Cyclone Remal
Cyclone RemalAgrowon

Cyclone Remal : रेमल चक्रीवादळाचा कहर; कोलकात्यात दाणादाण, रेल्वे-विमानसेवा विस्कळीत

Cyclone Remal in Kolkata : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले रेमल चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर रविवारी (ता.२६) रात्री धडकले. याचा फटका पश्चिम बंगाल किनारपट्टीवर दिसत असून येथील किनारपट्टी भागातील १ लाख १० हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आले आहे.

Pune News : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले रेमल चक्रीवादळ रविवारी (ता.२६) रात्री बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले. येथे ताशी १३५ किमी वेगाने वारे वाहताना मुसळधार पाऊस झाला. यामुळे घरे आणि शेतात पावसाचे पाणी शिरले. तर किनारपट्टी भागातील १ लाख १० हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आले असून येथील रेल्वे-विमानसेवा विस्कळीत झाली आहे. तसेच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनासह सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

विमानसेवा २१ तासांसाठी बंद

रेमल चक्रीवादळामुळे कोलकाता आणि दक्षिण बंगालमधील हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली. पूर्व आणि दक्षिण पूर्व रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या असून येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा २१ तासांसाठी बंद करण्यात आली आहे. यामुळे कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ३९४ उड्डाणे प्रभावित झाल्याचे विमानतळ प्रशासनाने रविवारी सांगितले होते. तर सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून विमानसेवा सुरू होईल असा दावा देखील विमानतळ प्रशासनाने केला होता. यादरम्यान कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील कामही बंद करण्यात आले होते.

Cyclone Remal
Cyclone Michaung : ‘मिचाँग’चा धुमाकूळ ! चक्रीवादळमुळे आंध्रातील १.३० लाख एकरमधील पीक पाण्याखाली

वाऱ्याचा ताशी वेग १३५ किमी

पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर रेमल धडकल्यानंतर वाऱ्याचा ताशी वेग १३५ किमी होता. यामुळे मोंगलाच्या नैऋत्य-पश्चिम जवळ सागर बेट आणि खेपुपारा दरम्यान मुसळधार पावसामुळे घरे आणि शेतात पाणी शिरले. तर कोलकात्यातील बिबीर बागान परिसरात मुसळधार पावसामुळे भींत कोसळून एक जण जखमी झाला.

मोदींनी घेतला आढावा

रेमल चक्रीवादळाचा फटका पश्चिम बंगाल किनारपट्टी भागाला बसला असून येथे वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. यामुळे किनारपट्टी भागातल्या १ लाख १० हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आल आहे. रेमल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील स्थितीचा आढावा घेतला आहे.

Cyclone Remal
Cyclone Michaung : ‘मिगजौम’ चक्रीवादळ पूर्व किनाऱ्याला धडकले

मुसळधार पावसाची हजेरी

बांग्लादेशमध्ये रेमल चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे किनाऱ्यालगत असणाऱ्या शेत आणि सखल भाग जलमय झाला. घरांची छत उडाली, विजेचे खांब तुटले आणि अनेक भागात झाडे उन्मळून पडली. कोलकात्याला लागून असलेल्या सखल भागातील रस्ते आणि घरे पाण्याखाली गेली.

IMD ने अलर्ट जारी केला

भारतीय हवामान विभागाकडून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर ईशान्य भारतातील अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. चिरांग, गोलपारा, बक्सा, दिमा हासाओ, कचार, हैलाकांडी आणि करीमगंज जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच धुबरी, बोंगाईगाव, बारपेटा, नलबारी जिल्ह्यासह ११ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मेघालयातील शाळा बंद

मेघालय सरकारने लोकांना आपत्कालीन किट तयार करण्याचा सल्ला दिला असून अनावश्यक प्रवास टाळा आणि हवामानाच्या विविध इशाऱ्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. त्रिपुरा सरकारने २७ आणि २८ मे रोजी सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोलकाता-अगरतळा मार्गावरील विमानसेवा सोमवारी सकाळपर्यंत स्थगित केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com