दिवाळीत शेतकरी जात्यात - सुपात

यंदा ऑक्टोबरच्या २० तारखेपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज १ जून २०२२ ला वर्तविण्यात आला होता. अंदाजासारखा पाऊस पडला.
Farmers Diwali
Farmers DiwaliAgrowon

यंदा ऑक्टोबरच्या २० तारखेपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज १ जून २०२२ ला वर्तविण्यात आला होता. अंदाजासारखा पाऊस (Heavy Rainfall) पडला. मिरगाला पाऊस पडल्यावर अनेक ठिकाणी सोयाबीनची पेरणी (Soybean Sowing) झाली. पेरावं तर लागतंयच. सोयाबीनचे पीक (Soybean Crop) साधारत: तीन ते साडेतीन महिन्यांत येते.

ज्यांची पेरणी लवकर झाली त्यांचा लई पचका झाला. ज्यांची जूनच्या शेवटी ३० तारखेला पेरणी झाली ते थोडे शाबूत राहिले. सांगायचा मुद्दा हा, की पावसाचा अंदाज नजरअंदाज करून शेतकऱ्‍यांना फटका बसला. म्हणून काही शेतकरी सोयाबीन काढताना जात्यात भरडले अन् काही जण सुपात राहिले.

Farmers Diwali
Crop Damage : नुकसानीचे क्षेत्र २० हजार हेक्टरवर जाण्याचा धोका

पाऊस लई सळवू लागला. एका क्विंटलचे ४००० ते ४५०० रुपये एका सोयाबीनच्या बॅगला काढायलाच गेले. मळणीयंत्रातून ६० ते ६५ किलोग्रॅमची थैली १५० रुपयांना किंवा कमीअधिक दामाला हातोपाती काढावी लागली. आता सोयाबीनचा भाव ४५०० ते ५००० हजार क्विंटल आहे. दिवाळीत जर तेल जास्त लागत असेल तर तेल उत्पादकांनी सोयाबीनला भाव द्यायला काय हरकत आहे? इकडे शेतकऱ्‍यांचे दिवाळीत दिवाळं काढायचं अन् वरून १०० रुपयांत शिधावाटप करायचा. आधीच पावसाचा धिंगाणा अन् वरून यांचा मदतीचा दिखावा. ‘काळ आला धावून अन् सोंग गेलं सजून’ हे काळोन् काळ अनुभवाचे आहे.

Farmers Diwali
Crop Damage Compensation : कळंब तालुक्यात ४८ गावांत मदतवाटप रखडले

खापराच्या दिव्यात पसा - पसा तेल टाकून शेतकऱ्‍यांनी दिवे कशाला पेटवायचे? गेल्या वर्षी उन्हाळ्यात सोयाबीनचा भाव ७००० ते ७२०० रुपये क्विंटल होता. आता गपकन २००० ते २२०० रुपयांनी कमी झाला. शेतकऱ्‍यांचे हजारो रुपये बुडाले. यंदा गेल्या वर्षीचा भाव मजुरांनी गृहीत धरून कापणीचा भाव वाढवला. सरकार व व्यापारी यांच्या बरोबरच शेतकरी मजुरांच्या हातचा खुळखुळा झालाय. साधारत: ८ ते १० क्विंटल एकरी सोयाबीनचा उतारा येतो. कमी - अधिकही उतारा असू शकतो. तो जमीन, खतपाणी, फवारणी, आंतरमशागत, पाऊसपाणी अशा अनेक घटकांवर आधारित असतो.

१६ ते २० हजार रुपये एकरी सध्या शेतकऱ्‍यांना सोयाबीन विक्रीचा फटका बसू शकतो. घ्या १०० रुपयांचा माल, शेतकऱ्‍यांचे हाल, अशी जळजळीत - काळीज पेटीव शेतकऱ्‍यांची स्थिती आहे. हे असे झाल्यामुळे शेतकरी जात्यात अन् सुपात असतात. सुपातलेही अनेकदा वाट पाहून भाव कमी झाल्यामुळे जात्यात जातात.

यावर शेतीमालाच्या मूल्यवर्धनाचे सल्ले दिले जातात. शेतकरी बुचकळ्यात पडतो. सरकारी पातळीवर यंदाचा सोयाबीनचा पेरा किती? सोयाबीनचे अंदाजित उत्पादन किती? गेल्या वर्षीचा राज्याला लागलेला तेलसाठा किती? या वर्षी तेलसाठा किती लागेल? तेल काढल्यावर सोयापेंड व सोयावडा यांची किती विक्री होईल? सोयाबीनच्या गुळीच्या विक्रीचा भाव किती? गुळीपासून तयार होणारे बगॅस इंधन म्हणून किती विक्री होणार? हे मूल्यवर्धन सांगणाऱ्यांनी नियोजन केले तर शेतकऱ्‍यांना सरळ सरळ सोयाबीन विक्रीतून फायदा होईल. पूर्वीही देशातून कच्चा माल परदेशात जाऊन पक्का माल होऊन देशातच महागमोल विकला जायचा. आता देशातच हे चालू आहे. शेतकऱ्‍यांना जात्यात व सुपातून जात्यात भरडणारे कोण? हे काही वेगळं सांगण्याची गरज आता काही उरली नाही. ‘लाखांचा पोशिंदा’ फक्त आपल्या कृषिप्रधान देशातच परका आणि पोरका आहे.

माझा यंदाचा सोयाबीनचा अनुभव २९ जून २०२२ रोजी मी सोयाबीनची पेरणी केली. आता २२ व २३ ऑक्टोबर २०२२ या दोन दिवसांत ४ बॅग मजुरांकडून कापून घेतल्या, लगोलग गंजी केली अन् मळणी यंत्रातून काढून घेतले. एकूण ४१ क्विंटल सोयाबीन झाले. साडेतीन महिन्यांवर एक हप्ता सोयाबीन कापायला जास्त लागला. ता. २१ रोजी वसुबारसेला जनावरांना नेहमी सारखेच चारले - चोंभाळले. ता. २२ व २३ या दिवसांना धनत्रयोदशीचे सोयाबीन कापणी आणि मळणी केली. ता. २४ रोजी लक्ष्मीपूजनाला उरलेल्या सोयाबीनची मळणी होईल.

मी कुबेर नसल्यामुळे लक्ष्मीपूजनाला सोयाबीन राशीचे पूजन केले. ता. २६ रोजी पाडवा व भाऊबिजेला घरच्या लक्ष्मीला व बहिणीला सकाळी भेटून मी आणि आई मळ्यात सोयाबीनला हात द्यायचा जाईल. पावसानं अनेकांचे सोयाबीनची शेतं तणकटाने गच्च भरलेले दिसले. मी, आई व सालदाराने सोयाबीनच्या ढेल्यांत तणकटाचा पिच्छा करून उपटाउपटी केली होती. त्यामुळे कापणारेही खुश होते. कापणी झाल्यावरबी मी आणि सालदाराने कुठंमुठं असलेले उपटतण उपटले. गडबडीनं बैलांनी औत पाळ्या घातल्या. रान निर्मळ झालं. आता तिथं ज्वारी, हरभरा, गहू व भुईमूग पेरायचाय. सोयाबीनला ऊन व चाळणी सुरूच आहे.

आता माझ्या हातात सोयाबीन आलेय पण सध्या सुपात असलो तरी उद्या जात्यात जाऊ नये म्हणून भावाची वाट पाहत थांबलोय. माझ्या शेतकरीदादांचा ‘जात्यात - सुपातचा खेळखंडोबा’ नजरेत आहेच की!

- अरुण चव्हाळ, परभणी (७७७५८४१४२४)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com