मुकुंद पिंगळे
Nashik News : नाशिक शहरातील गोविंदनगर परिसरातील भास्कर व दिनकर या कांबळे बंधूंनी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात ओळख तयार केली आहे. द्राक्षांच्या विविध जातींच्या लागवडीचा त्यांचा गाढा अनुभव आहे. युरोपीय निर्यातीसह ‘बेस्ट ग्रेप्स’ या ब्रॅण्डद्वारे थेट ग्राहक विक्री व्यवस्थाही त्यांनी उभारली आहे. ‘पेटंटेड’ आरा वाणाच्या द्राक्षांना यंदा किलोला २६० रुपयांपर्यंत दर मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत.
नाशिक शहरातील गोविंदनगर परिसरातील शेतकरी कै. विष्णू भिकाजी कांबळे (नाना) यांनी १९७० पासून द्राक्ष शेतीला सुरुवात केली. आज ते हयात नाहीत. पण त्यांची मुले भास्कर व दिनकर वडिलांकडून लाभलेल्या मार्गदर्शनातून त्यांचाच प्रयोगशीलतेचा वारसा ४० वर्षांपासून चालवीत आहेत. कोणे (ता. त्र्यंबकेश्वर) येथे ७० एकर, तर जलालपूर (ता. जि. नाशिक) येथे त्यांची १३ एकर शेती आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे द्राक्षतज्ज्ञ रॉड्रीगो ऑलिव्हा यांचे मार्गदर्शन ते घेतात. त्यातून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात अनेक वर्षे सातत्य ठेवले आहे. रासायनिक अवशेषमुक्त व्यवस्थापनात शिफारशीप्रमाणे कीडनाशकांचा वापर होतो. घडांचे पक्ष्यांपासून नुकसान टाळण्यासाठी बर्ड नेटचा वापर होतो.
द्राक्ष वाण संग्रहालय
कोरोना काळापर्यंत कांबळे यांच्याकडे ४२ एकर द्राक्ष क्षेत्र होते. त्यानंतर अनेक समस्या निर्माण झाल्याने भाजीपाला, पेरूकडे ते वळले. आज द्राक्षाखाली १७ एकर क्षेत्र आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्या दोन्ही ठिकाणी शेती आहे तेथे द्राक्ष वाण संग्रहालय उभारले आहे. यात अनाबेशाही, काळी साहेबी, फकडी हे दुर्मीळ वाण आहेत. यातच व्यावसायिक स्तरावर थॉम्पसन व क्रिमसन एक एकर, फ्लेम सीडलेस २ एकर, आरा सुमारे साडेअकरा एकर आहे. शिवाय फॅंटसी, रेड ग्लोब, लिची फ्लेवरयुक्त सेवन बार, मेडिका, लेमन ग्रास, करवंद फ्लेवर असे विविध वाण थोड्या थोड्या क्षेत्रावर मिश्र पद्धतीने लावले आहेत. या माध्यमातून दुर्मीळ वाणांचेही संवर्धन होत आहे. अनेक जण या वाणांबाबत जाणून घेण्यासाठी येथे भेट देतात.
‘बेस्ट ग्रेप्स’ ब्रॅण्ड
एकूण उत्पादनाच्या ८० टक्के मालाची निर्यात होते. उर्वरित २० टक्के द्राक्षांची थेट ग्राहकांना
ऑनलाइन पद्धतीने विक्री होते. त्यासाठी २०१४ मध्ये ‘बेस्ट ग्रेप्स’ हा ब्रॅण्ड तयार केला. त्यासाठी bestgrapes.co.in या नावाने वेबसाइट ही सुरू केली आहे. सोशल मीडियाच्या विविध स्रोतांद्वारेही आकर्षक पद्धतीने द्राक्षांची जाहिरात करण्यात येते. या माध्यमातून सक्षम विक्री व्यवस्था उभी करून शेतीतील नफा वाढवणे शक्य झाले आहे. ग्राहकांकडून ‘ऑर्डर’ प्राप्त झाल्यानंतर दोन किलोच्या पॅकिंगमध्ये ‘कुरिअर’द्वारे माल पाठविला जातो. कोणत्याही वाणाची द्राक्षे घेतली, तरी त्यास ४६० रुपये (प्रति दोन किलो) दर निश्चित केला आहे. वाहतुकीत माल खराब झाल्यास तो बदलून दिला जातो. ‘ग्लोबल गॅप’ प्रमाणित शेतकरी असल्याने ग्राहकांत विश्वास तयार झाला आहे. भास्कर यांचा मुलगा यश, मुलगी निकिता व पुतण्या अमित हे मार्केटिंगची जबाबदारी
पाहतात. मनोज फडके, स्वप्नील कापसे, समीर पंडित यांचे सहकार्य लाभते.
बागेत या, द्राक्षे तोडून खा
विविध वाणांच्या द्राक्ष लागवड संधीचा फायदा घेऊन कांबळे बंधूंनी द्राक्ष पर्यटन ही संकल्पना सुरू केली आहे. यात पर्यटक वा ग्राहक बागेत येऊन विविध वाण पाहू शकतात. आपल्याला हव्या त्या वाणाची द्राक्षे हाताने तोडून खाऊ शकतात. त्यासाठी प्रति व्यक्ती ३०० रुपये दर आकारला जातो. बारा वर्षांच्या आतील मुलांना ही सुविधा मोफत आहे. किलोला २०० रुपये दराने ग्राहक द्राक्षे घरी घेऊन जाऊ शकतात. द्राक्षे ‘रेसिड्यू फ्री’ असल्याची ग्राहकांना हमी मिळते. येत्या काळात कृषी पर्यटनाला विस्ताराचे रूप देण्याचे नियोजन आहे. दिनकर यांचा हॉटेल मॅनेजमेंट विषयातील पदवीधर मुलगा आशिष या ठिकाणी तारांकित स्तरावरील जेवणाची सुविधा देतो. द्राक्ष उत्पादन, त्याचे आरोग्यवर्धक महत्त्व यासंबंधी पर्यटकांना सविस्तर माहिती दिली जाते.
‘सह्याद्री’चे पाठबळ
कांबळे एकरी ८ ते ९ टनांपर्यंत द्राक्ष उत्पादन घेतात. मोहाडी-नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीतर्फे त्यांचा माल जर्मनीत निर्यात होतो. ‘सह्याद्री’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभते. कांबळे सह्याद्रीचे भागधारकही आहेत. दक्षिण आफ्रिका व ब्राझील या देशांना भेटी देऊन जागतिक स्तरावरील द्राक्ष तंत्रज्ञान त्यांनी अभ्यासले आहे.
पेटंटेड आरा वाणाचा प्रयोग
सह्याद्री’च्या माध्यमातूनच जागतिक ‘पेटंटेड’ ‘आरा’ वाणाचा प्रयोग कांबळे यांनी केला आहे. दोन एकरांत एकरी आठ टनांप्रमाणे उत्पादन घेतले आहे. आकर्षक लाल रंग, गोड चव, कुरकुरीतपणा या वैशिष्ट्यांमुळे या द्राक्षांना ग्राहक व व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी दिसून आली. सह्याद्रीतर्फे नुकताच ‘कॉन्फरन्स कॉल’द्वारे या द्राक्षांचा लिलाव झाला. त्यातील शिवार खरेदीत कांबळे आपल्या आरा द्राक्षांना किलोला २०० ते २६० रुपये उच्चांकी दर मिळवण्यात यशस्वी ठरले.
भास्कर कांबळे, ९४२२७६९१२०
दिनकर कांबळे, ९४२३९६३०३०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.