उगवणक्षमता तपासून घरचे बियाणे पेरावे

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सल्ला
Seed
Seed Agrowon

नांदेड : कमी खर्चाचे व शाश्‍वत उत्पादन (Production) घेण्यासाठी सोयाबीन उत्पादकांनी (Soybean Farmer) घरचे बियाणे वापरणे अधिक फायद्याचे ठरेल. फक्त त्या बियाण्याची उगवणक्षमता (Germination) तपासून पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

कृषी सेवा केंद्रांमधून विकत घेतलेल्या प्रमाणित बियांपासून (Seed) उत्पादित होणारे बियाणे सतत तीन वर्षांपर्यंत वापरता येते. सोयाबीन बियाणे बदलाचे प्रमाणे ३५ टक्के एवढे असावे लागत असले तरी प्रत्यक्षात गेल्या दोन-तीन वर्षांत सोयाबीन बियाणे बदलाचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा जास्त झालेले आहे.

बियाणे मिळण्यासाठी करावी लागणारी पायपीट व बाजारातील बियाणे उगवण झाले नसल्यामुळे होणारा मनस्तापसुद्धा टाळता येऊ शकतो. बियाण्याचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासून घरच्या बियाण्यांचा पेरणीसाठी वापर करावा, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

घरच्या सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर धान्य बाहेर काढा. सर्व पोत्यांतील काढलेले धान्य एकत्र करून घ्यावे. गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे घेऊन स्वच्छ धुऊन घ्या. एक तुकडा जमिनीवर पसरवा. काढलेल्या धान्यातील सरसकट १०० दाणे मोजून दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर तुकड्यावर ओळीत ठेवून त्यांचे तीन नमुने तयार करावे. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे व बियाण्यांवर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरूण पुन्हा चांगले पाणी टाकावे. गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यासकट गोलगुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवावे. त्यावर अधूनमधून पाणी शिंपडून ओले ठेवावे. सहा ते सात दिवसांनंतर ही गोलगुंडाळी जमिनीवर पसरून उघडावी. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून त्याची मोजणी करावी. तिन्ही गुंडाळींची सरासरी काढून १०० दाण्यापैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे कोंब आलेले असतील, तर बियाणे बाजारातील बियाणेसारखेच गुणवत्तेचे आहे, असे समजावे आणि शिफारशीप्रमाणे पेरणीसाठी वापरावे. जर उगवण झालेल्या बियाण्याची टक्केवारी ७० पेक्षा कमी असेल तर, एकरी बियाण्याचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावी. मात्र ५० टक्क्यांपेक्षा कमी उगवण शक्ती असल्यास घरचे बियाणे न वापरता प्रमाणित बियाणे खरेदी करावे.

...अशी करा बीजप्रक्रिया

रायझोबियम व पीएसबी या जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम, १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बुरशी रोगापासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी व ७० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्लाही कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा

कृषी विभागाने शेतकऱ्यांनी फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. बियाणे व खतातील गैरव्यवहार टाळण्यासाठी जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर प्रत्येकी एक यानुसार १६ भरारी पथकाची स्थापना केली आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खताबाबत काही तक्रार असल्यास ८४४६११७५०० या मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा, तसेच १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बी. बी. गिरी यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com