
डॉ. मंगेश घोडे, आकाश लेवाडे, डॉ. प्रवीण वैद्य
मातीमध्ये निसर्गत: असलेल्या जिवाणू, बुरशी (Bacteria Fungi) अशा सूक्ष्मजीवांच्या जैवविविधतेचा पिकांच्या उत्पादन वाढीसाठी वापर करून घेणे शक्य आहे. प्रयोगशाळेमध्ये अशा उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ योग्य माध्यमात केली जाते. सूक्ष्मजीव विशेषतः जिवाणू लिग्नाइटमध्ये मिसळून तयार केलेल्या खतांना जिवाणू खते म्हणतात. यामध्ये प्रति ग्रॅम १० कोटी ते एक अब्ज इतकी जिवाणूंची संख्या असते.
नत्र स्थिर करण्याची क्षमता असलेली जिवाणू खते ः रायझोबिअम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलिअम, ॲसिटोबॅक्टर, नीलहरित शैवाल आणि ॲझोला इ. स्फुरद विरघळविणारी जिवाणू खते ः सुडोमोनस, बॅसिलस जिवाणू, मायकोरायझा बुरशी इ.
जीवशास्त्रज्ञ जेफ डॅंग्ल यांच्या मते, शेंगावर्गीय पिकांच्या मुळांवर येणाऱ्या गाठी व त्याचा होणारा फायदा शेतकऱ्यांना खूप आधीपासून माहिती आहे. त्यामुळे आंतरपिकांमध्ये किंवा फेरपालटीसाठी तृणधान्य पिकासोबत कडधान्य पिकांची लागवड शेतकरी करतात. म्हणजेच आधीच्या पिकांच्या मुळांवरील जिवाणू मातीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे कार्य करून पुढील पिकांना मदत करतात. ही तुलनेने नैसर्गिक पद्धत झाली.
अशा निसर्गातील पीक उत्पादनामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ प्रयोगशाळेत करून त्यापासून ही खते तयार केली जातात. रासायनिक खतांच्या तुलनेमध्ये जिवाणू खते स्वस्त असतात.
रासायनिक खतांप्रमाणे जिवाणू खतांमध्ये कोणती अन्नद्रव्ये नसली तरी पिकांना लागणारी अन्नद्रव्ये हवेतून किंवा जमिनीतून उपलब्ध करून देतात.
उदा. हवेत नायट्रोजन मुबलक असला तरी पिकांना घेता येत नाही. मात्र जिवाणू त्याचे रूपांतर अमोनिअम स्वरूपात करून पिकांना उपलब्ध करून देतात. उदा. ॲझेटोबॅक्टर, रायझोबिअम इ.
स्फुरद विरघळविणारे जिवाणू अनेक कार्बनी आम्लांची निर्मिती करून जमिनीमध्ये अविद्राव्य स्वरूपात स्थिर झालेल्या स्फुरदाचे रूपांतर पिकांना उपलब्ध अशा द्राव्य स्वरूपात करतात. व्हेसिकुलर अर्बस्कुलर मायकोरायझा ही बुरशीही जमिनीतील अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळवून पिकांना उपलब्ध करते.
जिवाणू खतांचे फायदे
जिवाणू खताद्वारे जमिनीत जैवरासायनिक क्रिया होतात. त्यामुळे जमिनीची पोत सुधारतो.
जिवाणू खते सेंद्रिय शेतीतील महत्त्वाचा घटक असून, पर्यावरणाचे संवर्धन होते.
निसर्गातील अन्नद्रव्ये उपलब्ध होत असल्यामुळे रासायनिक खतांची मात्रा २० ते २५ टक्क्यांनी कमी करता येते. पीक उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढते.
जिरायत जमिनीत जिवाणू खतांचा चांगला फायदा होतो.
सेंद्रिय पदार्थाचे लवकर विघटन होते.
बियाण्यांची चांगली व लवकर उगवण होते.
पिकांची वाढ जोमदार होते.
पिकांच्या रोगप्रतिकार शक्तीही वाढ होते.
ही खते नैसर्गिक असून, ठिबकमधूनही देता येतात.
जिवाणू खते वापरताना
घ्यावयाची काळजी
जिवाणू खताची बाटली किंवा पॅकेट सावली ठेवावे. सूर्यप्रकाशापासून संरक्षण करावे.
जिवाणू लावलेले बियाणे रासायनिक खतात अजिबात मिसळू नये.
बुरशीनाशक किंवा कीटकनाशकांची बीजप्रक्रिया करणार असल्यास ती आधी करून शेवटी जिवाणू खताची प्रक्रिया करावी.
जिवाणू खत ठिबकद्वारे देताना रासायनिक खते वा रसायनांसोबत देऊ नये.
वेष्टणावर दिलेल्या अंतिम तारखेच्या आतच जिवाणू खतांचा वापर करावा.
जिवाणू खतांचे प्रकार
नत्र स्थिरीकरण करणारी जिवाणू खते
अ) रायझोबिअम : हे सहजीवी पद्धतीने कार्य करणारे जिवाणू हेक्टरी ५० ते १०० किलो नत्र जमिनीमध्ये स्थिर करतात. शेंगवर्गीय पिकांच्या मुळांवर गाठी निर्माण करून हवेतील नत्र शोषून मुळांवाटे पिकास उपलब्ध करून देतात.
शेंगवर्गीय पिकांच्या वैशिष्ट्यानुसार वेगवेगळे गट असून, त्यासाठी वेगवेगळे रायझोबिअम जिवाणू वापरावे लागतात. १) चवळी गट- चवळी, भुईमूग, तूर, वाल, मूग, उडीद, मटकी, ताग, धैंचा, इ., २) हरभरा गट- हरभरा, ३) वाटाणा गट- वाटाणा, मसूर, ४) घेवडा गट- सर्व प्रकारची घेवडा व वालवर्गीय पिके, ५) घेवडा गट- सर्व प्रकारची घेवडा व वालवर्गीय पिके, ६) सोयाबीन गट- सोयाबीन, ७) अल्फाल्फा गट- मेथी, लसूणघास, ८) बरसीम गट- बरसीम घास.
ब) ॲझोटोबॅक्टर : जमिनीमध्ये पिकांच्या मुळांभोवती राहून असहजीवी पद्धतीने कार्य करताना हे जिवाणू हेक्टरी २० ते ४० किलो नत्र जमिनीत स्थिर करते. प्रामुख्याने वातावरणातील मुक्त व मुबलक (७८ टक्के) असणारा नत्रवायू स्थिर करून पिकास उपलब्ध करून देतात. हे जिवाणू खत शेंगवर्गीय पिके वगळून अन्य सर्व एकदल, तृणधान्य पिकांना उपयोगी पडते. उदा. कापूस, ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, मका, सूर्यफूल, मिरची, वांगी, डाळिंब, पेरू, आंबा, इ.
क) ॲझोस्पिरिलम : ॲझोटोबॅक्टरपेक्षा अधिक कार्यक्षम असे हे जिवाणू सहजीवी पद्धतीने कार्य करतात. हेक्टरी २० ते ४० किलो नत्र जमिनीमध्ये स्थिर करतात. सामान्यतः तृणधान्य, भाजीपाला व फळझाडे पिकांच्या मुळांमध्ये व मुळांभोवती राहतात.
ड) ॲसिटोबॅक्टर : शर्करायुक्त पिकांमध्ये (उदा. ऊस, मका, ज्वारी, बीट इ.) सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतात. हे जिवाणू उसाच्या कांड्या, पाने व मुळांमध्ये वास्तव्य करतात. आंतरप्रवाही असल्यामुळे स्थिर केलेल्या नत्राचा पीक वाढीमध्ये अधिक वापर केला जातो. त्याचप्रमाणे हे जिवाणू इंडोल ॲसिटिक ॲसिड तयार करून मुळाच्या वाढीस मदत करतात.
इ) निळे- हिरवे शेवाळ : हे एकपेशीय असे शाखांसह किंवा शाखाविरहीत तंतू असतात. भात खाचरामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे वाढ चांगली होते. हे शेवाळ हवेतील मुक्त नत्र हेक्टरी २० ते ३० किलो प्रमाणात स्थिर करतात.
ई) अझोला : ही एक पानवनस्पती असून ॲनाबिना या शेवाळाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते. तिचा हिरवळीचे खत म्हणून वापर केला जातो. हेक्टरी ४० ते ८० किलो नत्र स्थिर करते.
स्फुरद विरघळविणारे जैविक खत
पिकांचा आवश्यकतेनुसार नत्राच्या खालोखाल स्फुरद हे पिकांच्या प्रमुख अन्नद्रव्यांपैकी एक आहे. रासायनिक खतांद्वारे पुरविलेल्या स्फुरदापैकी बरेचसे जमिनीतील निरनिराळ्या रासायनिक प्रक्रियांमुळे स्थिर होते. ते अविद्राव्य झाल्यामुळे पिकांना घेता येत नाहीत. स्फुरद विरघळविणारे सूक्ष्मजीव असे स्फुरद विरघळवून २० ते ३० टक्के द्राव्य स्वरूपात रूपांतर करतात.
पिकांची मुळे ते शोषून घेऊ शकतात. बुरशी वर्गातील ॲस्परजिलस, अवामोरी आणि पेनिसिलियम डिजीटॅटम तर अणुजीवी प्रकारातील बॅसिलस पॉलिमिक्झा, बॅसिलस मेगाथेरियम आणि बॅसिलस स्ट्रायटा असे कार्यक्षम स्फुरद विरघळविणारे सूक्ष्मजीव आहेत. त्यांचा ज्वारी, बाजरी, गहू, मका, ऊस, कापूस, सूर्यफूल, मिरची, वांगी, डाळिंब, पेरू, आंबा, तसेच सर्व कडधान्य व फुलझाडे, इ. विविध पिकांना फायदा होतो.
व्हेसिकुलर अर्बस्कुलर मायकोरायझा (व्हीएम मायकोरायझा) ही बुरशी जमिनीतील फॉस्फरस, जस्त, सल्फर म्हणजेच गंधक आणि पाण्याचे शोषण करून पिकास उपलब्ध करून देतात. त्यामुळे पिकाची एकसमान वाढ होते. उत्पादन वाढते. मुळांच्या रोगास प्रतिकारशक्ती वाढवते. या बुरशीची विविध वनझाडे चारा पिके, गवत, मका, बाजरी, ज्वारी, बार्ली आणि शेंगा पिकांसाठी शिफारस केली जाते.
पालाश विरघळविणारे जिवाणू
अनेक वेळा जमिनीमध्ये पालाश हे अन्नद्रव्य मुबलक, पण स्थिर स्वरूपात असते. फ्राटेरिया ऑरेंशिया हे जिवाणू स्थिर स्वरूपातील पालाशमधून जैव रासायनिक क्रियांद्वारे पालाशमुक्त करतात. पिकाला उपलब्ध करून देतात. पालाश या मूलद्रव्यांचे वहन होत नाही. हे जिवाणू पालाशची वहन क्रियाही सक्रिय करतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.