
Nashik News: शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.
जागतिक बँक अर्थसहायित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत वावी (ता. सिन्नर) येथे जामनदी खोरे फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या मका, सोयाबीन, कडधान्य संकलन, साठवणूक, प्रतवारी व विक्री करणे या मंजूर उपप्रकल्पातील १ हजार टन क्षमतेच्या वेअर हाऊसचे उद्घाटन कृषिमंत्री कोकाटे यांच्या हस्ते रविवारी (ता. ३०) करण्यात आले.
खासदार राजाभाऊ वाजे, ‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी आमले, वावीचे सरपंच विजय काटे, सह्याद्री फार्मर्सचे अध्यक्ष विलास शिंदे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, जामनदी फार्मर्स कंपनीचे चेअरमन मच्छिंद्र चिने, ‘युवामित्र’च्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा पोटे आदी या वेळी उपस्थित होते.
‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे निर्माण झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठबळामुळे या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. शेतीत भांडवली गुंतवणूक वाढविण्याची आवश्यकता असून त्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आगामी काळात फार्मर्स कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आधुनिक पद्धतीने संघटनात्मक शेती व्यवसाय उभा करण्याची गरज असल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले.
प्रकल्प संचालक डॉ. वसेकर, विलास शिंदे यांनी मार्गदर्शन केले. ‘स्मार्ट’चे समन्वयक अधिकारी सुनील वानखेडे यांनी प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. कंपनीचे संचालक ॲड. विलास पगार यांनी प्रास्ताविक केले. परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्या
‘‘शेतीतील उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) या तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होईल. महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना विक्री व्यवस्था तालुका पातळीवर उभारण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. शेतकऱ्यांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे,’’ असे मंत्री कोकाटे म्हणाले.
राज्यातील पहिलाच प्रकल्प
जामनदी फार्मर कंपनीचा हा प्रकल्प ‘स्मार्ट’अंतर्गत पहिलाच प्रकल्प ठरला आहे. राज्यातील या पहिल्याच प्रकल्पाचे उद्घाटन कृषिमंत्री कोकाटे यांच्या हस्ते झाले. १ हजार टन क्षमतेचे वेअर हाऊस, ५० टन क्षमतेचा वजन काटा, ५० अश्वशक्ती क्षमतेचा ट्रॅक्टर व ट्रॉली, प्रतिटन क्षमतेचे क्लिनिंग व ग्रेडिंग मशिन असलेल्या या प्रकल्पाची किंमत सुमारे १.५ कोटी रुपये इतकी आहे. त्यापैकी ८६ लाख ५९ हजार रुपये शासनाचे अनुदान मिळाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.