Women Empowerment : केरसुणी निर्मितीतून बदलले अर्थकारण

वेताळ बांबर्डे (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री वेतोबा महिला स्वयंसाह्यता समूहाने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन नारळाच्या हिरापासून केरसुणी (झाडू) निर्मिती उद्योगाला सुरुवात केली. गावशिवार, जिल्ह्यातील व्यापारी गावामध्ये येऊन गटाकडून केरसुणीची खरेदी करतात. या गटाने आता गोवा राज्यातील बाजारपेठ मिळविली आहे. केरसुणी निर्मिती उद्योगातून गटातील महिलांना आर्थिक स्थिरता मिळाली आहे.
Broom Production
Broom ProductionAgrowon
Published on
Updated on

मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळपासून सात  किलोमीटर अंतरावर वेताळ बांबर्डे हे गाव आहे. आंबा (Mango), काजू, नारळ (Coconut), याशिवाय भात, नाचणी लागवड (Ragi Cultivation) मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्यात कुळीथ, चवळी, मूग लागवड असते. गावातील बहुतांश महिला शेतीकामात (Women Farmer) कार्यरत आहेत.

Broom Production
Women Empowerment : राष्ट्र विकासासाठी महिला सक्षमीकरण आवश्यक

महिला बचत गटाची सुरुवात

भात, नाचणी पिकांतून कुटुंबांना आर्थिक स्थिरता मिळत नव्हते. त्यामुळे काही महिलांना शेती, बागायतीमध्ये मजुरी करावी लागते. परंतु पारंपरिक शेती आणि मोलमजुरीतून आर्थिक प्रगती होणार नाही हे महिलांच्या लक्षात आले. त्यामुळे समविचारी महिलांनी एकत्र येत २००९ मध्ये श्री वेतोबा महिला बचत गटाची स्थापना केली.

गटाच्या माध्यमातून कडधान्यांचे उत्पादन घेऊन त्यावर प्रकिया करून पीठ विक्री सुरू केली. मात्र बचत गटांसाठी कोणत्याही ठोस योजना मिळाली नसल्याने हा बचत गट बंद पडण्याच्या मार्गावर आला होता. दरम्यान, २०१४ मध्ये जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामोन्नती अभियान (उमेद) सुरू झाले.

या अभियानांतर्गत गावातील रोहिणी चव्हाण, सुमन चव्हाण, आरती बांबर्डेकर, स्वाती बांबर्डेकर, विजया बांबर्डेकर, वैशाली चव्हाण, लक्ष्मी कामटेकर, नीशा चव्हाण, सुनीता चव्हाण, प्रमिला चव्हाण, विजया चव्हाण या महिलांनी पुन्हा एकत्र येऊन श्री वेतोबा महिला स्वयंसाह्यता समूह स्थापन केला. या समूहाला उमेदकडून फिरता निधी मिळाला. हा निधी मिळाल्यानंतर समूहातील सदस्यांची बैठक झाली.

या बैठकीत नारळाच्या हिरापासून केरसुणी (झाडू) बनविण्याचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी काही महिला खासगी स्वरूपात हा व्यवसाय करीत होत्या. त्यामुळे त्यातील बारकावे महिलांना माहिती होते. पूर्ण क्षमतेने समूहातील महिला केरसुणी निर्मिती उद्योगात उतरल्या.

सुरुवातीला या महिला गाव परिसर तसेच कुडाळ बाजारपेठेत केरसुणी विक्रीसाठी नेत होत्या, परंतु जसजसे उत्पादन वाढले आणि ओळखी वाढत गेल्या तसतसे व्यापारी गावात येऊन केरसुणी खरेदी करू लागले. तसेच दरदेखील चांगला मिळत असल्यामुळे महिलांचा आत्मविश्‍वास वाढला.

Broom Production
Women Empowerment : महिलांना स्वयंसिद्ध करणारी चळवळ

उमेद अभियानाच्या सीआरपी रंजना कदम म्हणाल्या, की उमेद अभियनांतर्गत महिला समूहाची स्थापना केल्यानंतर खऱ्या अर्थाने महिलांच्या प्रयत्नांना बळ मिळाले. विविध प्रकारची प्रशिक्षण महिलांना देण्यात आली.

आता या महिला बँकेचे व्यवहार स्वतः करतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. समूहाच्या केरसुणी निर्मिती उद्योगाला तेलगंणा येथील उमेदचे समन्वयक डॉन बॉस्को तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी देखील भेट दिली होती.

केरसुणी निर्मितीला गती

केरसुणी निर्मितीसाठी नारळाच्या झावळ्यांची गरज असते. केरसुणीची मागणी वाढल्यानंतर महिलांनी आजूबाजूच्या गावातील नारळ बागायतदारांकडून वाया जाणाऱ्या नारळाच्या झावळ्यांची खरेदी करण्यास सुरुवात केली. तुळसली, पणदूर, कदमवाडी, भोगलेवाडी, हिर्लोक, हुमरमळा या परिसरांतील नारळ बागायतदारांकडून महिला झावळ्या खरेदी करतात.

महिला सकाळी बागांमध्ये जाऊन झावळ्यांपासून हीर बाजूला करतात. सायंकाळी जमा झालेले हीर घरी आणतात, असा महिलांचा दिनक्रम ठरलेला आहे. घरी आणलेल्या हिरावरील पातळ पापुद्रा सुरीच्या साह्याने काढला जातो.

झावळीच्या पिड्याचे दोर काढून त्यामध्ये तयार केलेले हीर गुंफले जातात. त्यानंतर सोडणापासून बनविलेल्या दोरीच्या साह्याने केरसुणीची बांधणी केली जाते. पूर्ण बांधणी झाल्यानंतर पुन्हा एकदा पॉलिश केले जाते.

Broom Production
Women Empowerment : महिला हक्कासाठी लढणाऱ्या : चंद्रप्रभा

महिला समूहाचे उपक्रम

सुरुवातीला गावामध्ये त्यानंतर कुडाळ बाजारपेठेत केरसुणी विक्री. आता गोव्यातून व्यापारी गावात येऊन केरसुणी खरेदी करतात.

दर महिन्याला केरसुणीची विक्री. वाया जाणाऱ्या झावळापासून बागायतदारांना मोबदला.

समूहाच्या माध्यमातून गावात स्वच्छता मोहीम, मातीनाला बंधाऱ्याचे बांधकाम, प्लॅस्टिक बंदी, शिक्षणाविषयी जनजागृती, आरोग्य शिबिर, अंगणवाडींना पोषण आहार पुरविण्याचा उपक्रम.

काथ्या व्यवसाय, शिवणकाम, टाकाऊपासून टिकाऊ, कागदी पिशव्या निर्मिती प्रशिक्षण.

महिला समूहामार्फत दरवर्षी एका अभ्यास सहलीचे आयोजन.

केरळ कृषी प्रदर्शनात केरसुणी विक्रीतून ७० हजारांची उलाढाल.

उमेदतर्फे राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरव. मुंबई येथील प्रदर्शनात उत्कृष्ट समूह म्हणून पारितोषिक.

उद्योगाचे स्वरूप

२०१४ मध्ये श्री वेतोबा महिला स्वयंसाह्यता समूहाला उमेदकडून १५ हजार रुपयांचा फिरता निधी.

व्यवसायवृद्धीसाठी बँकेकडून ६० हजारांचे कर्ज. तसेच उमेदकडून ६० हजारांचा फिरता निधी.

२०१८ मध्ये बँकेकडून १ लाख आणि २०२१ मध्ये तीन लाखांचे कर्ज. बँकेमध्ये देवाणघेवाण महिला स्वतः करतात.

महिलांना केरसुणी निर्मिती व्यवसायातील २० वर्षांचा अनुभव.

समूहातील प्रत्येक महिला प्रति महिना कमीत कमी ६० केरसुणी तयार करते.

नारळाचे एक झावळ बागायतदारांकडून चार ते पाच रुपयांना खरेदी.

हिराप्रमाणे केरसुणीची वर्गवारी. मोठी केरसुणी २०० रुपये, मध्यम केरसुणी १५० रुपये आणि लहान केरसुणी १०० रुपये.

महिन्याला सरासरी ६०० केरसुण्यांची विक्री. वर्षाला सरासरी एक लाखांची उलाढाल.

समूहातील प्रत्येक महिलेची दरमहा ८ ते ९ हजार रुपयांची मिळकत.

- रोहिणी चव्हाण, ९४२३३७४७४४, (अध्यक्षा, श्री वेतोबा महिला स्वयंसाह्यता समूह)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com