India's GDP : भारत खरेच चीनची बरोबरी करेल?

Indian Economy : दरडोई उत्पन्न या निकषावर २०४४ पर्यंत भारत चीनला गाठेल, अशी मांडणी करणारा सुरजित भल्ला आणि करण भसिन यांचा लेख Brookings वर प्रकाशित झाला आहे.
India And China
India And ChinaAgrowon

नीरज हातेकर

GDP of India : दरडोई उत्पन्न या निकषावर २०४४ पर्यंत भारत चीनला गाठेल, अशी मांडणी करणारा सुरजित भल्ला आणि करण भसिन यांचा लेख Brookings वर प्रकाशित झाला आहे. असे झाले तर खूपच छान. पण लेखातील गृहीतके जरा अवघड वाटत आहेत.

उदा. भारतात मुली महाविद्यालयांत जाण्याचे प्रमाण वाढते आहे, यावर लेखात बरीच भिस्त आहे. पण या शिक्षणाचा दर्जा चांगला नाही. चीनमधील ७ विद्यापीठे जागतिक पातळीवर पाहिल्या शंभरमध्ये येतात.

आपल्याकडे आपले सर्वांत चांगले विद्यापीठ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पाहिल्या शंभरमध्ये नाही. उलट उच्च शिक्षण व्यवस्थेचे अधिकाधिक खच्चीकरण सुरू आहे. आपला दीर्घ कालीन विकासदर (ग्रोथ रेट) १९८० पासून ६ टक्क्यांवर स्थिर आहे.

तो ८ टक्क्यांवर नेणे आवश्यक आहे. पण तसे होताना दिसत नाहीये. दक्षिण कोरिया, चीन वगैरे देश बरीच वर्षे सलग दहा टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने वाढली तेव्हा कोठे आजची त्यांची दरडोई उत्पन्नाची पातळी गाठली गेली. त्या आघाडीवर आपण कुठे आहोत?

India And China
GDP Growth : देशाच्या जीडीपी आकड्यांचा खेळ

आपल्याकडे बेरोजगारीचा दर कमी आहे; पण आहे तो रोजगार चांगल्या दर्जाचा आहे, असे म्हणता येत नाही. आपला बेरोजगारीचा दर कमी असतो; कारण बेरोजगार राहणे परवडत नाही.

लोक मिळेल त्या मार्गाने काम करतात. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य वगैरेच्या बाबतीत चीन आपल्या खूप पुढे आहे. त्यामुळे लेखात नोंदवलेला आशावाद हे स्वप्नरंजन आहे, असेच म्हणावे लागते.

वास्तव परिस्थीती जी आहे, जशी आहे, तशी स्वीकारली तरच अडचणीतून मार्ग निघतील. माहिती (डेटा) लपवून, उगाच खोटी लाली लावून प्रश्‍न सुटणार नाहीत. सरकार नेहमीच सगळं उत्तम चालत आहे असेच सांगणार.

शेवटी स्वतःची कामगिरी चांगली नाही असे ते का म्हणतील? सरकारने केलेल्या दाव्यांची सत्यासत्यता तपासून बघितली पाहिजे. आपण शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, दलित, मुस्लिम, महिला यांना आर्थिक प्रक्रियांमध्ये सक्षमपणे सहभागी करून घेणे यावर भर देऊया.

India And China
India's GDP : भारताचा जीडीपी वाढीचा पराक्रम किती खरा?

भारतातील आर्थिक विषमता

भारतातील आर्थिक विषमतेचे स्वरूप वेगळे आहे. बऱ्याच वेळेला वरच्या पाच टक्के लोकांकडे अमके टक्के संपत्ती वगैरे आकडे येतात आणि मग त्यावर चर्चा सुरू होते. पण हे वरचे पाच टक्के लोक आहेत तरी कोण?

गेले कित्येक दिवस मी ग्रामीण महाराष्ट्रात या ‘वरच्या’ पाच टक्क्यांना भेटतोय. आपल्याला वाटतात तसे ते ऐश्‍वर्यात लोळणारे वगैरे नाहीत. अजिबात नसतात असे नाही. वरचे ०.००१ टक्का वगैरे असतात. पण महिन्याला रु. ५० हजार किंवा अधिक कमावणारे उत्पन्नाच्या उतरंडीत वरच्या पाच टक्क्यांत येतात.

आमच्या सोसायटीत विकास (नाव बदलले आहे, माणूस खरा आहे) कचरा उचलतो. गेले वीस वर्षे. त्याला महिना पाच हजार रुपये इथून मिळतात. जवळच एक मोठी सोसायटी आहे, तिथे सफाईचे काम करतो.

साधारण रोज चार तास लागतात, ज्याचे त्याला १५ हजार रुपये मिळतात. अजून एका सोसायटीत कचरा उचलण्याचे ५ हजार रुपये. मग दुपारी घरी गेल्यावर विकास आणि त्यांची पत्नी मिळून इस्त्रीचा धंदा करतात.

रात्री उशिरापर्यंत आणि कधी कधी पहाटे सुद्धा. आता एक माणूस ठेवलाय, कपडे वाहतूक करण्यासाठी सेकंड हॅण्ड ओम्नी घेतली आहे. त्यातून त्याला महिन्याला रु. ३० हजार सुटतात. सगळे मिळून विकासला महिना ५० ते ५५ हजार रुपये मिळतात. इथपर्यंत पोहोचायला खूप वर्षे लागली. अजूनही खूप मेहनत आहे. नशीब सुद्धा चांगले की तीन सोसायट्यांत काम मिळाले. नातेवाइकांनी इस्त्रीच्या धंद्यात मदत केली.

त्यामुळे विकासला किमान एवढे तरी जमले. विकास हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. तो आज उत्पन्नाच्या उतरंडीत वरच्या पाच टक्क्यांमध्ये येतो; पण तो काही रूढ अर्थाने श्रीमंत वगैरे नाहीं. भारतातील विषमतेचे मूळ तळाच्या लोकांचे उत्पन्न खूप कमी असण्यात आहे; वरच्यांची उत्पन्नं खूप आहेत यात नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com