Citrus fruit Crop Management : सद्यःस्थितीतील लिंबूवर्गीय फळपिकांचे संरक्षण

Citrus fruit Crop pest : आंबिया बहराच्या संत्रा / मोसंबी फळांवर बुरशी व कीटकांचा आणि मृग बहराच्या लहान फळांवर कोळी कीड आणि फ्रूटलेट ब्लाइट रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याचा परिणाम फळगळीमध्ये आणि फळांच्या गुणवत्तेवर दिसून येतो.
Citrus fruit Crop pest
Citrus fruit Crop pest Agrowon

डॉ. योगेश इंगळे, डॉ. अजय सदावर्ते, डॉ. दिनेश पैठणकर

Citrus fruit Crop: आंबिया बहराच्या संत्रा / मोसंबी फळांवर बुरशी व कीटकांचा आणि मृग बहराच्या लहान फळांवर कोळी कीड आणि फ्रूटलेट ब्लाइट रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याचा परिणाम फळगळीमध्ये आणि फळांच्या गुणवत्तेवर दिसून येतो. या काळात रोग व किडींच्या व्यवस्थापनासाठी परिणामकारक उपाययोजना करणे गरजेचे ठरते.


कोळी कीड :
कोळी ही अष्टपाद वर्गातील कीड आकाराने लहान असून, डोळ्यांना सहजपणे दिसत नाही. कोरड्या, शुष्क वातावरणात त्यांची संख्या वाढते. कोळी पाने व फळांचा पृष्ठभाग खरवडून, त्यातून येणारा रस शोषतात. परिणामी, पानावर पांढुरके चट्टे पडतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास चट्ट्याचा भाग वाळतो. खरचटलेल्या जागी पेशींची वाढ खुंटते. फळाची साल खडबडीत व टणक दिसते. तपकिरी करड्या लाल किंवा जांभळट रंगाचे चट्टे पडतात. फळांची प्रत खालावते. परिणामी, फळांना बाजारभाव मिळत नाही.

व्यवस्थापन : (प्रति लिटरमध्ये प्रमाण घेणे)
कोळी कीड - प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना कराव्यात. कोळीच्या व्यवस्थापनासाठी अबामेक्‍टीन (१.९ ईसी)* ३. ७ मि.लि. किंवा प्रोपरगाइट (५७ ईसी)* २० मि.लि. किंवा इथिऑन (५० ईसी)* २० मि.लि. किंवा डायफेन्थूरॉन (५० डब्ल्यूपी)# २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. गरजेनुसार पुढील फवारणी २० दिवसांच्या अंतराने कीडनाशक बदलून करावी.

Citrus fruit Crop pest
Citrus Crop Management : लिंबूवर्गीय फळबागेतील पानगळ, फळावरील तपकिरी रॉट व्यवस्थापन

फळमाशी :
प्रौढ मादी फळाच्या सालीखाली एक वा अनेक अंडी घालते. तीन ते पाच दिवसांत अंडी उबून मळकट पांढऱ्या रंगाच्या पाय नसलेल्या अळ्या बाहेर पडतात. या अळ्या फळामध्ये शिरून त्यातील रस व गर खाऊन टाकतात. परिणामी, फळ खराब होते. त्याची गुणवत्ता घटते. अंडी घालण्यासाठी पाडलेल्या छिद्राजवळील भागावर अन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. तिथे पिवळे डाग पडतात. अकाली फळगळ होते. फळ दाबले असता फळातून छिद्रे असलेल्या जागेतून पिचकारीसारखे फवारे उडतात.

व्यवस्थापन :
-फळमाशीच्या नरांना आकर्षित करण्याकरिता फळमाशी सापळे (मिथिल युजेनॉल) प्रति हेक्टरी २५ या प्रमाणात तोडणीच्या साधारण २ महिने आधीपासून बागेत झाडांवर टांगून ठेवावेत.
-बागेतील खाली पडलेली फळे वेचून नष्ट करून बाग स्वच्छ ठेवावी.
-फळमाशीची कोषावस्था जमिनीत २ ते ३ सेंटिमीटर खोलीपर्यंत असते. त्या नष्ट करण्यासाठी झाडाखालील माती हलवून किंवा निंदून घ्यावी.

Citrus fruit Crop pest
Citrus Crop Management : लिंबूवर्गीय फळांवरील तपकिरी कुज, देठ सडचे व्यवस्थापन

फळातील रस शोषण करणारा पतंग :
या किडीच्या प्रादुर्भावामुळे सर्वाधिक फळगळ सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात दिसून येते. हा पतंग सायंकाळी सक्रिय होतो. पक्व होत असलेल्या फळाला सुईसारख्या सोंडेद्वारे छिद्र करून रस शोषून घेतो. छिद्र पडलेल्या जागेतून रोगजंतूचा शिरकाव होऊन फळ सडण्यास सुरुवात होते. परिणामी फळ गळून पडतात. अशा फळांना दाबले असता छिद्रातून आंबलेला रस बाहेर येतो. गळलेले फळ पूर्णतः सडते. त्याला दुर्गंध येतो. यावर अनेक छोट्या माश्या घोंघावू लागतात.

व्यवस्थापन ः

-संत्रा पिकाच्या व्यतिरिक्त असलेल्या रसशोषक किडीच्या यजमान तणांचा नाश करावा. उदा. गुळवेल, वासनवेल, चांदवेल इ. यजमान तणावर या किडीची अळी अवस्था राहते.
-साधारणत: सायंकाळच्या वेळी (७ ते रात्री ११) या कालावधीमध्ये बागेच्या बांधावर गवत पेटवून धूर करावा.
-फळ पक्वतेच्या कालावधीत बागेच्या चारही कोपऱ्यामध्ये व मध्यावर एक या प्रमाणे मर्क्युरी प्रकाशाचे दिवे लावून, त्याखाली पसरट भांड्यामध्ये केरोसीन ओतून ठेवावे.
-रसशोषक पतंगाकरिता विषारी आमिषे तयार करून बागेत ठेवावी. या करिता मॅलॅथिऑन (५० ईसी) २० मि.लि. + २०० ग्रॅम गूळ + खाली पडलेल्या फळांचा रस (४०० ते ५०० मि.लि.) हे घटक २ लिटर पाण्यात मिसळून या द्रावणापासून दोन आमिषे करावीत. हे द्रावण रुंद तोंडाच्या दोन बाटल्यांत भरून प्रत्येक २५ ते ३० झाडांमध्ये एक या प्रमाणात ठेवावे.
-फळ हिरव्या रंगामधून पिवळसर रंगामध्ये रूपांतर होत असताना १०-१५ दिवसांच्या अंतराने फळतोडणी होईपर्यंत निंबोळी तेल (नीम ऑइल) किंवा मिनरल ऑइल* १० मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- बागेतील खाली पडलेली फळे वेचून खड्ड्यात पुरून बाग स्वच्छ ठेवावी.

फ्रूटलेट ब्लाइट :
कोळी कीड किंवा फुलकिडे यांच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या जखमांमध्ये पॅन्टोआ ॲनानाटिस या जिवाणूचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे फळांवर काळे डाग पडतात. फळावरील काळ्या डागामुळे यांना ‘फ्रूटलेट ब्लाइट’ असे संबोधले जाते. प्रभावित लहान फळांवरील आवरणावर खोलगट अनियमित आकाराचे गडद काळे किंवा तपकिरी डाग पडतात. प्रस्तुत डाग हे हात लावल्यास तेलकट भासतात. छोट्या काळ्या डागापासून सुरुवात होऊन नंतर संपूर्ण फळ काळे पडते. परिणामी, बऱ्याचदा फळे खाली पडतात.

व्यवस्थापन ः
काळे डाग पडून होणाऱ्या लहान फळांची गळ कमी करण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के डब्ल्यूपी)** २५ ग्रॅम १० लिटर पाणी या मिश्रणाची फवारणी करावी.

कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉट किंवा देठ सुकणे :
कोलेटोट्रीकम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊन तो भाग काळा पडतो. काळा भाग नंतर वाढत जातो व संपूर्ण फळ सडते. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे व ती वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत. बरेचदा उशिरा झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळी पडतात, वजनाने हलके होऊन कडक होतात आणि दीर्घ काळापर्यंत देठांना लटकत राहतात.

व्यवस्थापन ः
कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉटमुळे होणाऱ्या फळगळसाठी बोर्डो मिश्रण ०.६ टक्का किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी)* २.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा अझोक्सिस्ट्रोबिन + डायफेनकोनॅझोल (संयुक्त बुरशीनाशक)* १ मि.लि. प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.

वनस्पती शास्त्रीय आंतरिक फळगळ व्यवस्थापनासाठी उपाययोजना ः
खालील शिफारशी की लेबल क्लेम काय ते उल्लेख करणे

- उष्ण तापमानात बागेमध्ये तणनाशकाचा वापर टाळावा.
- फळबागेत फळांचे ढीग कुठेही ठेवू नयेत. कारण ते कीड व रोगाचे प्रसार करण्याचे काम करतात.
-आंबिया बहरातील फळगळ व्यवस्थापनाकरिता, एनएए १ ग्रॅम (१० पीपीएम) किंवा २-४-डी* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) किंवा जिबरेलिक ॲसिड* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) अधिक एन-एटीसीए (N-Acetyl-Thiazolidine -४- Carboxylic Acid) १ ग्रॅम (१० पीपीएम) अधिक ब्रासिनोलाइड ०.४ ग्रॅम (४ पीपीएम) अधिक फोलिक ॲसिड १० ग्रॅम (१०० पीपीएम) प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
-मृग बहराची फळे वाटाण्याएवढी असतील. अशा स्थितीत पावसाचा खंड पडल्यास किंवा उष्णतेच्या ताणामुळे गळ होत असल्यास ती थांबविण्यासाठी, एनएए (१ ग्रॅम) १० पीपीएम किंवा २-४-डी* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) + पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) १ किलो (१%) + १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- झाडावर पानांची संख्या कमी व पाने पिवळट हिरव्या रंगाची असल्यास कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट (१ किलो) + जिबरेलिक अॅसिड १.५ ग्रॅम + १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- आंबिया फळांकरिता सप्टेंबर महिन्यात तसेच मृगाच्या फळाकरिता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची (झिंक सल्फेट ५ ग्रॅम, फेरस सल्फेट १ ग्रॅम, व बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे) फवारणी करावी.

डॉ. योगेश इंगळे, ९४२२७६६४३७
डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२
(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प -फळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
---------------------------
नोंद : * लेबल क्लेम शिफारस नाही; अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाची अथवा ॲग्रेस्को शिफारस.
** तदर्थ (लेबल क्लेम नाही, आपत्कालीन परिस्थितीत विद्यापीठाने केलेली) शिफारस;
# केंद्रिय कीटकनाशक मंडळ, नवी दिल्ली शिफारस.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com