड, मान, हात इ.) लवकर प्रादुर्भाव जाणवतो. जास्त काळ संपर्क आल्यास खांदे, पाठ आणि कधी कधी संपूर्ण शरीरावर सुद्धा ही लक्षणे दिसू लागतात.

कोळीची पैदास रोखण्यासाठी उपाययोजना

१) कापूस साठवण केलेल्या गोदामामध्ये स्वच्छता राखावी. कारण धूळ साठल्यास त्यामध्ये ‘डस्ट माइट्‍स’ची पैदास होते.

२) साठवणूक केलेला कापूस हाताळताना अंगभर कपडे घालावेत. हातमोजे, गॉगल, मास्क इ. चा वापर केल्यास शरीराच्या उघड्या भागांवर ‘डस्ट माइट्‍स’चा संपर्क होणार नाही.

३) दरवर्षी नवीन कापूस साठवण्याअगोदर निर्जंतुकीकरण करावे. त्यासाठी घरात नेहमी वापरल्या जाणाऱ्या व चांगल्या कंपनीच्या सॅनिटायझर घटकात बुडवलेल्या ओल्या कापडाने जमिनीचा पृष्ठभाग आणि भिंती पुसून स्वच्छ कराव्यात.

त्यानंतर प्रोपोक्सर (२० ईसी) २५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे संपूर्ण गोदामात अथवा साठवणगृहात फवारणी करावी.

Cotton
Kesar Mango : सोलापूर जिल्ह्यातील हवामान केशर आंब्यासाठी पोषक

४) वरील उपाय केल्यावरही साठवलेल्या कापसात काही अंशी ‘डस्ट माइट्‍स’ची पैदास झाली असेल तर प्रोपोक्स (२० ईसी) २५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे एखादी फवारणी करावी. फवारणीमुळे कापसातील ओलावा वाढू नये, यासाठी फवारणीचे द्रावण कमीत कमी वापरावे.

५) फवारणीवेळी सर्व सुरक्षा साधनांचा वापर करावा. उदा. जॅकेट, हातमोजे, मास्क, गॉगल, गम बूट, इ.

६) फवारणीनंतर किमान २४ ते ४८ तास गोदामात जाणे टाळावे, अन्यथा तेथे जाणाऱ्या व काम करणाऱ्या मजुरांना/ व्यक्तींना श्‍वासाद्वारे विषबाधा होऊ शकते.

७) गोदामात/ साठवण गृहात हवा खेळती राहून कीटकनाशकाचे अवशेष निघून जाऊ देण्यासाठी खिडक्या दारे उघडी ठेवावीत. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि हवा आतमध्ये खेळू द्यावी.

८) दीर्घकाळ कापूस साठवून न ठेवता कापसाला योग्य बाजारभाव मिळताच वेळेत विक्री करावी.

ॲलर्जी नियंत्रणासाठी उपाययोजना ः

१) साठवलेला कापूस हाताळणीनंतर ताबडतोब अंगातील कपडे बदलावेत आणि गरम पाण्याने स्वच्छ अंघोळ करावी.

२) वापरलेले कपडे गरम पाण्यात बुडवून स्वच्छ धुवावेत. कडक उन्हात वाळवावेत.

३) साठवणूक केलेला कापूस हाताळताना ‘डस्ट माइट्‍स’मुळे अनवधानाने इजा झाल्यास/ किंवा वर नमूद केल्याप्रमाणे लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यावर योग्य ते उपचार करून घ्यावेत.

४) उपचारासाठी टाळाटाळ केल्यास गंभीर अपाय होण्याची शक्यता असते.

डॉ. बाबासाहेब फंड, ७५८८७५६८९५ (केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com