
Santosh Dukre Story जुना प्रवाह जागा बदलत नाही आणि बदल हाच नव्याचा मुलभूत स्वभाव. वयानुसार माणूस बदलतो. स्वभाव (Nature) प्रगल्भ होत जातो. आपसुक ताठ म्हणजेच रिजिडही. मग ही गोष्ट अशीच झाली पाहिजे, असा अट्टाहासही. जुन्या नव्याचा संघर्ष (Battle) याच टप्प्यावर. घरोघर.
केरभाऊ. कर्तृत्ववान माणसाचं म्हटलं तर कर्तृत्ववान पोरगं. बापाला वाटतं यानं हे करावं ते करावं. तो करतोही खूप काही. दोघांचं उद्दीष्ट एकच पण त्याची स्टाईल वेगळी, अँगल वेगळा.
केरभाऊ कामाला जुंपला की दामाजी हे असंच कर, ते तसंच कर असा आग्रह धरणार आणि मग केरू त्याच्या पद्धतीने आणखी जोर लावणार. सुरवातीला ठिक होतं. पण दोघांचीही वयं वाढली तसं यठाण सटायला लागलं. पोरगं वाकडं वढतंय म्हणून दामा नाराज आणि म्हतारं कामात स्पेस देत नाही म्हणून केरू.
एकाच हाताची दोन बोटं. टिपान बसवायचं कसं... म्हतारं आपल्या पद्धतीने करू देत नाही तोवर घरच्या कामात डोकं लावायचं नाही, मजुरासारखं सांगतील तसं, सांगतील तेवढं करायचं आणि उरल्या वेळात आवडीच्या कामात (जे दामाच्या दृष्टीने बावळटपणाचा उद्योग) झोकून द्यायचं... मग गड्यानं आळेफाट्यावर हार्डवेअरचं दुकान टाकलं.
काल भेटला गडी बेल्ह्यात. म्हणे तुम्हीच सांगा काय करू. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत राहीलो तर मला माझी पावलं सापडत नाहीत. आणि बरोबरच पण स्वतःची पावलं उमटवत चाललो तर ते त्यांना पटत नाही.
बोटांनी एकजुटीने काम करावं हे मान्य आहे... पण बेचक्यात चिखल्या झाल्यात, मलम लावून भागत नाही. अपेक्षांचं ओझं कमी होत नाही.
मी तरी काय सांगणार. म्हटलं बाबा रे तुझा माझा बाप पेरणी करत असतो. धान्य हाती येतं. आज धान्य हाती आलं की उद्या लगेच ते पेरतो का ? नाही. बीजाला पक्व होण्यासाठी सुप्तावस्थेत, डॉर्मन्सीत जावं लागतं. नव्यालाच डॉर्मन्सी पिरियड, सुप्तावस्था स्विकारून काही काळ जावू द्यावा लागेल.
आपलं बीज डॉर्मन्सित अधिक बळकट, सक्षम झालंय हे लक्षात आलं की शेतकरी योग्य वेळी त्याची पेरणी करतो, मर्यादा ओलांडून भरघोस पिक घेतो. तुझी डॉर्मन्सी पूर्ण होईपर्यंत धीर धर. दामाशेठ तुला पेरतील आणि तू बहरशील.
आधीच्या पिढीच्या मर्यादा किंवा सिमारेषा या नव्या पिढीच्या क्षितिज नसाव्यात हे खरं. पण वाळलं लाकूड वाकवायच्या भानगडीत पडू नको. त्याच्या आधारानं वल्ल्याला वाकू दे, झूकू दे आणि मग पूर्ण ताकदीने उसळू दे.
त्याला कितपत पटलं माहित नाही. पण मुंडी हलवली. तेवढ्यात दामाचा फोन आला... कुठे आहेस ? काय करतोयस ? इथंच हे बेल्ह्यात. आलो लगेच डॉर्मन्सीत... सॉरी... घरी. फोन बंद झाला आणि डॉर्मन्सी सुरू.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.