

कोषांतराचा सिद्धान्त :
आदिवासींचा उठाव झाला की त्यांची गाणी (Farmer Song) होतात, दलित चळवळीत तर खूप गाणी आहेत. स्त्रीवादी चळवळीलाही गाण्यांची कधी वानवा पडली नाही.
कामगार चळवळींनी असंख्य गाणी रचली. शेतकरी आंदोलनात (Farmer Protest) मात्र शेतकऱ्यांचे गाणे तयार झाले नाही.
साने गुरुजींचे (Sane Guruji) ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान’ हे 70-75 वर्षांपूर्वी लिहिले गेलेले गाणे आजही गाते लागे. असे का? शेतकऱ्यांच्या चळवळीचे (Farmers movement) गाणे का तयार होऊ शकले नाही?.
विदेशातून मोगल आले, त्यांनी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली. एके काळी ब्राह्मणांनी गाव सोडले, त्यांनीही सुंदर लेखन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘गाव सोडा’ या आवाहनाला प्रतिसाद देऊन दलितांनी गाव सोडले.
1960नंतर दलितांच्या लिखाणाला धार चढली. आत्मचरित्रे, नाटके, कविता, कादंबऱ्या या सर्व क्षेत्रांत दलित साहित्याने आपले वेगळेपण ठसविले. बलुतेदार बाहेर पडले, त्यांनीही विपुल लेखन केले.
या सर्व उदाहरणांवरून एक गोष्ट सिद्ध होते की, स्थलांतर करतात ते मोठ्या प्रमाणात साहित्य तयार करतात. त्यांच्यातील प्रतिभावंतांना अनुकूलता मिळते व ते लिखाण करू लागतात.
शेतकऱ्यांना स्थलांतर करता येत नाही. ते जमिनीशी बांधले गेलेले असतात. गावात जन्मायचे, गावात जगायचे, गावातच मरायचे असा त्यांचा जीवनक्रम असतो.
लेखनासाठी परकाया प्रवेशाची क्षमता महत्त्वाची मानली जाते. स्थलांतर केलेल्यांना ही अनुभूती मिळते. ते अधिक सुलभपणे ‘परकाया प्रवेश’ करू शकतात.
शेतकऱ्यांना जमीन, गुरे आदी कामांमुळे स्थलांतर करता आले नाही म्हणून शेतकऱ्यांनी लिहिलेले साहित्य तयार होऊ शकले नाही.
कुटुंब, जात, गाव, देश या समाजशास्त्रीय संस्था, कोष आहेत. या कोषांतून बाहेर पडणाऱ्यांना सर्जनाचे वातावरण मिळते.
कोषांतर करणारे समूह सांस्कृतिक पातळीवर तुलनेने अधिक सक्रिय दिसतात. शेतकऱ्याला हे वातावरण मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांचे साहित्य निर्माण झालेले नाही, असे म्हणता येईल.
बांडगुळी साहित्य :
प्रगत देशांकडे पाहिले तर असे लक्षात येते की, त्या देशांत शेतीवर जगणारे लोक खूपच कमी आहेत. काही देशांत तर, कोणी तरी शेती करावी म्हणून सरकारद्वारा प्रोत्साहन (insentive) दिले जाते.
आपल्या देशात शेतीवर जगणाऱ्यांची संख्या एके काळी 90 टक्के होती. अलीकडे स्थलांतराचे प्रमाण वाढले असले तरी अजूनही 55 ते 65 टक्के लोक शेतीवर जगतात.
देशाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. 1947 मध्ये 90 टक्के लोक शेतीवर होते. त्या वेळी लोकसंख्या फक्त 35 ते 40 कोटी होती. त्याच्या नव्वद टक्के म्हणजे जवळपास 34 ते 36 कोटी लोक शेतीवर जगात होते.
आज टक्केवारी कमी झाली असली तरी शेतीवर जगणाऱ्यांची संख्या मात्र वाढली. आज 70 ते 75 कोटी लोक शेतीवर जगतात.
जमीन तेवढीच राहिली, पण त्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या मात्र वाढली. शेतीच्या होल्डिंगचे प्रमाण पाहिले तर अजून भयंकर स्थिती दिसून येते.
कारण 85 टक्के जमीन जास्त होल्डिंगवाल्यांकडे आहे आणि 15 टक्क्यांत बाकीचे. जास्त जमीन कोणाकडे आहे? ते शेतकरी आहेत का? तुम्ही विचार करून पाहा.
कोणी नोकरीत असेल, कोणी पुढारी असेल, कोणाकडे नंबर दोनचा धंदा असेल. इन्कम टॅक्स वाचवायला या लोकांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत.
सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करून हजारो एकर जमिनी कारखानदारांना दिल्या आहेत. म्हणजेच, फक्त शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे तुकडे अत्यंत लहान झाले आहेत. त्यातील बरेच लोक अर्धवेळ मजूर झाले आहेत.
1990च्या नंतर स्थलांतराचा वेग वाढला. शेतकरी (यात मजूरही आले) शहरांकडे धाव घेत आहेत. असे असले तरी आज ऐपत असणारे लोक संख्येने कमी आहेत आणि ऐपत नसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणून एके काळी दरबारी साहित्य लिहिणारे साहित्यिक आज बांडगुळी साहित्य लिहिताना दिसत आहेत.
(बीड जिल्ह्यातील, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर गावात 21 व 22 जानेवारी रोजी झालेल्या मृदगंध साहित्य संमेलनाचे संपादित अध्यक्षीय भाषण.)
सौजन्यः साप्ताहिक साधना
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.