Women's Struggle : फुफाट्याची आणि काट्यांची बायांना जन्मजात ओळख असते

बायांच्या जगण्याइतकाच रखरखीत माळ लागतो. पाय रोवून बाया या सगळ्यांवरून चालत जातात. फुफाट्याची आणि काट्यांची बायांना जन्मजात ओळख आहे.
Women's Struggle
Women's StruggleAgrowon
Published on
Updated on

बालाजी सुतार

‘या सुन्नबधीर मातकट वाटेवरून बाया शिवारात कामाला जातात. या वाटेची सुखदु:खं बायांना माहित आहेत आणि बायांची वाटेला. वाटेवर उन्हाने सणकून तापणारा पांढरमातीचा फुफाटा (Pandharamati Fufata) आहे आणि वाटेकडेला शुष्क पिवळ्या रंगाचं खुरटं गवत असतं.

या गवतात दबा धरून बसलेले रानकाटे असतात. मध्येमध्ये बायांच्या जगण्याइतकाच रखरखीत माळ लागतो. पाय रोवून बाया या सगळ्यांवरून चालत जातात. (Movement of Women)

फुफाट्याची आणि काट्यांची बायांना जन्मजात ओळख आहे. माळावरचा रखरखाटही बायांना परका वाटत नाही. काही केल्या बाया अंतरीची ओल कोरडू देत नाहीत.

हा परिच्छेद माझ्या एका कथेतला आहे. खेड्यातल्या; विशेषत: कृषिजीवनाशी सबंधित असलेल्या, स्वत:च्या शेतीत किंवा इतरांच्या शेतीत रोजगाराने काम करणा-या बायकांच्या आतल्या-बाहेरच्या जगण्याचा वेध घेण्याचा प्रयत्न मी या काही ओळींमधून केला होता.

हा अर्थातच फार अपुरा वेध आहे याची मला कल्पना आहे. या बायांच्या श्रमाला फुल आणि त्यांच्या कष्टावर आपुलकीची एखादी फुंकर आपल्या एकूण व्यवस्थेकडून दिली जाते का या प्रश्नाचं उत्तर फार विपरीत येतं.

माझ्या भोवतालात अशा असंख्य बाया आहेत, ज्या जन्मल्या घरी कळत्या वयापासून शेतातल्या मातीत राबत होत्या आणि नंतर लग्न होऊन आल्या घरीही त्यांनी शेवटपर्यंत तेच केलं.

ढोबळपणे पाहिलं तरी लक्षात येतं की शेतकरी पुरुषाचे कष्ट त्याच्या रानात सांडत असतात, पण शेतकरी कुटुंबातल्या बायांना घर आणि शिवार अशी दुहेरी झुंज द्यावी लागते.

अर्थात ही अशी झुंज फक्त शेतकरी कुटुंबातल्याच बायांना द्यावी लागते असं नाही, एकूणच आपल्याकडे सर्व स्तरांतून येणा-या बायांना असं दुहेरी झुंजावं लागतं.

सकाळी किंवा पहाटे सगळ्यांच्या आधी उठून सडासारवणापासून स्वैपाकापर्यंत आणि घरातल्या लोकांना जेवू खाऊ घालून, भांडीकुंडी घासून, पायातळातला वणवा सोसत इकडून तिकडून चार सहा घागरी पाणी भरून मग लगोलग शेतात जाऊन पुन्हा तिथे झोंबी द्यावी लागते.

Women's Struggle
Women Empowerment : राष्ट्र विकासासाठी महिला सक्षमीकरण आवश्यक

नवरा मायाळू, जीव लावणारा असेल तर ही झुंज कदाचित जराशी सुसह्य होत असेल, पण बायकोशी गोड शब्दात काही बोलावं, तिला जाणवेलशा पद्धतीने तिच्यावर जीव लावावा हे खेड्यातल्या शेतकरी कुटुंबात पाहायला मिळणं कठीणच.

अहोरात्र राबत राहताना साध्या साध्या सुखांना, नव्हे; साध्या साध्या गरजांनाही पारख्या होत केवळ आला दिवस रेटत राहणं हेच ज्यांचं भागधेय असतं अशा या बाया. स्वत: शेतीत राबणा-या कवयित्री कल्पना दुधाळ त्यांच्या ‘अधांतरी’ नावाच्या एका कवितेत म्हणतात.

‘आईनं तिच्या बापाला लुगडं मागितलं

तर दिली तव्हाच मेली म्हणाला

भावाला मागितल्यावर

भिका-याला नाय दिली ऐकलं

नव-याला मागितलं

तर हक्कानं शिव्या देऊन गेला...’

एका गरजेच्या वस्त्रासाठी होणारी ही ओढाताण, आर्थिक दारिद्र्यातून येणारी असली तरी तिच्या मुळाशी आणखी एक कारण असतं ते नात्यांमध्ये न उरलेल्या जिव्हाळ्याचं.

बायांच्या शोषणाच्या लाख त-हा आपल्या व्यवस्थेत आहेत. दलितांवर किंवा आणखीही इतर अनेक उपेक्षित समाजघटकावर होणा-या अन्यायाबद्दल नेहमीच बोललं जातं.

त्याविरोधात आवाज उठवण्याचे अनेक मार्गही कायद्याने उपलब्ध करून दिलेले आहेत. पण पदोपदी जिच्या दुबळ्या अस्तित्वाला आव्हान दिलं जातं, त्या बाईच्या हिंसक भोवतालासोबतच्या, कोरड्या गणगोतासोबतच्या आत्यंतिक विषम लढ्याला बळ मिळेल असा कुठलाही कायदा, कुठलीही परिणामकारक व्यवस्था आपल्याकडे नाहीय.

जाचजुलूम अगदीच असह्य झाला तर एखादीला घटस्फोट घेता येईल, पण पुढेही सुखाने जगता येईल, मोकळा श्वास घेता येईल असा अवकाश नसतोच.

‘दिली तव्हाच मेली’ किंवा ‘ज्या घराचा उंबरा ओलांडून आत प्रवेश केला तिथून तिरडीवरच बाहेर पडायचं’ अशी रूढ असलेल्या समाजात आजवर बायांना किती हजार प्रकारांनी सोसायला लागत असेल याची कल्पनाच करता येणे अशक्य.

Women's Struggle
Women Empowerment : आत्मनिर्भरतेसाठी महिलांनी विविध कौशल्ये शिकावीत

‘भाग्यवंताची बाईल मरते, अभाग्याचा बैल हो..’ हे वाक्य भालचंद्र नेमाडेंच्या कृषिजीवनाचा खोलवर वेध घेणा-या हिंदू या कादंबरीत येतं, तेव्हा ते वाचताना हादरून जायला होतं.

पिढ्यानपिढ्यांचं हे असलं म्हणणं असलेल्या शेतकरी कुटुंबात बाईला कितपत स्थान असतं? बैलाला निदान पोळ्याचा एक दिवस साजरा करता येतो.

घरादारातली सगळी कामं करून पुन्हा रानाशिवाराला घामाने न्हाऊ घालणा-या बाईला असा कुठला दिवस मिळतो? तिच्या जखमांवर जखमांना वरकरणी का होईना शोभिवंत करणा-या झुलीही मिळत नाहीत, आणि या उघड्या वाहत्या जखमा कुणाला दखलपात्रही वाटत नाहीत.

जन्म घेऊन अपरंपार कष्टत राहून एकेदिवशी मातीमोलाने मरून जाणं, एवढ्यासाठीच जन्म घ्यायचा बायांनी? ज्याचा बैल मरतो तो कुणबी अभागी आणि ज्याची बाईल मरते तो माणूस नशीबवान? ही कसली क्रूर मांडणी केली जातेय जन्मोजन्म? ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी’ म्हणणारा अभिजन समाज किंवा जमिनीला ‘काळी आई’ मानणारा कृषक समाज, या दोन्ही सामाजिक अवकाशांमध्ये प्रत्यक्षात अजूनही बाईला दासीपलीकडे किंमत नाही, हे अत्यंत कटू वास्तव आहे.

आईबहिणीवरून शिव्या घालणा-या समाजात याहून अधिक किंमत कधीकाळी मिळण्याची आशाही नाही.

हुंडा द्यावा लागतो म्हणून किंवा पुढेमागे मालमत्तेत वाटा मागू शकेल म्हणून आता बायांचा वंश गर्भातच मारण्याइतके आपण क्रूर झालो आहोत.

‘मुलापेक्षा मुलगी बरी, उजेड देते दोन्ही घरी’ वगैरे गोष्टी बोलणारे आपण स्वत:च्याच मुलीला उजेड पाहण्याची संधी नाकारतो, ही गोष्ट ‘माणूस’ म्हणून आपल्याला अंतर्बाह्य कलंकित करणारी आहे याची जाणीव ना सुशिक्षितांना होते, ना अडाण्यांना.

कोवळे जीव गर्भातून उपसून फेकून देण्याइतपत आपण लांच्छनास्पद प्रगती केली आहे.

काही दिवसांपूर्वी अंबाजोगाईमध्ये ‘मनस्विनी’ हा महिलांच्या संदर्भात काम करणा-या प्रकल्पाच्या डॉ. अरुंधती पाटील यांच्या निमंत्रणावरून एका खेड्यात गेलो होतो.

डॉ. अरुंधती आणि त्यांच्या प्रकल्पातील त्यांचे सहकारी अनेक वर्षांपासून ग्रामीण महिलांच्या अनेक समस्यांवर अनेक स्तरांवर काम करत आहेत.

त्यातलाच एक भाग म्हणून त्यादिवशी, आदेश बांदेकरांच्या ‘होम मिनिस्टर’ या मालिकेच्या धर्तीवर काही जोडप्यांमध्ये काही खेळ त्यांनी आयोजित केले होते.

Women's Struggle
Women Empowerment : केरसुणी निर्मितीतून बदलले अर्थकारण

नवराबायकोच्या नात्यात काही ओल, काही जिव्हाळा निर्माण करणे, किंवा आधीपासून असेल तर तो जिव्हाळा नेमका किती खोलवर आहे, याचा शोध घेण्यासाठी ‘मनस्विनी’कडून हा उपक्रम अनेक गावात राबवला जातो.

नवरा आणि बायकोने एकमेकांची ओळख करून देणं, एकमेकांमधले आवडते / नावडते गुण सांगणं, आवडता पदार्थ सांगणे, नव-याने फुलांचा गजरा तयार करून तो बायकोच्या केसांत माळणे अशा काही गोष्टी त्यात होत्या.

खेड्यातलं नवरा बायकोचं परस्परांशी वागणं अजिबात मोकळेपणाचं नसतं, हे खेड्यातच जन्मलो आणि वाढलो असल्यामुळे मी सातत्याने पाहत आलो आहे. त्यामुळे या उपक्रमांमध्ये ही जोडपी कशा पद्धतीने सहभागी होतात याबाबत मला उत्सुकता होती.

तिथे मी जे पाहिलं ते असं होतं की ‘बायकोच्या स्वभावातला आवडता गुण किंवा छंद कोणता?’ या प्रश्नावर बहुतेक नवरे ‘शिवणकाम करणे’ किंवा ‘स्वैपाक करणे’ असं सांगत होते आणि ‘नव-याचा नावडता गुण कोणता?’ या प्रश्नावर ‘लैच रागीट स्वभावाचे आहेत.

’ किंवा ‘दारू पिणे’ किंवा ‘घरी उशिरा येणे’ अशासारखी उत्तरे बायको देत होत्या. ही सगळीच उत्तरे फार प्रातिनिधिक होती. कुटुंबव्यवस्थेचा कणा असलेल्या एका महत्वाच्या नात्यामध्ये सहभागी परस्परांमध्ये अनोळखीची केवढी मोठी दरी आहे, हे सांगणारी ही उत्तरं होती.

‘शिवणकाम’ किंवा ‘स्वैपाक’ या ‘गरजा’ असू शकतात, ‘छंद’ नाही. यातली एखादी स्त्री सुंदर गाणं म्हणू शकत असेल, देखणी रांगोळी रेखाटू शकत असेल, कुणी एखाद्या हस्तकलेत पारंगत असेल, कुणी खूप चांगल्या नकला करत असेल पण ते एकाही नव-याच्या गावी नव्हतं.

‘दारू पितात’ किंवा ‘रागीट स्वभाव आहे’ असं ज्या स्त्रियांनी तिथे सांगितलं होतं, त्यांना कदाचित नंतर नव-याकडून धाकदपट मिळाला असण्याचीही शक्यता अजिबात नाकारता येत नाही.

बाई ही आपल्याइतकीच जिवंत अशी एक माणूस असते, तिला स्वत:च्या भावना, आशा, आकांक्षा असतात, जगण्याबद्दल, जगण्यातल्या सुखांबद्दल तिच्याही काही कल्पना असू शकतात, ही अत्यंत साधी गोष्ट आजवरच्या लाख वर्षांच्या इतिहासात पुरुषांना संपूर्णपणे मान्य झालेली आहे, असा काळ इथल्या व्यवस्थेत कधीही नव्हता.

Women's Struggle
Farmer Issues : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटना आक्रमक

हे वास्तव बदलण्यासाठी आता स्वत: बायांनीच पदर आणि कमरा कसायला हव्यात. इतिहास बदलण्याची नव्हे, इतिहास घडवण्याची ताकद बायांमध्ये असतेच असते.

स्वत्वाची जाणीव झाली की भल्याभल्या साम्राज्यांची सिंहासने उलथून टाकली जातात. आपल्यातल्या स्वत्वाचं सामर्थ्य बायांनी आजमावून पाहायलाच हवंय एकदा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com