Water Crisis : पाणीटंचाईची सर्वाधिक झळ महिलांनाच

Water Issue : ग्रामीण स्त्रियांचे जीवन जास्त कष्टाचे आहे. घरातील छोटी-छोटी कामे, स्वच्छता, स्वयंपाक, धुणीभांडी, साफसफाई याबरोबर घरातील पाण्याचे व्यवस्थापन करणे ही महिलांची मुख्य कामे आहेत. दुष्काळाने महिलांवर जास्तीची जबाबदारी वाढते.
Water Issue
Water IssueAgrowon

Water Shortage : दुष्काळाच्या दाहकतेचे चटके बसणाऱ्यांमध्ये अल्पभूधारक, भूमिहीन, शेतमजूर यांच्या बरोबरच आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे महिला. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांची एक विशिष्ट अशी महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मात्र त्यांच्या श्रमाचे मूल्य समाजव्यवस्थेत मान्य करण्यात येत नाही. प्रत्येक वर्षी उन्हाळा-दुष्काळ सुरू झाला, की महिलांना आणि लहान बालकांना पाणी मिळविण्यासाठी डोक्यावर हंडे-घागरी, सायकलीला अडकवलेली केंड-घागरी, हातगाड्यावर पाण्याच्या टाक्या, घागरी व इतर मार्गांनी धडपड करावी लागते.

वास्तविक महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी हे चित्र दिसतेच. मात्र दुष्काळात याची तीव्रता कैक पटीने वाढते. अलीकडे अपवादात्मक काही पुरुषमंडळी घरातील महिलांबरोबर पाणी भरण्याच्या मदतीसाठी येत असल्याचे दिसतात. ज्याप्रमाणे दोन दशकांपूर्वी पाणी मिळण्यासाठी महिला रस्त्यावर उतरून आंदोलन, मोर्चे काढायच्या, तसं चित्र आज घडीला दिसत नाही. दुष्काळाचे महिलांवर काय परिमाण होतात, हे खोलवर जाऊन पाहणे गरजेचे आहे.

Water Issue
Water Storage : चिंताजनक! देशातील प्रमुख जलाशयांमध्ये केवळ २५% पाणीसाठा, राज्याचीही स्थिती बिकट

पाणीप्रश्‍न आणि महिला

अलीकडच्या काळात ग्रामीण भागात जमिनीवरील पाणीसाठे आणि भूगर्भातील पाणी यांचा वापराचे नियोजन, व्यवस्थापन आणि काटकसर दिसत नाही. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी दिवसेंदिवस खोलवर जाऊ लागली आहे. खोलवर जलपातळी असलेल्या विहिरीतून पाणी शेंदून, उतरून भरणे अतिशय त्रासदायक आणि कष्टप्रद झालेले आहेच. शिवाय हे पाणी भरलेल्या हंडे-घागरी पाणी डोक्यावर किंवा कमरेवर घेऊन शरीराचा तोल सांभाळत महिलांना पायापिट करावी लागते.

प्रसंगी पोटात गर्भ किंवा कमरेवर मूलबाळ असले तरी महिलांची पाणी भरण्यापासून सुटका होत नाही. काही ठिकाणी तर नदीच्या पात्रातून झरे खोदून वाटीने पाणी हंड्यात भरावयाचे आणि ते घेऊन घरी येणे अशा कसरती कराव्या लागतात. टॅंकरने पाणी मिळत असले तरीही पाणी भरण्याचे आणि वाहून घरी आणावयाचे काम महिलांनाच करावे लागते. अनेक गावांमध्ये टॅंकर विहिरीत पलटी केले जाते. त्या विहिरीतील पाणी शेंदून मिळवावे लागते. केंद्र शासनाकडून ‘हर घर नल, हर घर जल’ ही टॅग लाइन घेऊन पाणीपुरवठ्यासाठी ‘जलजीवन मिशन’ योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. तर मग ग्रामीण भाग प्रचंड तहानलेला का?

घरातील पिण्याचे आणि वापराचे पाणी भरण्यापासून इतर काही कष्टाची कामे करण्यामुळे महिलांच्या आरोग्याची मोठी हानी होत आहे. मात्र त्याकडे महिला दुर्लक्ष करत असतात. डोक्यावर हंडा, घागर, कळशी घेऊन दूरचे अंतर चालत जावे लागते. डोक्यावर पाणी वाहण्यामुळे केस गळणे, पाठीचा कणा दुखणे, झीज होणे, डोके दुखणे, डोक्यासंदर्भातील इतर आजारांचे प्रमाण महिलांमध्ये वाढले आहे.

कमरेवर पाणी वाहण्यामुळे मणक्याचे, मानेचे, पोटाचे विकार, सांधेदुखी, पायदुखी, गर्भवती महिलांचा गर्भपात होणे इत्यादींच्या महिला बळी ठरत आहेत. तरुणपणी आजार जाणवत नसले तरी वयाच्या पंचेचाळिशीनंतर हळूहळू परिणाम जाणवायला लागतात. महिलांच्या आरोग्याकडे कुटुंबातील पुरुषमंडळी अजाणतेपणाने किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून यतात. रोजंदारी, कष्टकरी, हातावर काम करून पोट भरणाऱ्या महिलांना दिवसभर काम केल्यावर परत संध्याकाळी-सकाळी पाणी मिळविण्यासाठी वणवण करावी लागते.

जास्त कष्टाची कामे महिलांकडूनच करून घेणे ही येथील संस्कृती. जास्त कष्टाची कामे करण्यामुळे महिलांच्या शरीराची किती झीज होते, त्यांच्या शरीरावर काय आणि कोणत्या प्रकारचे परिणाम होतात याचा विचार केला जात नाही. पाणी भरणे ही काही जणू महिलांचीच जबाबदारी असते. त्यामुळे पाणी भरणे कितीही त्रासाचे असले, तरी त्या विरोध करत नाहीत. परिणामी, महिलांच्या आरोग्याचे अनेक प्रश्‍न पुढे आले आहेत. घरातील कामे महिलांची आणि बाहेरची कामे पुरुषांची अशी श्रमविभागणी केली आहे. त्यात बदल करण्यासाठी सामाजिक आणि राजकीय व्यवस्था अशा दोन्ही पातळ्यांवर काम करण्याची आवश्यकता आहे.

Water Issue
Water Scarcity : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४१२ गावांना ६७८ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा

दुष्काळात महिलांची जबाबदारी

कुटुंबातील जबाबदाऱ्या निभावताना महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहत असल्या तरी कुटुंबातील श्रमाचे विभाजन करत काही कामांना कमी कष्टाची, कमी दर्जाची कामे समजून ती महिलांच्या वाट्याला येतात. ही कामे महिलांनीच करायची ही मानसिकता मनावर बिंबवली. महिलांनी देखील वाट्याला आलेले कष्ट स्वीकारले. मात्र दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई आणि उत्पनातील घट यामुळे सामान्य कुटुंबातील महिलांना घरी आणि घराबाहेर अशा दोन्ही ठिकाणी कष्ट-मजुरी करावी लागते.

उदा. सद्यःस्थितीत अनेक महिला घरकाम आणि प्रत्यक्षात शेती करतात. शेतीतील कामे संपल्यानंतर इतरांकडे शेतमजुरी किंवा बिगर शेती रोजगाराची कामे करतात. मात्र महिलांना भेदभावाची वागणूक दिली जाते. समान कामासाठी स्त्री आणि पुरूष मजुरांना वेगवेगळा मोबदला दिला जातो. स्त्रियांना मिळणारा मोबदला पुरुषांच्या तुलनेत खूप कमी असतो.

बिना अग्रवाल आणि मारिया मीझ यांनी केलेल्या अभ्यासात ग्रामीण भागात एकूण ६९ टक्के महिला राहत असल्याचे म्हटले आहे. शिवाय ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बऱ्यांपैकी महिलांच्या खांद्यावर आहे. महिलांचा मुख्य व्यवसाय हा घरातील कामांबरोबरच शेती, शेळीपालन, पशुपालन, शेतमजुरी, दुग्ध व्यवसाय व इतर बिगरशेती व्यवसायातील मजुरी असल्याचे दिसून येते. दुष्काळामुळे पुरुष हे गावाबाहेर स्थलांतर करतात, तर महिलांना गावांमध्ये (घरीच) थांबून कुटुंबातील आणि शेतीतील सर्व कामे पाहावी लागतात.

अनेकदा शेतीत कामे नसतील तर महिला रोजगार हमी योजनेच्या कामावर जातात. पुरुष कामासाठी किंवा मजुरीसाठी स्थलांत करतो, तर महिला घरातील, शेतातीत कामांची जबाबदारी खांद्यावर घेतात. शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय या बरोबरच शिवणकाम, बचत गटाकडून कर्ज घेणे या माध्यमातून महिला कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी हातभार लावतात. तसेच मुलांचे शिक्षण, लग्न यांसारख्या कामातही त्यांना लक्ष घालावे लागते. एकंदर पुरुषाच्या गैरहजेरीत घरातील महिला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पडेल ते काम करतात.

ज्या वेळी दुष्काळामुळे भूमिहीन, अल्पभूधारक, शेतमजूर कुटुंबातील महिलांना पुरुषांबरोबर कामाच्या शोधात स्थलांतर करण्याची वेळ येते, तेव्हा महिलांवर दुहेरी जबाबदारी येऊन पडते. ग्रामीण भागात ऊसतोडणी मजुरीसाठी स्थलांतर होते, त्या वेळी महिलांना घरातील आणि ऊसतोडणीचे असे दुहेरी कामे करावी लागतात. एकंदर सर्वत्र महिलांना जबाबदारी घेऊन कामे करावी लागतात. मात्र कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी उचलणाऱ्या महिलेला ग्रामीण अर्थकारणचे मूल्यमापन करताना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले जाते.

सारांशरूपाने, ग्रामीण स्त्रियांचे जीवन जास्त कष्टाचे आहे. घरातील छोटी-छोटी कामे, स्वच्छता, स्वयंपाक, धुणीभांडी, साफसफाई याबरोबर घरातील पाण्याचे व्यवस्थापन करणे ही महिलांची मुख्य कामे आहेत. दुष्काळाने महिलांवर जास्तीची जबाबदारी वाढते. त्याची गांभीर्याने चर्चा होत नाही की उपाययोजनेच्या दिशेने पाऊल उचलले जात नाही. अलीकडे महिलांच्या कष्टाची चर्चा हळूहळू सुरू झाली आहे. मात्र पाणीटंचाई आणि आरोग्य या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात येते. आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्याची केवळ चर्चाच नाही तर उपाययोजना देखील होणे आवश्यक झाले आहे. त्या संदर्भातील सखोल संशोधन होणे देखील गरजेचे आहे. दुष्काळामुळे ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्‍न तर गंभीर झालेले आहेतच. शिवाय जबाबदारी वाढली आहे. याचे परिमाण खोलवर होत आहेत. त्यामुळे महिला बदल होण्याची वाट पाहत आहेत.

(लेखक शेती, दुष्काळ, पाणी प्रश्नांचे अभ्यासक असून ‘द युनिक फाउंडेशन, पुणे’ येथे वरिष्ठ संशोधक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com