सामान्य सल्ला
किमान तापमानात (Minimum Temperature) घट होण्याची शक्यता असल्याने कमी तापमानाचा पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी भाजीपाला पिके, (Vegetable Crop) रोपवाटिका (Nursery) तसेच बागायती पिकांना संध्याकाळच्या वेळेस हलके पाणी द्यावे जेणेकरून जमीन उबदार राहण्यास मदत होईल.
विशेष सल्ला
वाढत्या थंडीपासून कोंबड्यांचे संरक्षण करण्यासाठी शेडमध्ये रात्रीच्या वेळी गरजेनुसार बल्ब लावावेत. शेडभोवती पडदे गुंडाळावे.
मोहरी
वाढीची ते फुलोरा अवस्था
मोहरी पिकामध्ये मावासारख्या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी वरीलप्रमाणे फवारणी करावी.
लागवडीनंतर एक महिन्यांनी नत्र खताची मात्रा १ किलो युरिया प्रति गुंठा क्षेत्र याप्रमाणे द्यावी.
मिरची
वाढीची ते फुलोरा अवस्था
मिरची पिकाला फुले धरण्याच्या वेळी नत्र खताची दुसरी मात्रा प्रति रोप ३ ग्रॅम युरिया या प्रमाणे द्यावी.
ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन करताना, पिकाच्या कालावधीकरिता एकूण १५ समान हप्त्यामध्ये विद्राव्य खते एक आठवड्याच्या अंतराने द्यावीत.
पुनर्लागवडीनंतर १५ दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे खते देण्यास सुरुवात करावी. यासाठी १९:१९:१९ हे विद्राव्य खत ६.५ किलो आणि युरिया २ किलो प्रति हप्ता प्रति १० गुंठे क्षेत्रासाठी वापरावे.
वांगी
वाढीची ते फुलोरा अवस्था
वांगी पिकामध्ये जिवाणूजन्य तसेच बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. जिवाणूजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी रोगग्रस्त रोपे मुळांसहित उपटून स्वच्छ करून खोडाजवळ आडवा काप द्यावा.
कापलेला भाग लगेच स्वच्छ पाणी भरलेल्या पारदर्शक ग्लासमध्ये धरल्यास दुधाळ रंगाचा स्त्राव बाहेर येताना दिसतो. तर बुरशीजन्य मर रोगामध्ये जमिनीखालील खोडाचा भाग वाळून तपकिरी रंगाचा होतो आणि मुळे कुजतात.
जिवाणूजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोपे त्वरित उपटून नष्ट करावीत. प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये ३ वर्षांपर्यंत वांगी कुळातील पिकांची लागवड करणे टाळावे. लागवडीसाठी रोग प्रतिकारक जातींची निवड करावी.
बुरशीजन्य मर रोगाच्या नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावण तयार करून रोपांच्या बुंध्याशी आळवणी करावी.
पालेभाज्या पिके
पेरणी
माठ आणि कोथिंबीर लागवड क्षेत्रामध्ये २०० ते २५० किलो आणि मुळा लागवड क्षेत्रामध्ये १०० किलो चांगले कुजलेले शेणखत आणि १५:१५:१५ हे खत ४ किलो प्रति गुंठा या प्रमाणात द्यावे.
माठ, कोथिंबीर बियाण्याची दोन ओळींत २० ते २५ सेंमी तर मुळ्याची ४५ ते ६० सेंमी अंतर ठेवून पेरणी करावी.
पेरणी टप्प्याटप्प्याने आठवड्याच्या किंवा १५ दिवसांच्या अंतराने करावी.
(ॲग्रेस्को शिफारस आहेत.)
हळद
पक्वता
हळदीचे गड्डे पक्व झाल्यावर हळदीची पाने पिवळी पडून सुकू लागतात आणि जमिनीवर लोळतात. हे हळद पीक पक्व झाल्याचे लक्षण आहे. पक्व कंदाची काढणी करावी.
काढणीनंतर कंद व हळकुंडांची प्रतवारी करावी.
हळद शिजवून ताडपत्रीवर सिमेंट कॉंक्रीटच्या खळ्यावर वाळविण्यासाठी पसरून ठेवावी. हळद वाळविण्यासाठी १० ते १५ दिवसांचा कालावधी लागतो.
चवळी
वाढीची अवस्था
चवळी पिकामध्ये मावा या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. ही कीड कोवळ्या शेंड्यावर पानाच्या खालच्या भागातील रस शोषून घेते. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. तसेच रस शोषण करताना कीड मधासारखा गोड चिकट द्रव स्त्रवते. त्यामुळे त्याजागी काळ्या बुरशीची वाढ दिसून येते.
नियंत्रणासाठी, (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १.२ मिलि किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिलि
०२३५८ - २८२३८७,
८१४९४६७४०१
(ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.