Pune News : वीज नसल्यामुळे राज्याच्या कृषी आयुक्तालयाचे अर्ध्याहून अधिक विभाग आठवडाभरापासून अंधारात आहेत. तांत्रिक दुरुस्ती नेमकी कोणी आणि कोणामार्फत करायची असा पेच तयार झाला असून, आयुक्तालयाचे कामकाज ठप्प झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करीत आहेत.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, साखर संकुल इमारतीमधील तळमजल्यावर कृषी विभागाचा मुख्य आस्थापना विभाग आहे. दुसऱ्या मजल्यावरील विस्तार व प्रशिक्षण संचालक, प्रक्रिया व नियोजन संचालक, आत्मा संचालक, नैसर्गिक आपत्ती कक्ष, रब्बीचे नियोजन करणाऱ्या सर्व कक्षांमधील वीजपुरवठा सोमवारपासून (ता. १४) बंद आहे.
कृषी आयुक्तालयाच्या या विभागांना वीजपुरवठ्याची स्वतंत्र यंत्रणा नाही. सहकार खात्याच्या अखत्यारित असलेल्या साखर संकुलच्या मुख्य वीज वितरण प्रणालीमधून कृषी विभागाला वीज पुरवली जाते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सुरुवातीला महावितरणकडे अनेक तक्रारी केल्या. परंतु साखर आयुक्तालयाची वीज जोडणी ‘अति उच्चदाब ग्राहक’ या श्रेणीत येते. त्यामुळे महावितरणची जबाबदारी फक्त साखर संकुलच्या प्रवेशद्वारापर्यंत वीजपुरवठा करण्याची होती व महावितरणच्या पुरवठ्यात काहीही अडचण नव्हती. खरा बिघाड साखर संकुलमधील प्रणालीत झाला होता व या प्रकरणात दुरुस्तीचे काम संबंधित ग्राहकालाच करावे लागते, असे महावितरणने स्पष्ट केले. यानंतरदेखील ही दुरुस्ती कोणी करायची या चर्चेतच आठवडा गेला.
दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रकाश जाधव यांना कृषी आयुक्तालय अंधारात असल्याचे कळल्यानंतर त्यांनी स्वतः पाठपुरावा केला. ‘साखर संकुलमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर प्रतिदिन १५ ते २० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम शासनाच्या तिजोरीतून दिली जाते. अशा कर्मचाऱ्यांना दोन दोन आठवडे विनाकाम वेतन देणे सरकारी यंत्रणेला शोभत नाही. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे.’. काही कृषी अधिकाऱ्यांनी थेट कृषी आयुक्तालयातील वरिष्ठांकडे धाव घेतली. त्यांनी गंभीर दखल घेत पाठपुरावा सुरू केला. दुसऱ्या बाजूला काही अधिकारी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनाही भेटले. त्यांनीही दुरुस्तीचे आदेश दिले. मुळात ही बाब आमच्या निदर्शनास आधीच आणून द्यायला हवी होती, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे कालपर्यंतदेखील (ता.२२) कर्मचारी अंधारातच बसलेले होते.
देखभाल होत नसल्याचा परिणाम
महावितरणच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले, की वेळीच देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे ही समस्या उद्भवली असून, या बिघाडाशी महावितरणचा काहीही संबंध नाही. साखर संकुलकडे होणारा पुरवठा उच्च वीज ग्राहक श्रेणीचा आहे. अशा ग्राहकाला त्यांच्याकडील अंतर्गत वीजपुरवठा प्रणालीशी वेळोवेळी देखभाल ठेवावी लागते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.