
डॉ. सोमनाथ माने
Health Benefits of Desi Cows: विसाव्या पशुधन गणनेनुसार, भारतात एकूण पशुधनाची संख्या ५३५.७८ दशलक्ष आहे, जी २०१२ च्या तुलनेत ४.६ टक्क्यांनी वाढली आहे. देशात सुमारे १९२.४९ दशलक्ष गायी आहेत, त्यामध्ये देशी गायींची संख्या १४२.११ दशलक्ष आहे. २०१२ रोजी देशी गायींची संख्या १५१ दशलक्ष होती. २०१९ मध्ये ही संख्या सहा टक्क्यांनी कमी झाली.
महाराष्ट्रातील एकूण गोवंश संख्या ही सुमारे १.५४ कोटी आहे. यामध्ये देशी (मूळनिवासी) जाती आणि विदेशी/संकरित जाती अशा दोन्ही गायींचा समावेश आहे. महाराष्ट्रातील देशी गायींची संख्या गेल्या काही वर्षांत घटलेली आहे. २०१९ मध्ये देशी गायींची संख्या सुमारे ७३ लाख होती. दुग्ध उत्पादनासाठी जास्त दूध देणाऱ्या जातींचा प्रसार झाल्यामुळे संकरित गायींची संख्या वाढलेली आहे. महाराष्ट्रातील संकरित/विदेशी गायींची संख्या सुमारे २८ लाख आहे.
भारतामध्ये एकूण २३०.५८ दश लक्ष टन लिटर दूध उत्पादित होते. कृषी अन्न संघटनेच्या डेअरी मार्केट रिव्ह्यू (२०२३) नुसार २०२३-२४ मध्ये भारताचे दूध उत्पादन २३६.३५ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरडोई उपलब्धता ४५९ ग्रॅम प्रति दिवस आहे. भारतामध्ये ४९ टक्के दूध म्हशींपासून, २७ टक्के संकरित गाईं आणि २० टक्के दूध देशी व गावठी गायींपासून मिळते. तसेच ३ टक्के दूध हे शेळी आणि इतरांपासून १ टक्का दूध उत्पादित होत आहे.
महाराष्ट्रातील देशी गोवंशाची स्थिती महाराष्ट्रामध्ये देशी गोवंशाच्या एकूण सात जाती असून पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार, नगर-नाशिक पट्ट्यात डांगी, कोकणामध्ये कोकण कपिला, मराठवाड्यात देवणी, लाल कंधारी, विदर्भात गवळाऊ, कठाणी प्रसिद्ध आहेत. देशी गाय कमी दूध उत्पादन करणारी असली तरी स्थानिक हवामानात तग धरण्याच्या क्षमतेमुळे त्यांचे संवर्धन महत्त्वाचे आहे.
देशी गोवंश संवर्धन करणाऱ्या पशुपालकांना नवीन तंत्रज्ञानाचे फायदे समजावून देणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. तांत्रिक साहाय्य देऊन देशी गोवंशाच्या गुणवत्तेत सुधारणा शक्य आहे. ज्यामुळे दूध उत्पादन क्षमता वाढेल आणि शाश्वत गोवंश पालन साध्य होईल. महाराष्ट्रातील हवामान आणि परिस्थितीला तग धरण्यास सक्षम असलेल्या स्थानिक देशी गोवंश प्रजातींचे संवर्धन आणि पालन आवश्यक आहे.
यामध्ये प्रमुख प्रजाती म्हणजे... लाल कंधारी : कठीण परिस्थितीत तग धरणारे आणि मेहनती बैल म्हणून ओळखले जातात. देवणी : उष्णता सहनशील, टिकाऊ, आणि उत्कृष्ट मेहनत करू शकणारे बैल. खिलार : अत्यंत मेहनती आणि दुष्काळी परिस्थितीत तग धरणारे. महाराष्ट्रामध्ये एकूण विचार करता देवणी दुहेरी काम, बाकी सर्व ओढकाम आणि शर्यतीसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या शेतीमध्ये मनुष्यबळ उपलब्धता, मोठ्या अवजारांच्या निर्मितीमुळे देशी गाईंची संख्या काही प्रमाणात कमी होताना दिसते.
परंतु आजही अनेक शेतकऱ्यांना आपला देशी गोवंश ओढकाम आणि शर्यतीसाठी शाश्वत वाटत आहे. महाराष्ट्रात दुधासाठी उत्तम गोवंशाचा अभाव असल्यामुळे शेतकरी सेंद्रिय शेती, दूध उत्पादनासाठी, आजाराला कमी बळी पडणारी, प्रतिजैविक कमी लागणारी आणि महाराष्ट्रातील वातावरणात जुळून घेणाऱ्या परराज्यातील साहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि कांक्रेज या देशी गाईंचे संगोपन करताना दिसत आहेत.
अनेक शेतकरी, नव उद्योजकांनी व्यावसायिक पद्धतीने देशी गाईंचे फार्म चालू केले असून, शहरातील ग्राहकांना ७० ते १०० रुपये प्रति लिटर दूध आणि तुपाची २५०० ते ३००० रुपये प्रति किलो दराने विक्री करत आहेत. यामध्ये उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्तेमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. बदलते हवामान,चारा उपलब्धता, देशी गाईंच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा मागणी तसेच सेंद्रिय शेती, पर्यावरण पूरक खते, कीडनाशक, मूर्ती निर्मिती इत्यादीसाठी जातिवंत देशी गोवंश शेतकऱ्यांच्या गोठ्यात असणे गरजेचे आहे.
आज अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जातिवंत देशी गाई प्रती दिन सरासरी १० ते १८ लिटर दूध देतात. परंतु फक्त दूध उत्पादन न पाहता शुद्ध देशी गोवंशाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. तसेच शाश्वत देशी गोपालनासाठी दूधप्रक्रिया, शेणापासून बायोगॅस, खते, गोमूत्रापासून कीडनाशक निर्मितीचा विचार करावा.
महाराष्ट्रात शाश्वत देशी गोवंशपालनासाठी एकात्मिक मॉडेल विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रजातींची निवड, पोषण, प्रजनन, शेण-गोमूत्र प्रक्रिया, दुग्ध उत्पादन, आणि माहिती तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून एक शाश्वत आणि आर्थिक नफा देणारे मॉडेल तयार करणे शक्य आहे. यातून शेती, पर्यावरणीय संतुलन राखता येईल आणि देशी गोवंशाचे शाश्वत संवर्धन साधता येईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.