Tribal Livelihood : रानमेवा विक्रीतून आदिवासींना हंगामी रोजगार

Nashik Forest Fruits : नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा व दिंडोरी या तालुक्यांमध्ये रानमेवा मोठ्या प्रमाणावर आढळतो. यामध्ये गावठी आंबे, करवंदे, जांभूळ आळव, भोकर आदी रानमेव्याची ग्राहकांकडून मोठी मागणी असते
Tribal Livelihood
Tribal Livelihood Agrowon
Published on
Updated on

Tribal Employment : आदिवासी भागात रोजगार संधी मर्यादित असतात. भात, नागली, वरई अशी प्रमुख पिके असल्याने उन्हाळ्यात पोटापाण्यासाठी अनेकांवर स्थलांतराची वेळ येते. परंतु याच उन्हाळ्यात इगतपुरी, त्रंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा व दिंडोरी तालुक्यांतील डोंगरदऱ्यांमध्ये विविध प्रकारचा रानमेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो.

तो गोळा करून शहरांमध्ये विक्री करण्याचे काम आदिवासी करतात. त्यातून त्यांच्या घरची चूल पेटण्यास मदत होते. डोंगरची काळी मैना, गावठी आंबा, पिकलेल्या आंबट गोड शाका, चिकूसारखे दिसणारे आंबट गोड आळव, आकाराने लहान पांढरी हलकीशी गुलाबी पिठाळ गोड औषधी भोकर आणि सर्वाधिक मागणी असलेले गर्द जांभूळ अशा या विविध रानमेव्यांनी हा परिसर समृद्ध असतो.

कमलबाईंचा अनुभव

तळवाडे (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील कमलबाई आहेर आपला रानमेवा विक्रीचा अनुभव विषद करतात. त्या म्हणतात, की वनक्षेत्रात डोंगरदऱ्यांमध्ये महिला आणि पुरुष असे दोघेही सकाळी लवकर उठून रानमेवा वेचण्यासाठी जातात. घरी आणून निवडून ती किरकोळ विक्रेत्यांना पुरवली जातात. काही आदिवासी नाशिक शहराच्या मोक्याच्या ठिकाणी तसेच पर्यटन स्थळे, मंदिरे आदी ठिकाणी झाडाखाली विक्री करतात. एरवी वर्षभर दुर्मीळ असलेला व उन्हाळ्यातच उपलब्ध होणारा हा रानमेवा घेण्यासाठी ग्राहक आवर्जून आपली गाडी थांबवून खरेदी करतात.

कमलाबाई पंधरा वर्षांपासून नाशिक शहरात करवंदे, आंबा, जांभूळ घेऊन विक्रीसाठी येतात. यंदा तीव्र उष्ण तापमान आणि त्यानंतर अति पाऊस याचा मोठा फटका बसून रानमेवा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध झाला. ग्राहकांची मागणी असल्याने दर मात्र वाढले. अर्थात, दरवर्षीच्या तुलनेत विक्री कमी झाल्याचे कमलाबाईंनी सांगितले.

हवामान बदल, उन्हाळ्यातील तापमानवाढ व जंगलात लागणाऱ्या वणव्याचा फटका डोंगरातील वनसंपदेला बसतो आहे. याचाच परिणाम यंदा पाहण्यास मिळाला. जांभूळ उत्पादन ५० टक्क्यांहून कमी, मोहोर झडल्याने गावठी आंब्याचे चाळीस टक्यांपर्यंत, तर करवंदे व आळव्यांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत कमी आहे.

Tribal Livelihood
Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

रानमेव्याची आवक व विक्री

सिन्नर, देवळा, सटाणा या भागातूनही रानमेव्याची आवक होते. नाशिक जिल्ह्यात पर्यटन स्थळांसह आध्यात्मिक ठिकाणे अधिक आहेत. यात नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, सप्तशृंगी या रस्त्यांवर भाविकांची गर्दी असते. नाशिकहून मुंबई, सापुतारा, धुळे कडे जाणाऱ्या रस्त्यांवरही अनेकजण विक्री करतात.

नाशिक शहरातही पंचवटी, मेन रोड, द्वारका, मुंबई नाका, गंजमाळ, सिडको, गंगापूर रोड या परिसरात आदिवासी थेट विक्री करतात. आदिवासी शेतकरी मालाच्या गुणवत्तेकडे सर्वाधिक लक्ष देतात. फळांची हाताळणी, प्रतवारी करून आकर्षकपणे बांबूच्या टोपल्यांमधून फळे सादर करतात. नाशिक शहर व परिसरात शेकडो विक्रेते हंगामात दाखल होत असतात. विक्रीतून दिवसाकाठी पंधराशे रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत उलाढाल होते.

जांभळाची बाजारपेठ

इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, नाशिक शहर आदी भागांतील गावांमध्ये जांभळाचे सौदे होतात. जांभळाचा हंगाम अवघ्या एक ते दीड महिन्याचा असतो. अलीकडे औषधी गुणधर्मामुळे जांभळाची मागणी वाढली आहे.

इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा, नाशिक, दिंडोरी, निफाड, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवड या तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात जांभळीची झाडे आहेत. झाडांना जांभळे लगडल्यानंतर त्यांची वेळेत काळजीपूर्वक काढणी करून ती बाजारात विक्रीसाठी आणावी लागतात.

Tribal Livelihood
Ranmeva Mithai : रानमेव्याच्या मिठाईची परदेशवारी

काही शेतकरी स्वतः विक्री करतात. तर काही छोटे व्यापारी शेतकऱ्यांसोबत सौदा करून फळे उतरवून बाजारात विक्रीसाठी आणतात. यंदा आवक कमी असल्याने प्रतवारीनुसार २५० ते ४०० रुपये प्रति किलोपर्यंत त्यास दर मिळत आहे. ग्राहकांकडून गावरान व संकरित अशा दोन्ही वाणांना मागणी असते. अनेक शेतकऱ्यांकडे देशी जांभळाची झाडे आहेत. ही जांभळे आकाराने लहान असतात. काहींनी ‘कोकण बहाडोली’ या वाणाची लागवड केली आहे. ही फळे टपोरी आणि आकर्षक असतात.

रानमेव्याचे दर प्रति किलो रुपये

गावठी आंबा ५० ते ८० करवंद १५० ते २००

आळव १८० ते २०० जांभूळ २५० ते ४००

पंधरा वर्षांपासून रानमेव्याची विक्री करत आहे. घोटी बाजारातून खरेदी करून विकण्यावर माझा भर असतो. मांजरगाव, निरपण, भरवस, धारगाव भागात रानमेवा मिळतो. यंदा तो महागला आहे.
त्र्यंबक रामा लचके, ९२०९७८८०७१ वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी
रोजगाराचे साधन म्हणून मागील दहा वर्षांपासून जांभूळ विक्री करतो आहे. इतरांकडे कामाला जाण्यापेक्षा या व्यवसायातून रोजगार निर्मिती होते. शिवाय हजार रुपयांपर्यंत हंगामी नफा मिळतो. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जांभूळ उत्पादन कमी असल्याने सौदे उंचात गेले आहेत.
वाळू काशिनाथ सोपनर, ९७६३७७०६५९ शिरसाठे, ता. इगतपुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com