World Youth Day Special Article: युवा शक्तीच्या सामर्थ्याचा, आकांक्षांचा आणि स्वप्नांचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून दरवर्षी १२ ऑगस्ट हा दिवस जागतिक युवा दिन म्हणून साजरा केला जातो. जगाच्या कानाकोपऱ्यातील तरुणांची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थिती भिन्न असली, तरी शिक्षण, रोजगार, सुरक्षितता, सन्मान, समान संधी आणि स्वतःचे भविष्य घडविण्याची आकांक्षा मात्र सर्वत्र समान आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या जागतिक युवा दिनासाठी ‘वेगवेगळ्या परिस्थिती, समान आकांक्षा’ ही संकल्पना अधोरेखित करण्यात आली आहे..आज जगात १५ ते २४ वयोगटातील तरुणांची संख्या जवळपास १.३ अब्ज झाली आहे. त्यापैकी सुमारे ७६ कोटी तरुण कमी व निम्न-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत राहतात. जगातील जवळपास ६० टक्के तरुण केवळ दहा देशातील आहेत आणि त्यामध्ये भारताचाही समावेश होतो. भारताची लोकसंख्या २०२५ मध्ये सुमारे १४६.४ कोटींपर्यंत वाढल्याचे संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधीचा अंदाज आहे..या विशाल लोकसंख्येत तरुणांचा मोठा वाटा असल्याने भारताकडे ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ अर्थात लोकसंख्यात्मक लाभाचे मोठे भांडवल आहे. युनिसेफच्या २०२५ च्या आकडेवारीनुसार भारतात १५ ते २९ वयोगटातील ३७.१ कोटी तरुण आहेत. ही जगातील सर्वात मोठी युवा ताकद आहे. जागतिक पातळीवरही हीच स्थिती दिसते. संयुक्त राष्ट्रांच्या ‘जागतिक लोकसंख्या २०२६ च्या युवा पिढीची लोकसंख्यात्मक स्थिती आणि आव्हाने’नुसार जगात १५ ते २४ वयोगटातील तरुणांची संख्या १.३ अब्जांच्या पुढे गेली असून आगामी दशकांमध्ये त्यांचे भौगोलिक वितरण आणि आर्थिक परिस्थिती बदलणार आहे.लोकसंख्यात्मक दृष्टीने पाहता हा लाभ कायमस्वरूपी नसतो..Youth Protest: देशात युवक कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य : पंतप्रधान.कामाच्या वयातील लोकसंख्येला शिक्षण, कौशल्य, आरोग्य आणि रोजगार मिळाला तर उत्पादन, बचत गुंतवणूक वाढते आणि करआधार विस्तारून आर्थिक विकासाला चालना मिळते. याउलट शिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगार मिळत नसेल, कौशल्य आणि उद्योगांच्या गरजांमध्ये तफावत असेल तर हीच लोकसंख्या आर्थिक संधीऐवजी सामाजिक-आर्थिक विषमतेचे कारण ठरू शकते. त्यामुळे २०२६ मध्ये युवा दिन साजरा करताना ‘तरुण किती आहेत?’ यापेक्षा ‘या तरुणांना आपण किती सक्षम करीत आहोत?’ हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो..रोजगाराचा प्रश्न कायमअखिल भारतीय उच्च शिक्षणावरील सर्व्हेक्षणानुसार, उच्च शिक्षणातील विद्यार्थी संख्या २०१४ ते १५ मधील ३.४२ कोटींवरून २०२१ ते २२ मध्ये ४.३३ कोटींवर पोहोचली; म्हणजेच सुमारे २६.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तथापि, उच्च शिक्षणाचा विस्तार झाला असला, तरी शिक्षणातून मिळणारी पदवी आणि रोजगार बाजारपेठेला अपेक्षित कौशल्ये यातील दरी गंभीर आहे. आर्थिक सर्व्हेक्षण २०२४-२५ नुसार, १५ ते २९ वयोगटातील केवळ ४.९ टक्के युवकांना औपचारिक व्यावसायिक किंवा तांत्रिक प्रशिक्षण, तर २१.२ टक्के युवकांना अनौपचारिक प्रशिक्षण मिळाले आहे. .तर पदवीधरांपैकी सुमारे ५०.३ टक्के कामगार अर्ध-कुशल असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या २०२५ मधील आकडेवारीनुसार १५ ते २९ वयोगटातील युवा बेरोजगारीचा दर सुमारे १४.६ टक्के आहे. म्हणजेच प्रत्येक १०० युवा कामगारांपैकी सुमारे १५ जण रोजगाराच्या शोधात असूनही कामापासून दूर आहेत..शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार देशातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील २५ टक्के युवक शिक्षण, रोजगार किंवा कौशल्य प्रशिक्षणापासून (नीट) दूर आहेत. विशेषतः या वयोगटातील नीट दर पुरुषांसाठी ८ टक्के, तर महिलांचा तब्बल ४२.२ टक्के आहे यातून लैंगिक विषमता अधोरेखित होते. जागतिक स्तरावरही स्थिती चिंताजनक आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या २०२५ च्या अंदाजानुसार जागतिक युवा बेरोजगारी दर सुमारे १२.४ टक्के तर नीट श्रेणीत तब्बल २६ कोटी तरुण शिक्षण, रोजगार किंवा प्रशिक्षण या तिन्हींपासून दूर आहेत. अनेकदा रोजगार शोधणारा तरुण बेरोजगार म्हणून नोंदला जातो; पण शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या तिन्हींपासून दूर असलेला तरुण अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहाबाहेर राहतो. .AI Opportunities for Youth: 'मुंबई टेक वीक'मधून युवकांना मिळणार एआय क्षेत्रात नव्या संधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.यातील चिंताजनक बाब म्हणजे शिक्षण आणि रोजगार यांच्यातील विसंगती! पदवी मिळाल्यानंतरही अपेक्षित दर्जाचा रोजगार मिळत नसल्याची समस्या वाढत आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ऑटोमेशन, गिग इकॉनॉमी, हरित अर्थव्यवस्था आणि डिजिटल व्यवसाय यामुळे रोजगाराचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे पारंपरिक पदवीपेक्षा डिजिटल साक्षरता, एआय कौशल्य, डेटा विश्लेषण, संवादकौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमतेचे महत्त्व वाढत आहे. म्हणून भारतासमोरील आव्हान केवळ ‘नोकऱ्या निर्माण करण्याचे’ नाही; तर ‘भविष्यातील नोकऱ्यांसाठी तरुणांना तयार करण्याचे’ आहे..आजच्या युवापिढीसमोर स्मार्टफोन, इंटरनेट, ऑनलाइन शिक्षण, डिजिटल पेमेंट आणि ए आयच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध होत आहेत. तथापि, डिजिटल प्रवेश आणि आवश्यक डिजिटल कौशल्य यांच्यातील दरी अद्यापही कायम आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सुचित केल्याप्रमाणे जगातील तरुणांच्या आकांक्षा शिक्षण आणि रोजगारापुरत्या मर्यादित नसून त्यांना मानसिक आरोग्य, निर्णयप्रक्रियेत सहभाग, समान संधी आणि चांगल्या भविष्यासाठी सुरक्षित सामाजिक वातावरणही हवे आहे. .‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट २०२५ नुसार, २०३० पर्यंत जगभरात सुमारे १७ कोटी नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे; मात्र त्याच काळात सुमारे ९.२ कोटी रोजगारांचे स्वरूप बदलणार किंवा ते कमी होणार आहे. विशेष म्हणजे, आज अस्तित्वात असलेल्या कौशल्यांपैकी सुमारे ४० टक्के कौशल्यांमध्ये २०३० पर्यंत बदल करण्याची गरज भासणार आहे..जगातील सर्वांत मोठी युवाशक्ती असलेल्या भारतासाठी या संधीचे आर्थिक सामर्थ्यात रूपांतर करण्यासाठी केवळ पदवी देणारी शिक्षणव्यवस्था पुरेशी ठरणार नाही. तर युवावर्गाला गुणवत्तापूर्ण शिक्षणातून जागतिक दर्जाची आधुनिक कौशल्ये, संशोधन, नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाशी जोडत त्यांच्यासमोर रोजगाराबरोबरच उद्योजकतेच्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी शासन, उद्योग, विद्यापीठे, संशोधन व स्वयंसेवी संस्था आणि समाज यांनी संयुक्तपणे ‘शिक्षणातून पदवी, पदवीतून कौशल्य, कौशल्यातून रोजगार आणि रोजगारातून उद्योजकतेकडे जाणारी सक्षम परिसंस्था उभारावी लागेल..राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या कौशल्याधारित, बहुविषयक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या दृष्टिकोनानुसार उच्च शिक्षणाला उद्योग, संशोधन, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेशी अधिक प्रभावीपणे जोडून अभ्यासक्रमांची उपयोजित उद्योगानूरूप रचना, प्रत्यक्ष प्रशिक्षण, अप्रेंटिसशिप, इंटर्नशिप आणि प्रकल्पाधारित शिक्षणाला चालना द्यावी लागेल.९७३०४७३१७३(लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.