- बालाजी सुतार
एक साधा सरळ माणूस होता. नेहमीच्या परिचयाचा. अचानक एकेदिवशी तो ‘बाबा’ झाल्याचं कळलं. करणी भानामती वगैरे तर सोडाच; जवळजवळ सगळ्या आजारांवर देखील तो ‘तोडगे’ सांगू लागला. कुणी ‘डोकं दुखतंय खूप. काही केल्या राहत नाही.’ असं दुखणं घेऊन आला की लगेच हा त्याच्या घरी जाऊन तो कुठे झोपतो ती जागा विचारून तिथे फुटभर खोदून त्या खड्ड्यातून काळी बाहुली आणि गुलाल फासलेलं लिंबू वगैरे काढून दाखवायचा आणि अमक्यातमक्याने तुझ्यावर करणी केली आहे, त्यावर रामबाण उपाय म्हणून तू ‘श्री गुरुदेव दत्त’ असल्या काहीतरी मंत्राचा जप कर आणि दर गुरुवारी माझ्या दरबारात हजेरी लाव असं सांगून हजारपाचशे रुपये कडोसरीला लावून जायचा. असं होता होता अवघ्या वर्षा-दोन वर्षात महाराजांच्या घरीदारी जंगी जत्रा भरायला लागली.
आपापल्या कटकटी घेऊन लांबलांबून लोक भाड्याच्या जिपा किंवा अगदी स्वत:च्या कारमधूनही येऊ लागले. त्यात भाबडे असायचे तसे व्यापारीही आणि अडाणी होते तसे शिकलेलेही. आपल्याला काहीतरी ‘बाहेरचं’ बाधलं आहे, असं मनोमन वाटून घेणारे असंख्य जण. काही दिवसांनी गावातल्या काही तरुण पोरांनी उचल खाल्ली. त्यांनी महाराजांच्या दरबारावर धाड घातली. एक अविवाहित मुलगी साडी नेसून आणि कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र अशा वेशात तिथे आली आणि लग्न होऊन चार वर्षे झाली तरी मुलबाळ होत नाही असं म्हणून महाराजांच्या पायांवर घातली. महाराजांनी लगेचच तिला पुत्रप्राप्तीसाठी तोडगा सुचवला. मग ती मुलगी म्हणाली, माझं अजून लग्नच झालेलं नाही. मग पोरांनी मोठाच गदारोळ केला. महाराजावर पोलीस केस केली. महाराजाने तिथे कबूल केलं की मला तंत्रमंत्रातलं काहीच उमगत नाही. मी लोकांना फसवत आहे. मग यापुढे असं काही करणार नाही असं त्यानं लेखी दिलं. पोरांनी तक्रार मागे घेतली. संध्याकाळी गावात एक सभा झाली. त्यातही महाराजाने ‘आपण महाराज नसल्याचं’ कबूल केलं. यापुढे ‘मी हा ‘धंदा’ करणार नाही’ असं जाहीरपणे सांगितलं.
ही गोष्ट इथे संपली असती तरी चाललं असतं. पण तसं झालं नाही. गोष्ट पुढे चालूच राहिली. दर गुरुवारी लोक जत्थ्याने त्याच्याकडे येत राहिले आणि महाराज तोडगे सांगत राहिला. पुढे पुढे तो एक प्रस्थच होवून बसला. परिसरातले अनेक गावठी राजकारणीसुद्धा त्याच्याकडे येऊन साकडं घालू लागले तेव्हा महाराज पोरांच्या आटोक्याबाहेरच गेला.
सत्ताकारणी आणि बुवाबाजी यांचा एक अनन्यसाधारण सबंध असतो. त्यात केवळ अज्ञानापोटी, देवभोळेपणापोटी आणि जारणमारण-करणीभानामती असल्या भाकड गोष्टींवर असलेल्या आंधळ्या विश्वासापोटी सामान्य लोक भरडत राहतात. मानसिक, आर्थिक आणि शारीरिकही शोषण होतं आणि ते ‘शोषण’ आहे हेच कळत नसल्यामुळे ते चक्र पुढेही अव्याहत चालत राहतं. याचंच दुसरं टोक म्हणून असला कुणी बाबाबुवा आपल्याच शिष्या असलेल्या मुलींचं लैंगिक शोषण करतो आणि हे शोषण झाल्याचं त्या मुली त्यांच्या घरी आईवडिलांना सांगतात तेव्हा खुद्द आपल्या पोटच्या मुलींवर विश्वास न ठेवता ते आईबाप त्या कुणा बाबावरची भक्ती तशीच अभंग ठेवतात.
आधी आसाराम बापू नावाच्या आणि नंतर गुरमीत राम रहीम सिंग नावाच्या पाखंडी बाबाने केलेल्या अत्याचाराच्या निमित्ताने ही बुवागिरीतली घाण आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
गाडगेबाबासारख्या कर्मयोग्याची भूमी असलेल्या या आपल्या महाराष्ट्रातही असल्या बाबाबुवांची भरमार आहे.
एक माणूस सरकारी नोकरीत लाच खाल्ल्याच्या आरोपावरून बडतर्फ होतो आणि नंतर तो ‘महाराज’ होतो, हा चमत्कार आपल्याच भूमीत घडून आलेला आहे. हा माणूस आता गावोगाव पाच दहा एकरांचे मंडप टाकून त्यात स्वत:चे दर्शन सोहळे आयोजित करतो आणि तुकारामांचा, गाडगेबाबांचा वारसा सांगणारे आपण लोक लाखोंच्या संख्येने तिथे दर्शनासाठी आणि प्रवचन नावाच्या भाकडकथा ऐकण्यासाठी गर्दी करतो, हे क्लेशदायक आहे. समाज म्हणून आपण कुठल्या दिशेने प्रवास करतो आहोत, हे ठळकपणे सांगणारं आहे. लाख लाख रुपये घेऊन कीर्तन नामक तमाशा करणारे कीर्तनकार इथे आहेत. आणि त्यांना लाखांच्या संख्येने अनुयायी आहेत, हे चित्र मध्ययुगाच्या दिशेने घेऊन जाणारं आहे, हे वाईट आहे असंही कुणाला वाटताना दिसत नाही.
ज्याच्यावर बलात्काराचा आरोप सिद्ध झाला आहे त्या रामरहीम सिंग नावाच्या भुरट्याला पकडण्यासाठी यंत्रणेला आठशे गाड्यांचा ताफा उभा करावा लागतो आणि त्याच्यावरचा आरोप सिद्ध झाल्यानंतरही, कायद्याला कायद्याचं काम करू देण्याऐवजी त्याचे कथित भक्त रस्त्यावर येऊन हिंसाचार माजवतात, त्यात पाचपन्नास जणांची हत्या होते, मोठ्या प्रमाणावर गाड्यांची जाळपोळ होते. शाळा कॉलेजांना चार चार दिवस सुट्ट्या जाहीर कराव्या लागतात, जमावबंदी घोषित केलेली असूनही लाखो लोक रस्त्यावर उतरतात आणि त्यांना रोखण्यासाठी यंत्रणा अपुरी पडते, किंबहुना यंत्रणेत महत्वाच्या जागांवर बसलेल्या नेत्यांची तशी इच्छाच नसते कारण नेत्यांना निवडणुकीत बाबाची गरज भासत असते.
आणखी कुणी एखादा बुलंद राजकीय नेता अवाढव्य भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात असतो तेव्हा नाशिकमध्ये असाच काही लाखांचा महामोर्चा निघतो आणि ते लाख लोक मागणी करतात की आमच्या नेत्याला सोडून द्या. कारण तो आमच्या जातीचं, आमच्या समूहाचं हित पाहणारा नेता आहे. आमचे जातीय सामुहिक स्वार्थ आम्हाला त्याच्याकडून साधून घेता येतात, म्हणून त्याने केलेला गैरव्यवहार आमच्या दृष्टीने क्षम्य आहे.
काय चाललं आहे हे आपल्या भोवतालात?
इथली माणसं शिक्षित होत गेली तसतसा इथला समाज अधिकाधिक नालायकीकडे प्रवास करतो आहे. अशा बाबा बुवांच्या भजनी लागलेल्यात निदान अर्धेअधिक लोक स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारे असतात. म्हणजे शिक्षणाने, आधुनिक विज्ञानाच्या, आधुनिक शास्त्रांच्या शिक्षणानेही यांच्यात काही फरक पडत नसेल तर या लोकांना सुशिक्षित म्हणावं कुठल्या आधारावर?
आपल्या समाजातले सर्वोच्च राजकीय नेते एखाद्या बाबाचे भक्त असतात. आपल्या समाजातले ख्यातकीर्त शास्त्रज्ञ एखाद्या बाबाच्या पायांशी बसून स्वत:चे फोटो काढवून घेतात. हा बाबा हवेत हात फिरवून या उच्चपदस्थ भक्तांना रत्नजडीत अंगठ्या काढून देतो आणि सामान्य भक्तांच्या हातावर मात्र चिमूटभर भस्म टिकवतो, तेव्हा बाबाची मतलबी भोंदूगिरी खरंतर लपून राहत नाही. ती उघड असते. पण तरीही ती भक्तांना जाणवत नाही; कारण त्यांच्या डोळ्यांवर कथित भक्तीची झापडं त्यांनी स्वत:हून बांधून घेतलेली असतात.
लोकहो, जागे व्हा. खोट्या श्रद्धांची, खोट्या परंपरांची आणि आत्मघातकी विचारांची आपल्या हातांनी आपल्या डोळ्यांवर बांधलेली ही झापडं काढून फेका. दृष्टी निरामय निरोगी आणि खरोखर डोळस व्हावी यासाठी प्रयत्न करा.
कुणाही आसारामला, कुणाही गुरमीत राम रहीमला आपल्या लेकींकडे वावग्या नजरेने पाहता नये, इतकं तेज स्वत:च्या डोळ्यांत निर्माण करा.
‘डोळस’ ‘माणूस’ व्हा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.