Crop Protection : कपाशीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील एकात्मिक कीड व्यवस्थापन

सातत्याने निरीक्षण ठेवून, प्रतिबंधक व एकात्मिक पद्धतीचे (Integrated Pest Management) उपाय करून कपाशीचे प्रभावी पीक संरक्षण करणे गरजेचे आहे.
Cotton Integrated Pest Management
Cotton Integrated Pest ManagementAgrowon
Published on
Updated on

कपाशी पिकात पेरणीनंतर ४५ ते ६० व पुढे ६० ते ९० दिवस रसशोषक किडी (Sucking Pest) व गुलाबी बोंड अळी (Pink Boll Worm) आदी किडींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात सातत्याने निरीक्षण ठेवून, प्रतिबंधक व एकात्मिक पद्धतीचे (Integrated Pest Management) उपाय करून कपाशीचे प्रभावी पीक संरक्षण करणे गरजेचे आहे.

या वर्षी जूनमध्ये मॉन्सूनच्या लांबलेल्या आगमनामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागात उशिरा पेरण्या झाल्या. त्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यापासून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यात अतिवृष्टी झाली. उभ्या पिकात दीर्घकाळ पाणी साचून राहिले. सलग १५-२० दिवस ढगाळ वातावरण राहिले. असे वातावरण कपाशीच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत रसशोषक किडींच्या प्रादुर्भावास अनुकूल असते. पीक ४५ दिवसांचे झाल्यापासून गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने उपाययोजना करणे आवश्यक असते.

डॉ. बाबासाहेब फंड

Cotton Integrated Pest Management
Cotton : कापूस उत्पादकांसमोर आता किडींचे संकट

कपाशीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील (पेरणीपासून ९० दिवस) कीड नियंत्रणाच्या टिप्स

संकरित बीटी कपाशीच्या बियाण्याला निओनिकोटीनोइड गटातील कीटकनाशकांची बीजप्रक्रिया केलेली असते. त्यामुळे पहिल्या ४० दिवसांपर्यंत रसशोषक किडीपासून पिकास संरक्षण मिळते

लागवडीनंतर ६० दिवसांपर्यंत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मित्रकीटकांची वाढ होण्यास मदत होते. रासायनिक कीटकनाशकांचा सुरवातीलाच केलेल्या अतिरेकी वापरामुळे मित्रकीटकांना हानी पोहोचून रसशोषक किडींचा उद्रेक होण्यास मदत होते.

रसशोषक किडींचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अतिरिक्त नत्राचा वापर कटाक्षाने टाळावा.

पाऊस उघडल्यानंतर पिकाची वाढ पूर्ववत होऊन पात्या लागण होण्यासाठी पीक ४० ते ४५ दिवसांचे झाल्यावर नत्राचा पहिला हप्ता द्यावा. त्यासाठी नीम कोटेड युरियाची प्रति हेक्टरी एक गोणी वापरावी.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ४५ दिवसांच्या दरम्यान निंबोळी अर्क अथवा नीम तेलाची फवारणी करावी. त्यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव व गुलाबी बोंड अळीच्या पतंगांना अंडी घालण्यापासून रोखण्यास मदत होते.

पीक ४५ दिवसांचे झाल्यावर गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे. त्यासाठी व प्रादुर्भाव पातळी जाणून घेण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असणारे कामगंध सापळे लावावेत. त्यात अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत.

रसशोषक किडींच्या प्रादुर्भावाची पातळी जाणून घेण्यासाठी एकरी आठ याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत.

ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या अंडयांवर उपजीविका करणाऱ्या परोपजीवी मित्रकीटकांचे ६० हजार प्रति एकर याप्रमाणे प्रसारण करावे. पात्या-फुले लागण्याच्या अवस्थेपासून (पेरणीनंतर ४५ दिवस) १५ दिवसांच्या अंतराने प्रसारण तीनदा केल्यास अळीचे चांगले नियंत्रण मिळते. प्रसारण करण्यापूर्वी आणि नंतर किमान एक आठवडा रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी

प्रादुर्भावग्रस्त फुले (डोमकळ्या) वेचून त्वरित नष्ट करावीत. जेणेकरून पुढील प्रादुर्भाव रोखता येईल.

किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यासच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी

पायरेथ्रॉइड वर्गातील कीटकनाशकांचा (उदा. सायपरमेथ्रीन, लॅंबडा सायहलोथ्रीन, फेनवलरेट) कापूस हंगामाच्या सुरवातीच्या १०० ते १२० दिवसांपर्यंत वापरू नये. अन्यथा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढीस लागून पिकाचे नुकसान होते.

एकापेक्षा अधिक कीटकनाशकांचे मिश्रण करू नये. फवारणी करतेवेळी हातमोजे, चष्मा, संरक्षक कपडे वापरावेत.

कीटकनाशकांचा वापर

मात्रा प्रति १० लिटर पाणी.

(प्रमाण हाय व्हॉल्यूम पंपासाठी गृहीत धरून)

पेरणीनंतर ४५ ते ६० दिवस- पात्या लागण्याची अवस्था

सर्व रसशोषक किडी व गुलाबी बोंड अळीसाठी- ५ टक्के निंबोळी अर्क (५०० मिलि) अधिक नीम तेल (५० मिलि) अधिक सरफॅक्टंट १० ग्रॅम

पेरणीनंतर ६०-९० दिवस.

फुलोरा ते बोंडे लागण्याची अवस्था

सर्व रसशोषक किडी (रसायनांचे पर्याय)

फ्लोनिकामिड ५० टक्के (डब्ल्यूजी)- ४ ग्रॅम

डिनोटेफ्युरान (२० एसजी)- ३ ग्रॅम

थायामेथोक्झाम

(२५ टक्के डब्ल्यूजी) - २.५ ग्रॅम.

इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल)- ३ मिलि

पांढरी माशी

स्पायरोमिसिफेन- (२२.९ टक्के ईसी) किंवा पायरोप्रॉक्सिफेन (१० टक्के ईसी) प्रमाण- २० मिलि

थ्रीप्स- फुलकिडे-

स्पिनेटोरम (१.७ एससी)- ८ मिलि

गुलाबी बोंड अळी

क्विनॉलफॉस (२५ टक्के एएफ)- २० मिलि

क्लोरपायरिफॉस (२० ईसी) - २० मिलि

प्रोफेनोफोस (५० ईसी)- २० मिलि

इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी)- ५ ग्रॅम.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com