Vidhansabha Election : शेतकरी नेत्यांच्या 'परिवर्तन आघाडी'वर शेतकरी विश्वास ठेवतील का ?

महायुती आणि आघाडीशी 'तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय करमेना' असा खेळ खेळत स्वत:ची राजकीय ताकदही वाया घालवली. त्यामुळे शेतकरी नेत्यांची विश्वासहार्यता संपुष्टात आलेली आहे.
Parivartan Aghadi
Parivartan AghadiAgrowon
Published on
Updated on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा माहोल गरम होऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीत शेती प्रश्नांमुळे महायुतीला झटका बसला आणि त्याचा महाविकास आघाडीला फायदा झाला, असा राजकीय विश्लेषकांचा दावा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तीन ते चार महिन्यात येऊ घातल्या आहेत. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या नाराजीचा फायदा करून घेण्यासाठी आता तिसऱ्या आघाडीचा प्रयोग आकाराला येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. 'अब की बार किसान सरकार' म्हणत महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनी परिवर्तन आघाडीचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शेतकरी संघटना, समविचारी पक्ष आणि सामाजिक संस्था एकत्र येणार आहेत. आणि महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागा लढवणार आहेत.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे पंचप्राण असलेल्या शरद जोशींच्या मुशीतून तयार झालेल्या पक्ष आणि संघटनांचा यामध्ये समावेश आहे. शरद जोशींच्या नेतृत्वाखाली ८० च्या दशकात शेतकरी संघटनेनं देशाचं राजकारण ढवळून काढलं. सलग दीड दशकं शेती प्रश्नांभोवती राजकारण फिरलं. पण त्यानंतर मात्र शेतकरी संघटनेचा शक्तिपात झाला. त्याची अनेक कारणं आहेत. पण ते असो. आता पुन्हा एकदा शरद जोशींच्या मुशीतून तयार झालेली शेतकरी नेते मंडळी एकत्र येणार आहेत.

पुण्यात गुरुवारी म्हणजेच १८ जुलै रोजी विविध शेतकरी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत माजी आमदार वामनराव चटप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, माजी आमदार आणि भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र प्रमुख शंकर अण्णा धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे अनिल घनवट उपस्थित होते. यावेळी परिवर्तन आघाडीची घोषणा करण्यात आली आहे.

Parivartan Aghadi
Vidhan Parishad Election 2024 : भाजपकडून विधानपरिषदेसाठी ५ नावे घोषित; सदाभाऊ खोत आणि पंकजा मुंडेंचे पुनर्वसन

महायुती आणि इंडिया आघाडी या दोन्ही आघाडी युतीनं शेतकऱ्यांना फवसलं आहे. शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळं शेतकरी कामगार प्रश्नांवर समर्थ पर्याय देण्यासाठी परिवर्तन आघाडी आकारला आली असल्याचं पत्रकार परिषदेत उपस्थित नेत्यांकडून सांगण्यात आलं. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन ट्विस्ट येईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

बीआरएसचं काय झालं?

खरं म्हणजे यापूर्वी शेतकऱ्यांची नाराजीचा फायदा घेत पक्ष संघटनांचा उभा-आडवा विस्तार करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. गेल्यावर्षीच भारत राष्ट्र समितीने चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शेती प्रश्नाला धरून हातपाय पसरण्याचे प्रयत्न केले. पण तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत जबरी पराभव पदरात पडल्यानंतर मात्र बीआरएसच्या चंद्रशेखर रावांनी हात वर केले. त्याआधी मात्र जंगी सभा घेत महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना अंगावर घेण्याची तयारी केली होती. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील नेत्यांनीसुद्धा बीआरएसमध्ये सहभागी होऊन चंद्रशेखर राव शेतकऱ्यांचे अच्छे दिन आणतील, अशी टिमकी वाजवली होती. पण तेलंगणा विधानसभेच्या निकालानंतर सारं काही हवेत विरून गेलं.

शरद जोशींच्या तालिमतले नेते

शरद जोशींच्या तालमीत तयार झालेल्या बहुतांश शेतकरी नेत्यांनी चळवळीचा विचार राजकीय स्वार्थासाठी विकून खाल्ला. त्यातून शेतकरी नेत्यांची विश्वासहार्यता संपुष्टात आली. महायुती आणि आघाडीशी 'तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय करमेना' असा खेळ खेळत स्वत:ची राजकीय ताकदही वाया घालवली. आता लोकसभा निवडणुकीत राजकीय आखाड्यात शेतकऱ्यांचे प्रश्न महायुतीला नडले. विधानसभेतही शेतकरी मुद्दे निर्णायक ठरतील, अशी शक्यता दिसते. त्यामुळं शेतकरी चळवळीत घडलेली पण एकमेकांशी फारकत घेतलेली मंडळी आता तिसरी आघाडी उघडणार आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांचा दबावगट आकाराला आला तर चांगलंच. अर्थात त्यासाठी परिवर्तन आघाडीच्या नेत्यांना आधी विश्वासहार्यता निर्माण करावी लागेल. महायुती आणि इंडिया आघाडीपेक्षाही ते सर्वात मोठं आव्हान परिवर्तन आघाडीसमोर असणार आहे. त्याला ते कसे सामोरे जातात तेच पाहावं लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com