
सांगली ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम (Sugar Mill Crushing Season) सुरू केला आहे. गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेत एकरकमी ‘एफआरपी’ (One Time FRP) घेतल्याशिवाय शांत राहणार नाही, असा इशारा दिला. मात्र जिल्ह्यातील दत्त इंडिया वगळता इतर कोणत्याही साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याबाबत अद्यापही विचार केला नाही.
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील साखर कारखाने एफआरपीचे तुकडे करत आहेत. त्यामुळे यंदाही जिल्ह्यातील साखर कारखाने एफआरपीचे तुकडे करणार, की एकरकमी एफआरपी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.गाळप हंगाम सुरू झाला, की ऊसदराचा प्रश्न समोर येतो. स्वाभिमानी शेतकरी संघटना दरवर्षी जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेतात.
त्यामध्ये दराची भूमिका मांडतात. या वर्षीही एक रकमी एफआरपीची मागणी केली आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी देण्याचे जाहीर करून आघाडी घेतली आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील दत्त इंडिया, अर्थात वसंतदादा कारखान्याने एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर करून दराची कोंडी फोडली आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा पुढे येऊन दराची कोंडी फोडत आहे. यंदाही कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सावध पवित्रा घेत एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर करत हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या विरोधाशिवाय ऊसतोडणी सुरू झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सांगली जिल्ह्यातील सुमारे १२ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. येत्या आठवड्यापासून गाळपास गती येईल. परंतु अद्यापही एक रकमी एफआरपीबाबत साखर कारखानदारांनी आपली भूमिका गुलदस्तातच ठेवली आहे. वास्तविक पाहता, जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गेल्या तीन वर्षांपासून एकरकमी एफआरपीचे तुकडे पाडले आहेत.
गतवर्षी देखील याच पद्धतीने साखर कारखान्यांनी भूमिका घेतली होती. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध करून रस्त्यावर उतरले होते. मात्र अपवाद वगळता तीन साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी देण्याचे जाहीर केले. यंदाही एकरकमी एफआरपी देण्याबाबत जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मौन बाळगले आहे.
त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत ऊस दराबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना एकरकमी एफआरपीबाबत कोणतीही भूमिका घेणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकरकमी एफआरपीसाठी ‘मोटर रॅली’
जिल्ह्यातील कारखानदारांनी एकरकमी एफआरपीची घोषणा करावी, यासाठी सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले असून, मोटर रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. मोटरसायकल रॅली काढून एक प्रकारे कारखानदारांवर दबाव टाकला असला, तरी एकरकमी एफआरपी जाहीर करणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.