Rain Update : पुण्यात ढगफुटीसदृष्य! राज्यात आनंदाच्या मॉन्सून सरी

Monsoon Rain Update : देशात मॉन्सून दाखल झाला असून तो हळूहळू सर्व भागात पोहचत आहे. राज्यात देखील गुरूवारी (ता. ०६) दाखल झाला आहे. सध्या राज्यात मॉन्सूनची पुढे वाटचल सुरू असून आणखी काही दिवसात राज्यभर मॉन्सून बरसेल.
Rain
Rain agrowon

Pune News : राज्यातील तळ कोकणात गुरूवारी (ता. ०६) मॉन्सून दाखल झाला असून तो रविवारी (ता.०९) किंवा सोमवारी (ता.१०) पुणे शहरात दाखल होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने याआधीच वर्तवली आहे. यादरम्यान शनिवरी (ता.०८) राज्याच्या विविध भागात पावसाने हैदोस घातला. पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, लातूर, बीड, गोंदिया जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे.

पुण्यात ढगफुटीसदृष्य

शनिवरी (ता.०८) पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. येथील अप्पर ओटा याठिकाणी झाड पडून एका व्यक्तीच्या मृत्यू झाला. तर शिवाजी नगर, जेएम रस्ता, हडपसर, सिंहगड रोड परिसर, वारजे या भागात मुसळधार पाऊस झाला. तसेच आपटे रोड परिसरतील रस्त्याला नदीचे स्वरूप आल्याने वाहने रस्त्यावर अडकली होती. येरवडा परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने सामानाचे नुकसान झाले. त्यामुळे रहिवाश्यांचे प्रचंड हाल झाले. त्यावरून पुणे महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईवर पुणेकरांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

मुंबईला पावसाचा फटका

मुंबईला देखील मॉन्सून पूर्व पावसाचा फटका बसला असून याचा परिणाम लोकल रेल्वे सेवेवर झाला आहे. येथील अप आणि डाऊन जलद मार्गावरील सेवा स्लो झाली आहे. तर आंबरनाथ दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली. दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहरांच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तर मुसळधार पावसामुळे मुंबई- अहमदाबाद महामार्ग खचला. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान हवामानशास्त्र विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Rain
Pune Monsoon Rain : मॉन्सून पूर्व पावसाच्या दणक्यात पुण्याची दाणादाण; सुप्रिया सुळेंची टीका

साताऱ्यात धुवाँधार पाऊस

साताऱ्यात देखील यंदा वेळेत मॉन्सून सक्रिय झाला असून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे. जिल्ह्यात कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना, नवजासह सातारा शहरात देखील धुवाँधार पाऊस झाला. जोरदार पावसाने ओढे नाले भरून वाहत होते. त्यामुळे काही ठिकाणी पुलावर पाणी आले होते. याचा थेट परिणाम वाहतुकीवर झाला. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यांतही पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लातूरमधील ओढे-नाल्यांना पूर

लातूर जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कधी एकदा पाऊस पडतो अशी अवस्था येथील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची झाली होती. निलंगा तालुक्यातील विविध गावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वडगाव, आनंदवाडी, शिवणी कोतल, शेडोळ, तुपडी, हाडगा गावांमध्ये मुसळधार पावसामुळे ओढे-नाल्यांना पूर आला. तर शिवणी कोतल ते आनंदवाडी रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. तसेच उमरगा - हाडगा येथे रस्त्यावर वादळी वाऱ्याने झाड पडल्याने हा मार्ग बंद झाला होता.

सोलापूरात पावसाची जोरदार बॅटिंग

सोलापूर शहरात शनिवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. तर उकड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान रविवारी शहर आणि जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

कोल्हापूरात अनेक रस्ते पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात देखील शनिवारी जोरदार पाऊस झाला. हातकणंगले तालुक्यात मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलावरून पाणी वाहत होते. बायपास रोडवर पाणी आल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. इचलकरंजी, पट्टणकोडोली, रूई, हुपरीसह कागल, गडहिंग्लज तालुक्यांना देखील पावसाने झोडपले. कागलमधील कापशी-बाळेघोल ते हडलगे मार्ग बंद झाला होता. दरम्यान जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने खरीपाच्या पेरण्यांना गती आली आहे. गेले अनेक दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतीच्या कामांना उसंत मिळाली होती. यादरम्यान आता मॉन्सून पूर्व पाऊस आणि आता मॉन्सूनच्या दमदार हजेरीने शेतीच्या कामांना गती आली आहे.

Rain
Monsoon Rain: माॅन्सूनची पुणे, नांदेड, लातूर, धाराशिवपर्यंत मजल; बहुतांशी भागात पावसाचा अंदाज

बीडच्या सरस्वती नदीला पूर

बीडच्या माजलगाव तालुक्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कोथाळा गावातून वाहणाऱ्या सरस्वती नदीला पूर आला. सरस्वती नदी जोरदार पावसामुळे दुथडी भरून वाहू लागल्याने नदीचे पाणी शेतामध्ये साचले आहे. दरम्यान दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बीडच्या माजलगाव तालुक्यात पावसाच्या धारा कोसळल्याने सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त केला जात आहे.

नाशिकच्या दिंडोरीला झोडपले

गुरुवारी महाराष्ट्रात मान्सून झाल्यापासून राज्याच्या वातावरणात बदल होत आहे. राज्याच्या विविध भागात पाऊस होत असून शुक्रवारी नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्याला पावसाने झोडपले. येथील सप्तशृंगी गडावर मॉन्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पावसाच्या आगमनामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण असून दिंडोरी – नाशिक रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तसेच पहिल्याच पावसात दिंडोरीत पूर सदृश्यस्थिती निर्माण झाली होती. नदी-नाल्यांना पूर आला.

गोंदियात विद्युत खांबांची पडझड

गोंदियात देखील शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली. तसेच विद्युत खांबांसह झाडांची पडझड झाली. तसेच शेतीचे देखील नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com