
Dairy Business Story : सुरुवातीच्या टप्प्यात महिलांचे गटांच्या माध्यमातून कामकाज सुरू होते. पुढील टप्प्यात व्यावसायिक विस्तार झाला. युवा मित्र संस्थेच्या माध्यमातून २०१६ मध्ये ‘सावित्रीबाई फुले शेळी पालक उत्पादक कंपनीची संकल्पना पुढे आली. सामाजिक-आर्थिक सुधारणा आणि शेळीपालनात व्यावसायिक दृष्टिकोन रुजवून महिलांच्या सरासरी वार्षिक उत्पन्नात ५० टक्के वाढ हे उद्दिष्ट कायमच ठेवले होते.
त्यातूनच शाश्वत उत्पन्नाची हमी देणारे मॉडेलच विकसित झाले. आठ वर्षांपूर्वी कंपनीची सुरुवात झाल्यानंतर भांडवल उभारणीसाठी महिलांनी एक हजार रुपयांप्रमाणे ‘शेअर्स’ घेतले. त्यातून २२ लाखांचे भागभांडवल उभे राहून महिला या कंपनीचा भागच झाल्या. पुढे कंपनीचा विस्तार होण्यासाठी नाब किसान यांच्याकडून ७५ लाखांचे अर्थसाह्य मिळाले. त्यातून पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंपनीने योजना आखली. मनीषा पोटे यांच्याकडे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी आली.
कारला आशियातील पहिला प्रकल्प
धोरणे निश्चित करून एकेक टप्पा पार होत गेला. त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे, कंपनीने नाशिक-पुणे महामार्गालगत बेलांबे शिवारात शेळीच्या दुधावर आधारित आशिया खंडातील पहिला भव्य प्रकल्प साकारला. महिलांचा सक्रिय सहभाग, संघटन वृत्ती आणि व्यावसायिक धोरण यातून हे घवघवीत यश मिळवता आले. शेळी संगोपन, खरेदी व विक्री, दूध उत्पादन, दुधावर प्रक्रिया व संबंधित सेवा या पाचही स्तरांवर कंपनीची आज घोडदौड सुरू आहे. आजमितीला नाशिक जिल्ह्यात सिन्नर आणि नगर जिल्ह्यातील संगमनेर, राहता व अकोले तालुक्यांतील १२० गावांमध्ये व्यावसायिक पद्धतीने हा शेळीपालन व्यवसाय विस्तारला आहे.
व्यवहारातील मक्तेदारी संपविली
शेळी खरेदीतील ठरावीक घटकांची मक्तेदारी मोडून काढून कंपनीने खरेदी-विक्री व्यवस्थाही उभी केली. व्यवहारात पारदर्शकता आणली. महिलांना व्यावहारिक ज्ञान आल्याने खरेदी- विक्रीचे निकष ठरवून आज कामकाज होऊ लागले आहे. मनमानी दर मोडीत काढत सुरुवातीच्या टप्प्यात २१० रुपये प्रति किलो दराने शेळ्यांची खरेदी व विक्री सुरू केली. त्यामुळे तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांमध्ये विकली जाणारी शेळी दुपटीने विकली जाऊ लागली आहे. केवळ शेळी पाहून पूर्वी व्यवहार व्हायचे. आता महिला वजनावर व्यवहार करून लागल्याने मटण विक्रेते व व्यापारी यांची मक्तेदारी संपुष्टात आली.
‘पशुसखी’ ही अभिनव संकल्पना
कंपनीपासून ५० किलोमीटर अंतराचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले. त्यानुसार आज ८० गावांमध्ये विस्तार झाला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर समन्वय व व्यवस्थापनाच्या अंगाने गावनिहाय ‘पशुसखी’ ही अभिनव संकल्पना पुढे आणली आहे. एका गावात एक महिला सभासदावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार स्थानिक पातळीवर शेळ्यांवर उपचार, उत्पादनाच्या नोंदी, दूध संकलन व निविष्ठा पुरवठा या कामांमध्ये ‘पशुसखी’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आता शेळ्यांचे आजार कमी होऊन त्या सुदृढ होऊन दूध संकलन वाढत आहे. त्यांची मरतुक मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.
दहा ठिकाणी दूध संकलन
पूर्वी शेळीच्या दुधाचा वापर घरगुती स्तरावर होता. मात्र त्यातील औषधी गुणधर्मांच्या तुलनेत मिळणारा दर अत्यल्प होता. यातील सर्व व्यवहार्य बाजू तपासून शेळीच्या दुधाला स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करण्यासाठी कंपनीने स्वतंत्रपणे १० ठिकाणी दूध संकलन केंद्रे सुरू केली आहेत. दररोज एक हजार ते १२०० लिटर दूध संकलन होते. ‘बल्क कुलर’ही कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे दरांतही वाढ झालीआहे. दुधावर प्रक्रिया करून नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित झाल्याचा फायदा होत आहे. दुधातील फॅट, प्रथिने तपासणीसाठी अद्ययावत यंत्रांची सुविधा आहे. संकलन केंद्रात निश्चित तापमानाला दूध आणून मगच पुढे ते पुढील प्रक्रियेसाठी कंपनीच्या वाहनातून पाठवले जाते. गुणवत्ता तपासणी व प्रक्रियेसाठी कुशल मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे.
(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)
अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.