Agriculture Market : भारत कापूस आयातदार देश बनणार?

Market Update : चालू हंगामासाठी भारताने कापसाच्या हमीभावात ७ टक्के वाढ करून दर्जानुसार ते प्रति क्विंटल ७१०० ते ७५०० रुपयांच्या दरम्यान ठेवले आहेत. खुल्या बाजारात ब्राझील, अमेरिका आणि पाकिस्तानसारख्या देशातील कापसाच्या किमतीपेक्षा ते जास्त आहेत.
Cotton
Cotton Agrowon
Published on
Updated on

Cotton Update : मागील आठवड्यात आपण खरिपाच्या तोंडावर आलेले खाद्यमहागाईचे सावट आणि त्याचा कृषिमाल बाजारपेठेवर होऊ शकणारा परिणाम याचा आढावा घेतला होता. नुकत्याच जाहीर झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणाच्या निमित्ताने गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी महागाई परत नियंत्रणात राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातील याची ग्वाही दिली. दरम्यान, सप्टेंबरचे महागाई निर्देशांक आकडे आज प्रसिद्ध होतील त्यामध्ये याचे प्रतिबिंब दिसेलच.

तांदळाचा गोंधळ

तांदळाच्या बाबतीत घेतलेल्या शेतकरी हिताच्या निर्णयाचा नेमका उलट परिणाम शेतकऱ्यांवर झाल्यामुळे केंद्र सरकारदेखील संभ्रमात पडले आहे. कारण बासमती आणि बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवरील सर्व बंधने काढून टाकल्यामुळे त्यांच्या किमती वाढतील आणि उत्पादकांना फायदा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु झाले उलटच. भारत जगाच्या बाजारात उतरणार म्हटल्यावर सर्व तांदूळ उत्पादक देशांनी तांदळाच्या किमती उतरवल्या. या तीव्र स्पर्धेमुळे बाजार कोसळले आहेत. त्यामुळे उत्पादकांची गोची होत आहे.

अर्थात, देशांतर्गत किरकोळ बाजारात तांदूळ अजूनही महागच आहे. त्यामुळे किरकोळ खाद्य महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने खुल्या बाजारात तांदूळ आणल्यास घाऊक किमती घसरून उत्पादकांचे प्रश्‍न अधिकच वाढतील. त्यामुळे महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सरकारला हा निर्णय घेणे अडचणीचे ठरणार आहे. एकंदर पाहता बिगर-बासमती

तांदळाची निर्यात ८०-१०० लाख टनांपर्यंत पोहोचली नाही, तर तर तांदूळ बाजार पुढील सहा-आठ महिने नरमच राहण्याची चिन्हे आहेत. कारण मागील हंगामातील २२०-२३० लाख टन आणि नवीन हंगामातील सुमारे २५० दशलक्ष टन अतिरिक्त तांदूळ पुढील काळात किमतीला लगाम घालेल, अशी शक्यता सध्या दिसत आहे.

Cotton
Cotton Market : रोज ३० हजार क्विंटल कापसाची बाजारांत आवक

हळद बाजार परत उजळेल?

मागील पाच-सहा आठवडे हळद बाजार मंदीच्या विळख्यात सापडला आहे. खरिपात झालेल्या पेरणीची आकडेवारी, त्यानंतर झालेल्या जोरदार पावसाचा पिकांवर झालेला विभागनिहाय परिणाम आणि त्या अनुषंगाने एकूण उत्पादनाचा अंदाज याविषयीची माहिती उपलब्ध होण्यास अजून काही कालावधी जाणार असल्यामुळे बाजारात एक निराशेचे वातावरण आहे. हळदीचे पीक अजून चार ते पाच महिने तरी जमिनीखाली राहणार असून या काळात ‘ला-निना’च्या परिणामांमुळे सतत पाऊस झाल्यास पिकाला बुरशी आणि कूज यांचा धोका राहील, या गोष्टीबद्दल सध्या बाजारात चिंता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चालू तिमाहीमध्ये वातावरण-जोखीम या एकाच घटकाचा प्रीमिअम किमतीवर राहणार आहे.

चालू आठवडा हा वायदे बाजारात ऑक्टोबर हळद कॉँट्रॅक्टच्या समाप्तीचा आठवडा असल्यामुळे त्यातील तांत्रिकतेचा मुद्दा लक्षात घेता बाजारात मोठे चढ-उतार अपेक्षित आहेत. परंतु ऑक्टोबर वायदा १३,००० रुपयांपर्यंत खाली आला असल्यामुळे तो फार तर अजून ५००-६०० रुपये नरम होईल. परंतु मागील महिन्यातील सततची घसरण पाहता बाजारात येथून ८-१० टक्के तेजी येणेदेखील शक्य आहे. ऑक्टोबरनंतर एकदम डिसेंबर वायदा असल्यामुळे मध्यम कालावधीसाठी म्हणजे दोन ते तीन महिन्यांसाठी हळद परत एकदा उजळू शकेल. याला आधार मिळेल अर्थातच टाइट पुरवठ्याचा. मागील हंगामातील शिल्लक साठे जेमतेम मागणी पुरवण्याइतकेच असून ते मार्चपर्यंत टिकवायचे मोठे आव्हान आहे. या सर्व गोष्टी विचारात घेता नजीकच्या काळात हळदीमध्ये १२,२०० रुपयांच्या भावपातळीसाठी भक्कम आधार निर्माण झाला आहे, असे म्हणता येईल.

Cotton
Agrowon Podcast : टोमॅटोमधील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, टोमॅटो तसेच काय आहेत आले दर?

कडधान्यात नरमाईचा कल

मागील वर्षभर महागाईमध्ये आघाडीवर असलेल्या आणि व्यापारावर अनेक निर्बंध घातल्यावर सुद्धा मंदीला इतके दिवस हुलकावणी देणाऱ्या कडधान्य बाजारात आता नरमाई येण्यास सुरुवात झाली आहे. विशेषत: तुरीच्या किमती मागील १०-१५ दिवसांत सहा-आठ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत तर आयात केलेल्या हरभऱ्यामध्येही थोडी घट झाली आहे. अर्थात, ही नरमाई पुढे किती आणि कुठपर्यंत चालेल हे सांगणे कठीण आहे. कारण तुरीची आवक अजूनही तीन महिने दूर आहे आणि आफ्रिकेतील तूरही आता संपेल. या काळात जर उत्पादक राज्यांत अतिपाऊस झाला तर पिकाला धोका निर्माण होऊ शकेल. तशा प्रकारचे हवामान अंदाजही आहेत. त्यामुळे पुढील एक-दोन महिने तुरीमध्ये हवामान-जोखीम निर्णायक राहणार आहे.

रब्बी हंगामातील पेरण्या आता सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये हरभऱ्याचे क्षेत्र यंदा चांगलेच वाढण्याची चिन्हे आहेत. अर्थात, चालू हंगामातील किंमत पाहता हरभऱ्याचे क्षेत्र १२-१५ टक्के तरी वाढेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. परंतु प्रामुख्याने उत्तरेत हरभऱ्याला मुख्य स्पर्धक असलेल्या गव्हाचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचले असून केंद्राला गहू आयात करण्याचे सल्ले दिले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर शेतकरी हरभऱ्याऐवजी हमखास सरकारी खरेदी होणाऱ्या गव्हाला पहिली पसंती देऊ शकतील. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत याबाबतीत स्पष्टता येईल. परंतु चांगल्या क्षेत्रवाढीची अपेक्षा, पिवळ्या वाटाण्याची चांगली उपलब्धता आणि ऑस्ट्रेलियामधील येऊ घातलेला हरभरा या घटकांमुळे देशांतर्गत बाजारात हरभऱ्याच्या किमती अल्प कालावधीत पाच ते सात टक्के नरम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात, यामध्ये बाजारात भाजीपाला पुरवठा मुबलक होऊन किमती कमी होतील असे गृहीत धरले आहे.

कापसाचे दर वाढतील का?

नुकताच प्रसिद्ध झालेला अमेरिकी कृषी खात्याचा (यूएसडीए) अहवाल भारतीय कापूस क्षेत्रासाठी निश्‍चितच चिंताजनक असून, चालू हंगामात भारत कापूस आयातदार बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील दोन दशकांत प्रमुख निर्यातदार असलेल्या भारतावर आयातीची वेळ येण्याची ही केवळ दुसरी वेळ असेल.

आकडेवारीत बोलायचे तर अमेरिकेने ऑगस्टमध्ये भारताशी मागील वर्षापेक्षा सहा पट अधिक कापूस निर्यातीचे सौदे केले आहेत. हा आकडा दोन वर्षांपूर्वी केलेल्या निर्यातीच्या दुप्पट आहे आणि त्या वर्षी देखील भारत कापूस नक्त आयातदार ठरला होता, हे अहवालात नमूद केले आहे. एवढेच नाही तर ब्राझील या भारताच्या प्रमुख स्पर्धकाने देखील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत भारताशी केलेले निर्यात सौदे मागील वर्षापेक्षा दुप्पट आहेत.

चालू हंगामासाठी भारताने कापसाच्या हमीभावात ७ टक्के वाढ करून दर्जानुसार ते प्रति क्विंटल ७१०० ते ७५०० रुपयांच्या दरम्यान ठेवले आहेत. खुल्या बाजारात ब्राझील, अमेरिका आणि पाकिस्तानसारख्या देशातील कापसाच्या किंमतीपेक्षा ते जास्त आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्राकडून स्थानिक कापसापेक्षा स्वस्त परदेशी कापसाला पसंती मिळत असल्याने आयात वाढण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात १२-१५ टक्के वाढ झाली तर भारतात कापसाचा बाजार नरमाईचाच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

(लेखक कृषी व्यापार व कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com