
Grape Management: द्राक्षातील व्यवस्थापनाचा विचार केला असता छाटणीनंतरचे पहिले ५० दिवस अतिधोक्याचे असतात. नवीन येणाऱ्या फुटी, घड, त्यावर येणारे रोग यामुळे हा कालावधी अतिधोक्याचा ठरतो. ५० ते ९० दिवसांचा कालावधी म्हणजेच घड मोठा होत मण्यांची वाढ होते, आणि मण्यांचा दर्जा निश्चित होतो. पण या काळातच थंडी किंवा पाऊस यामुळे चढ-उतार नेहमी असतात.
या ५० ते ९० दिवसांच्या कालावधीला मध्यम धोक्याचा समजला जातो. ९० दिवसांनंतर मण्यात पाणी भरण्यास सुरुवात होते, हळूहळू साखर वाढते. १४० दिवसांच्या पुढे फळे काढणीला येतात. सर्वसाधारणपणे या काळात फारसा धोका नसतो. पण काढणीच्या आधी येणारे वादळी पाऊस किंवा गारपीट मोठे नुकसान करू शकतात. म्हणून या काळास कमी- जास्त धोक्याचा काळ असे म्हटले जाते. याच काळात द्राक्षाची अंतिम प्रत ठरली जाते.
सध्या उपलब्ध माहितीनुसार येत्या १५ ते २० दिवसांपर्यंत महाराष्ट्रातील द्राक्ष विभागामध्ये वातावरण द्राक्षासाठी चांगले राहणार आहे. दोन, तीन फेब्रुवारीनंतर नाशिक व जवळपासच्या भागामध्ये वातावरण दिवसभर ढगाळ राहील. छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागामध्ये तीन तारखेला हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष बागा या वाढीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. द्राक्षाचे उत्पादन आपण निर्यातीसाठी, स्थानिक बाजारासाठी किंवा बेदाणे निर्मितीसाठी घेण्याचे नियोजन करत असतो.
आज सोयीसाठी म्हणून द्राक्षे दोन गटामध्ये विभागू.
काढणीच्या वेळी एमआरएल पेक्षा कमी उर्वरित अंश असणारी द्राक्षे - एनआरसी, ग्रेप्सने प्रकाशित केलेल्या अनेक्श्चर ५ आणि ९ मध्ये लिहिलेल्या कीडनाशकांची पीएचआयच्या (प्री हार्वेस्टिंग इंटरव्हल) आधी एक ते दोन फवारणी व व्यवस्थापन केलेल्या द्राक्षामध्ये साधारणपणे एमआरएलपेक्षा कमी उर्वरित अंश सापडतात.
शून्य उर्वरित अंश (झीरो रेसिड्यू) असणारी द्राक्षे - झीरो रेसिड्यूचा शब्दाप्रमाणेच अर्थ घेतला तर या द्राक्षामध्ये कोणत्याही कीडनाशकाचे उर्वरित नसले पाहिजेत. मात्र एका आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे या गटामध्ये मोडण्यासाठी खालील निकष आहेत.
नियम १- या द्राक्षामध्ये कीडनाशकांचे उर्वरित अंश मिळालेच तर ते तीन रसायनांपेक्षा अधिक नसावेत.
नियम २ - उर्वरित अंश कीडनाशकांच्या एमआरएल पेक्षा जास्तीत जास्त एक तृतीयांश असावेत.
नियम ३ - मिळालेल्या उर्वरित अंशांची बेरीज केल्यास ती एक पीपीएमपेक्षा जास्त नसावी.
सध्या कीडनाशकांच्या उर्वरित अंश मोजण्याची साधने व तंत्रज्ञान प्रगत झालेले आहे. अगदी ०.०१ पीपीएम उर्वरित अंशही मोजता येतात. मात्र एक पीपीएम ही अत्यंत कमी मात्रा असून, त्याला झीरो रेसिड्यू द्राक्षे समजले जाते. आपल्या बागेमध्ये इतक्या कमी प्रमाणात उर्वरित अंशापर्यंत ठेवणे सहजशक्य नसले, तरी अशक्यही नाही. उदाहरण म्हणून काही वर्षांपूर्वी एनआरसी, ग्रेप्समध्ये आम्ही द्राक्ष दिवस साजरा केला होता. त्या वेळी पाच रेसिड्यू फ्री उत्पादन घेणाऱ्या द्राक्ष बागायतदारांना निमंत्रण देऊन त्यांना त्यांची द्राक्षे प्रदर्शनामध्ये विकण्यास संधी दिली होती. विशेष म्हणजे त्यांची द्राक्षे झीरो रेसिड्यू असल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीतून सिद्ध करून घेतले होते.
वाढीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये शेतकरी बाग रोग-कीडविरहित व चांगली वाढण्यासाठी प्राधान्य देतो. रेसिड्यू फ्री उत्पादन ही त्याचा पहिला प्राधान्यक्रम नसतो. मात्र राहिलेल्या शेवटच्या ४० ते ५० दिवसांमध्ये पहिल्या काळात केलेल्या व्यवस्थापन व फवारण्यानंतरही झीरो रेसिड्यू द्राक्ष मिळवू शकतो का, याकडे त्याचे लक्ष असते. या बद्दलची तांत्रिक माहिती या लेखातून घेऊ.
पहिल्या सत्रामध्ये खालील गोष्टीकडे लक्ष दिलेले असल्यास झीरो रेसिड्यू द्राक्षे मिळवणे शक्य आहे.
सुरुवातीच्या फवारण्या फक्त जरुरीप्रमाणे घेतलेल्या असतील. सध्या बागेच्या परिसरातील पुढील आठवड्यातील वातावरणाचे अंदाज अचूकतेने मिळवणे शक्य आहे. त्याचा वापर करून जर फवारणी अतिशय जरूर आहे तेव्हाच केलेल्या असल्यास फवारण्या कमी होतात. भर पावसाची वेळ टाळून पावसाआधी किंवा पावसाला उघडीप मिळाल्यानंतर फवारण्या केल्यानंतर फवारण्या अधिक कार्यक्षम व जास्त कालावधीसाठी काम करतात. अशा प्रकारचे व्यवस्थापन झालेले असल्यास फवारण्यांची संख्या कमी राहिली असेल.
सर्वसाधारणपणे फळधारणेच्या आधी फवारण्या केलेल्या असल्यास त्याचे उर्वरित अंश फळांवर काढणीपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून धोरणात्मक पातळीवर फळधारणेच्या आधी फवारण्या करून बागेमध्ये रोगांचे बीजाणू व किडींच्या अवस्था आटोक्यात ठेवल्यास नंतरच्या काळात जास्त फवारण्यांची गरज भासत नाही.
उदा. भुरीचे नियंत्रण घड फुलोऱ्यात आल्यानंतर ते मणी तयार होईपर्यंत चांगले केल्यास पुढील काळामध्ये भुरी जास्त त्रास देत नाही. कारण त्या काळामध्ये कॅनोपी कमी असल्यामुळे फवारणीचे कव्हरेज चांगले मिळते. भुरीच्या नियंत्रणासाठी चांगले कव्हरेज हे अतिशय महत्त्वाचे. फवारणीतून न मारले गेलेले बीजाणू वातावरण अनुकूल झाले की बागेत भुरी वाढवतात. म्हणूनच सुरुवातीच्या काळात भुरी चांगली नियंत्रित झाल्यास पुढे त्रास देत नाही. ओलांड्याला चिकटून राहिलेले घड भुरी व पिठ्या ढेकूण (मिली बग) वाढविण्यास मदत करतात. पालाशची कमरता असल्यामुळे पानांच्या वाट्या झाल्या तरी त्यातही भुरी वाढते. यासाठी सुरुवातीलाच उपाययोजना केलेल्या असल्यास भुरीसाठी उशिरा फवारण्या करण्याची गरज राहत नाही.
काही अपवादात्मक बुरशीनाशके फळधारणेच्या आधी फवारल्यास सुद्धा काढणीपर्यंत रेसिड्यू दाखवतात. उदा. डायमिथोमॉर्फ या बुरशीनाशकाची फवारणी ३५ दिवसांनंतर केलेली असल्यास त्याचे रेसिड्यू काढणीवेळी मण्यामध्ये मिळू शकतात. हे रसायन डाऊनी मिल्ड्यूसाठी प्रभावी आहे म्हणून याचा वापर भरपूर होतो. त्याच बरोबर त्याची एमआरएल ३ पीपीएम आहे. म्हणून निर्यातीसाठी उर्वरित अंश मिळाले तरी ते एमआरएल ३ पीपीएम पेक्षा कमी असल्यामुळे ही द्राक्षे निर्यात होऊ शकतात.
पण त्याचे रेसिड्यू एक पीपीएम पेक्षा जास्त झाली तरी द्राक्षे रेसिड्यू फ्री या निकषामध्ये फेल होतात. म्हणून आता फवारणीचे रेकॉर्ड तपासून घ्यावे. बागेमध्ये डायमिथोमॉर्फ ३५ दिवसांनंतर वापरलेले असल्यास झीरो रेसिड्यू मिळवण्यासाठी आता उरलेल्या ५० दिवसांत प्रयत्न करता येणार नाहीत. अनेक्च्शर ५ प्रमाणे ज्या कीडनाशकांचा (कीटकनाशक व बुरशीनाशक) पीएचआय ६६ दिवसांपेक्षा जास्त आहे, अशा कीडनाशकांचा वापर मध्यम धोक्याच्या काळामध्ये एक वेळा जास्त केलेला असल्यास झीरो रेसिड्यू उत्पादन घेणे शक्य नाही.
वरील मुद्द्यांकडे लक्ष दिलेले असल्यास झीरो रेसिड्यू द्राक्ष उत्पादन यानंतरही घेणे शक्य आहे.
झीरो रेसिड्यू फ्री उत्पादन घेण्यासाठी...
सर्व कीडनाशकांचा वापर संपूर्णपणे थांबवावा. गरज भासल्यास फक्त जैविक नियंत्रणावर लक्ष केंद्रित करावे. सध्याच्या वातावरणामध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा स्पे. ही बुरशी किंवा बॅसिलस सबटिलीस हे जिवाणूवर आधारित कीडनाशक फवारणीसाठी ३ ते ५ ग्रॅम किंवा मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे वापरता येईल. हे जैविक नियंत्रक घटक ठिबकद्वारे दिल्यास वेलीच्या मुळांद्वारे वर जाऊन वेलींची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
(प्रमाण ः शेवटच्या तीस दिवसांमध्ये दहा दिवसांच्या अंतराने एकरी एक लिटर या प्रमाणे पुन्हा पुन्हा देता येईल.) मुळांमध्ये या जैविक घटकांची वाढ झाल्यास ते वेलींना फिनॉलिक संयुगे तयार करण्याचे संदेश पाठवतात. त्यामुळे वेलीतील व घडातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. किडींच्या नियंत्रणासाठी बिव्हेरिया, मेटारायझीम आणि व्हर्टिसिलिअस यांचा वापर करता येईल.
एप्रिलमध्ये पक्व होणाऱ्या द्राक्षामध्ये तापमान जास्त व आर्द्रता कमी झाल्यानंतर लाल कोळी या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. या काळात जैविक नियंत्रक घटकांची कार्यक्षमता थोडी कमी होते. अशा वेळी जर बागेमध्ये कोळी किंवा रोगांचा (भुरी) प्रादुर्भाव कुठे दिसल्यास किंवा प्रतिबंधात्मक फवारणी म्हणून बुरशीनाशकाच्या वापराऐवजी नुसत्या सल्फरची फवारणी करता येईल. सध्या बाजारामध्ये मायक्रोनाईज सल्फर (एक मायक्रॉनपेक्षा कमी आकार असलेला) डब्ल्यूजी किंवा एससी फॉर्म्यूलेशन्समध्ये उपलब्ध आहे.
त्यांचा वापर फवारणीद्वारे करताना इलेक्ट्रोस्टॅटिक फवारणी यंत्र वापरल्यास मण्यावर सल्फरचे डाग व उग्र वास कमी प्रमाणात राहील. जैविक नियंत्रके बुरशीनाशकाच्या वापराने मरतील, मात्र सल्फर १० हजार पीपीएम पर्यंत वापरल्यास ट्रायकोडर्मासारखी बुरशी संपूर्णपणे मरत नाही. सल्फर जैविक नियंत्रकांसाठी फारसे त्रासदायक नाही. त्याचा वापर या काळातही शक्य आहे. सल्फरचे उर्वरित अंश हे कीडनाशकाचे म्हणून मानले जात नाहीत. त्यामुळे निर्यातीसाठी सुद्धा सल्फर उर्वरित अंश पाहिले जात नाहीत.
सुधारणेसाठी (बायोरेमिडीशनसाठी) जिवाणूंचा वापर - सामान्यतः बुरशीनाशकांचे उर्वरित अंश फवारणीनंतर वातावरणामधून हळूहळू कमी होतात. वातावरणातील किरणांमुळे (रेडिएशन) होणारे विघटन व ऑक्सिडेशन होऊन ते कमी होत असतात. त्याच प्रमाणे वातावरणातील जिवाणू मण्याच्या पृष्ठभागावरील उर्वरित अंशही त्यांनी तयार केलेल्या पेशीबाह्य विकरांद्वारे (एन्झाइम्स) विघटित करत असतात.
अशा प्रकारे विघटन अधिक कार्यक्षमतेने करणारे जिवाणू शास्त्रज्ञांनी तयार (कल्चर) केलेले आहेत. या जिवाणूंचे फॉर्म्यूलेशन्स उपलब्ध आहेत. उदा. बॅसिलस स्पे. हे सुरक्षित (जनरली रिगार्डेड अॅज सेफ - GRAS) या वर्गवारीत धरले जातात. हे जिवाणू कीडनाशकांचे उर्वरित अंश वातावरणात ज्या वेगाने विघटित होतात, त्यापेक्षा अधिक वेगाने विघटित करण्यास मदत करतात.
त्यामुळे सुरुवातीच्या काळात फवारलेल्या कीडनाशकांचे उर्वरित अंश थोड्या प्रमाणात राहिलेले असल्यास या जिवाणूंच्या फवारणीमुळे ते वेगाने कमी होण्यास मदत होईल. असे जिवाणू एनआरसी, ग्रेप्स यांनीही तयार केले आहेत. त्याच बरोबर काही खासगी कंपन्यांनी बाजारात आणलेले आहेत. अशा जिवाणूंचा वापर शेवटच्या तीस, चाळीस दिवसांत दोन ते तीन वेळा केल्यास रेसिड्यू नष्ट होण्यास चांगली मदत मिळेल.
या सर्व प्रकारच्या व्यवस्थापनातून तयार केलेल्या रेसिड्यू फ्री द्राक्ष उत्पादनासाठी चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल. स्थानिक बाजारातही रेसिड्यू फ्री द्राक्ष उत्पादनांना चांगला दर मिळवून देणारी विपणन व्यवस्था उभी करावी लागेल.
- डॉ. एस. डी. सावंत, ९३७१००८६४९
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे माजी संचालक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.