Rain Update : सोलापूर जिल्ह्यात ‘मॅान्सून’ची सर्वदूर हजेरी

Rain News : या पावसात फारसा जोर नसला, तरी त्याची हजेरी मात्र सुखावणारी आहे. या पावसामुळे खरिपासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Rain
RainAgrowon

Solapur News : जिल्ह्यात मॅान्सूनने अगदी वेळेवर हजेरी लावली असून, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भाग त्याने व्यापला आहे. शुक्रवारी (ता. ७) पुन्हा सायंकाळी जिल्ह्यातील मोहोळ, सांगोला, पंढरपूर, करमाळा, माढा, माळशिरस अशी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. या पावसात फारसा जोर नसला, तरी त्याची हजेरी मात्र सुखावणारी आहे. या पावसामुळे खरिपासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या हंगामात तुलनेने कमी पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात मोठी टंचाई जाणवली. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यावर त्याचा परिणाम झाला. विशेषतः जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यातच तापमानाचा पाराही तब्बल ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. पण आता पावसाने वेळेवर आणि लवकर सुरुवात केली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातत्याने वातावरणात अचानक बदल होतो आहे.

Rain
Rain Update : पुण्यात ढगफुटीसदृष्य! राज्यात आनंदाच्या मॉन्सून सरी

दिवसभर कडाक्याचे ऊन आणि सायंकाळी पाऊस असा क्रम ठरलेला आहे. बुधवारी (ता. ५) आणि गुरुवारी (ता. ६) या दोन्ही दिवशी सलग पाऊस झाल्यानंतर शुक्रवारी (ता. ७) पुन्हा मेघगर्जनेसह जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मोहोळ, माढा, करमाळा भागांत पाऊस झाला. पंढरपुरातील करकंब, पटवर्धनकुरोली, भंडीशेगाव, कासेगाव, तुंगत, चळे, पुळूज या भागांत पावसाचा जोर राहिला. सांगोला तालुक्यातील शिवणे, जवळा, हातीद, सोनंद, महूद, संगेवाडी या भागांतही चांगला पाऊस झाला, या पावसाची ५३.७ इतकी मिलिमीटर नोंद झाली.

पंढरपूर, सांगोला तालुक्यांतील काही भागांत १०-१५ मिनिटेच पाऊस पडला, पण त्यात मोठा जोर राहिला. त्यामुळे या भागातील शेताच्या ताली भरल्या, काही भागांत शेतातून पाणी वाहू लागले. करमाळ्यातील केत्तूरसह टाकळी, जिंती, कुंभारगाव, पारेवाडी, दिवेगव्हाण, राजुरी, वांशिबे, सावडी भागात पावसाने सलग दोन दिवसांपासून पाऊस हजेरी लावतो आहे. या भागात शेतीच्या ताली भरल्या, काही ठिकाणी शेतीचे बांध फुटले.

माढ्यातील मोडनिंबसह परिसरात पावसाचा जोर राहिला. या पावसामुळे येथील ओढ्याला पाणी आले. या पाण्यात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला भगदाड पडले. मोडनिंबमधील बालाजी वाघ यांच्या वस्तीचे मोठे नुकसान झाले. माळशिरस तालुक्यातही विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. नातेपुते, मांडवे, सदाशिवनगर, माळशिरस भागांत पाऊस झाला.

Rain
Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

अनेक भागांत झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी विजांच्या ताराही तुटल्याच्या घटना घडल्या. या पावसामुळे किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटेल, अशी आशा ग्रामस्थांना वाटते आहे. मोहोळमध्येही पेनूर, पाटकूल, खंडाळी, पापरी, येवती परिसरात चांगला पाऊस झाला, काही भागात तर ओढे, नाले, पाझर तलाव, समतल चर पाण्याने भरून वाहू लागले.

वीज पडल्याने दोघांचा मृत्यू

सोलापुरात शुक्रवारी विजेच्या कडकडाटासह पाऊस होता. त्यात दोन गावांमध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडल्या असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. एक व्यक्ती जखमी, तसेच दोन शेळ्या ही दगावल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळळी गावात वीज कोसळ्याने आमसिद्ध गायकवाड (वय ६७) यांचा मृत्यू झाला.

तसेच गायकवाड यांच्या दोन शेळ्या दगावल्या. कुंभारी गावात बिळेणी डक्के या ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू वीज पडल्यानेच झाला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्याशिवाय दोड्डी गावात वीज कोसळल्याने शंकर राठोड हे वृद्ध व्यक्ती जखमी झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com