Women Empowerment : उद्योगातूनच सबलीकरण शक्य...

Womens Business : जागरूकता, आत्मविश्‍वास अन पैसे, श्रम गुंतविण्याची क्षमता जिच्याकडे असेल तिची उद्योग, व्यवसायाकडे वेगाने वाटचाल होते. प्रभावी प्रशिक्षण महिला उद्योजकांची संख्या वाढवू शकते.
Women Empowerment
Women EmpowermentAgrowon
Published on
Updated on

कांचन परुळेकर

Women Education : जागरूकता, आत्मविश्‍वास अन पैसे, श्रम गुंतविण्याची क्षमता जिच्याकडे असेल तिची उद्योग (Business), व्यवसायाकडे वेगाने वाटचाल होते. प्रभावी प्रशिक्षण महिला उद्योजकांची संख्या वाढवू शकते. बाजारपेठेचे (Market) जाळे विणण्यासाठी उर्वरित स्त्रियांचे सहजी सहकार्य मिळू शकते.

जेथे जाते तेथे तू माझा सांगाती या ऐवजी जेथे जाते तेथे मी माझी सांगाती घट्ट पाय रोवूनिया म्हणून स्त्रीला सक्षमपणे उभे करायचे असेल तर तिच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकासाबरोबरच तिचा आर्थिक विकास साधणे अतिशय गरजेचे आहे.

देशाच्या महिलांच्या आर्थिक बदलाचे इंजिन म्हणजे उद्योजकता. महिला सबलीकरणाचे ते अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. म्हणून प्रारंभी महिलांनी सूक्ष्म आणि कुटीर उद्योगाला सुरुवात करून उद्योजकतेची कास धरणे गरजेचे आहे. शहरातील २० टक्के स्त्रिया सोडल्या, तर आजही बहुतेक जणी घर, मुलांचा सांभाळ, फावल्या वेळात निरर्थक गप्पा यात गुंतल्या आहेत. ग्रामीण भागातील महिला चूल, मूल अन पारंपरिक शेती या चौकटीत अडकल्या आहेत.

उद्योग, व्यवसायासंदर्भाची जाणीव, माहितीचा अभाव, व्यावसायिक कौशल्याचा अभाव, अपारंपरिक उद्योगाला नव्या तंत्राची जोड देण्यास तयार नसणे, तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष, नवे काही स्वीकारण्यात धरसोड यामुळे महिला उद्योजकांची संख्या वाढत नाही. त्यासाठी शासन, अशासकीय संस्था, तंत्र सल्लागार, व्यावसायिक संघटना, उद्योजक आणि व्यावसायिक यांनी महिला उद्योजक संख्या वाढीसाठी आपल्या परीने विशेष प्रयत्न करायला हवेत. त्यांनी मदतगाराची भूमिका अत्यंत प्रभावीपणे राबवायला हवी.

Women Empowerment
Women Empowerment : महिलांनी तयार करून दाखविली सोळा प्रकारची लोणची

परिणाम करणारे घटक ः बहुसंख्य महिला सहसा स्वतः निर्णय घेत नाहीत. लहानपणी वडील, भाऊ आणि लग्न झाल्यावर पती, समाजात पुरुषांचा निर्णयासाठी त्यांना आधार लागतो. घरातील पैशाच्या बाबी पुरुषच हाताळतात. त्यामुळे पैशासंदर्भातील मोठे निर्णय घेण्याची महिलांना सवय नसते.

व्यवसायातील प्रमुख निर्णयही घरातील ज्येष्ठ पुरुष वा पतीला विचारूनच घेतले जातात. बाईला काही कळत नाही असे पुरुषाला वाटत असते, तर पुरुषालाच आपल्यापेक्षा अधिक समजते असे सर्वसामान्य स्त्रीला वाटत असते. त्यामुळे पुरुष त्यांना नेहमीच कमी जोखमीचे सल्ले देतात.

१) उद्योजकतेला, व्यवसायाला घरातून पाठिंबा नसतो. व्यवसायात गुंतली तर घरकाम, मुलाबाळांचा सांभाळ, ज्येष्ठांचा सांभाळ कोण करणार अशी भीती कुटुंबीयांना वाटते. पैसा हाताळणे, गुंतवणे, वाढविणे, कामगार हाताळणे ही जोखमीची कामे तिला जमणार नाहीत असे कुटुंबीय ठरवतात. कुटुंबाच्या गरजा सांभाळत असताना अन्य व्यवसायासाठी आपण वेळ कसा काढणार याची महिलांनाच शंका वाटत असते.

२) गृहिणी, आई या सहायक, अवलंबित्व असणाऱ्या भूमिका महिलांच्या असतात. त्यामुळे पसंतीचा, निवडीचा निर्णय तिच्याकडे नसतो. वाट्याला येईल ते तिला स्वीकारावे लागते. कुटुंबात जे संपादन करायचे ते पुरुष करतो, त्यामुळे त्याला श्रेष्ठ समजले जाते. समाजात स्त्री-पुरुष दोघांकडे पाहण्याचा जो दुटप्पीपणा आहे त्यामुळे उद्योजकते संदर्भात स्त्रीला गौण स्थान आहे.

Women Empowerment
Women Empowerment : नारळ करंवटीच्या कलाकुसरीतून महिलांना मिळाला रोजगार

३) आदर्श उद्योजक (रोल मॉडेल) महिलांची कमतरता असल्याने महिलांसमोर अनुकरण करण्यायोग्य उदाहरणे कमी आहेत. क्वचित काही महिलांनी मुख्य प्रवाहात शिरकाव करून उच्च तंत्रज्ञान, जास्त जोखीम जास्त परतावा असणाऱ्या उद्योगांची निवड करून मध्यम, लघू उद्योगात प्रवेशही केला आहे. परंतु अशा महिला अपवादात्मक आहेत.

अधिकतर महिला खूप छोट्या उद्योगाची निवड करतात. कमी गुंतवणूक, कमी परतावा, कमी वाढ, कमी कौशल्य असणारे उद्योग निवडतात. अन्न, कपडे, सौंदर्य प्रसाधने, हस्तकला या क्षेत्रातील उद्योगात महिला प्रवेश करतात. कमी तंत्रज्ञान, कमी गुंतवणूक असणाऱ्या क्षेत्रांची निवड केल्याने कमी वृद्धी असणाऱ्या पारंपरिक उद्योगातच महिला गुंततात.

४) समव्यावसायिकांच्या संघटना, गट, क्लब यांच्याशी महिलांचा कमी संपर्क असल्याने चालू व्यवसायात त्यांना समव्यावसायिकांचा सल्ला वा आधार लाभत नाही. शिक्षणाचा स्तर कमी. विशेषतः व्यवसाय शिक्षण, तंत्रज्ञान याकडे महिलांचा कल कमी असतो. तंत्रशिक्षण शाळात खास महिलांसाठी प्रशिक्षणही मर्यादितच असतात.

सेक्रेटरियल प्रॅक्टिस, फॅशन डिझायनिंग, ड्राफ्टसमन, कॉम्प्युटर, फूड प्रोसेसिंग अशासारखे पारंपरिक कोर्सेस महिलांसाठी असतात. बहुसंख्य महिला स्वागतिका, लिपिक, कॉम्प्युटर ऑपरेटर, गारमेंट फॅक्टरीमध्ये नोकरी करतात. स्वत: उद्योग सुरू करण्याकडे त्यांचा कल कमी असतो. स्त्रीला व्यवसाय प्रशिक्षणाच्या संधीची कमतरता भासते.

५) महिलांकडे वारसा हक्काने संपत्ती, मालकी येण्याच्या आशा धूसर असतात. त्यामुळे उद्योगासाठी भांडवल उभा करणे त्यांना कठीण जाते. कर्जे उपलब्ध असली तरी व्यक्तिगत जमीन, तारण या बाबी पुरुषांच्या माध्यमातून उभ्या कराव्या लागतात. थोडक्यात, पत आणि तारणासाठी मर्यादा भेडसावतात.

६) स्त्रीला अपयशी होण्याची तीव्र भीती वाटत असते. यशस्वीपणाचीही तिला भीती वाटते. कारण यशस्वी झाल्यास उद्योगाला जास्त वेळ दिल्याने कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल असे तिला वाटते. दुसरी भीती एका मर्यादेपेक्षा अधिक यशस्वी झाल्यास पतीचा स्वाभिमान दुखावला जाईल. त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच उद्योग करण्याचा ती निर्णय घेते. स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणे, मी करू शकते हे सिद्ध करणे, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणे यादृष्टीने यशस्वी उद्योजकापेक्षा फक्त चांगला उद्योजक राहण्याचा स्त्रीचा प्रयत्न राहतो. व्यवसाय विस्तारण्यापेक्षा क्रियाकलाप सुधारण्यावर तिचा भर असतो.

७) बऱ्याचदा असे आढळते की व्यवसाय चांगला स्थापित झाला, की त्याचा विस्तार करणे गरजेचे असताना महिला दुय्यम स्थान स्वीकारून नवरा वा कुटुंबातील पुरुषाकडे उद्योग हस्तांतरित करतात.

गटातून प्रगती शक्य ः

प्रत्येक महिला प्रथम उद्योजक बनणार नाही. जागरूकता, आत्मविश्‍वास अन् पैसे, श्रम गुंतविण्याची क्षमता जिच्याकडे असेल तिची उद्योग, व्यवसायाकडे वेगाने वाटचाल होते. प्रभावी प्रशिक्षण महिला उद्योजकांची संख्या वाढवू शकते. बाजारपेठेचे जाळे विणण्यासाठी उर्वरित स्त्रियांचे सहजी सहकार्य मिळू शकते.

प्रथम लक्ष्य गट म्हणून आत्मविश्‍वास असणाऱ्या, प्रशिक्षण/कर्ज/बचत/ स्वयंरोजगार कार्यक्रमाची ज्यांना तोंडओळख आहे, चांगला आर्थिक परतावा मिळवण्यासाठी जोखीम पत्करण्याची ज्यांची तयारी आहे, तंत्रज्ञान व खासगी उद्योग उभारणीतून स्वयंनिर्भर होण्याची ज्यांची मनापासून इच्छा आहे अशांची निवड करायला हवी. प्रभावी प्रेरणेने हे गुण महिलांमध्ये निर्माण करता येतात.

उद्योग शोधावा कसा, प्रारंभ करण्यापूर्वी अभ्यासाच्या गोष्टी, पैसा हाताळणे, पत निर्माण करणे, कर्ज उभारणी, परतफेड, दर्जेदार उत्पादन व सेवा, विक्री कला, बाजारपेठ इत्यादी बाबी समजावून सांगणे, प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी साह्य करणे, आत्मविश्‍वास अन् नैतिक ताकद वाढविणे महत्त्वाचे ठरते.

संपर्क ः ०२३१- २५२५१२९ (लेखिका कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com