
Mutton Update : मांसाहाराला ग्रामीण भागात खूपच महत्त्व. त्यात शेळी-मेंढीचे मटणाचा मांसाहार हा सर्व उत्कृष्ट आणि प्रथिनयुक्त असलेला आहे. पण शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील शेळी-मेंढीचे मटण 750 ते 800 रुपये किलो झाले आहे. परिणामी हळूहळू मांसाहार खूपच कमी झाला आहे.
गरीबाच्या कुटुंबात तरी स्वतः विकत घेऊन खाण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. जागरण गोंधळ, यात्रा-उरुस, नवसाचे बोकड कापले तर पाहुणचार म्हणून किंवा अतिमहत्वाचे पाहुणे घरी आले तरच शेळी-मेंढीचे मटण पाहुणचार म्हणून आणले जाते.
सर्व्हे करून शेळी-मेंढीचे मटण सण-उत्सव-यात्रा वगळून गेल्या सहा महिन्यात कितीवेळा घरी विकत घेऊन खाण्यात आले असा प्रश्न विचारला तर 50 ते 60 टक्के कुटुंबातून या प्रश्नाचे उत्तर सहा महिन्यापूर्वी किंवा महाग असल्याने खाणे खूपच विरळ झाले आहे असे उत्तर मिळेल.
सीमांत शेतकरी, गरीब,मजुरी करणारे (तळागाळातील) कुटुंबे हे बॉयरल कोंबडीच्या मटण घेण्याकडे वळले आहेत. दुसरे, गावरान कोंबड्या ग्रामीण भागात अपवाद वगळता सापडत नाहीत. बालाघाट परिसरात काही कुटुंबाने गावरान कोंबड्या जतन केल्या आहेत, मात्र त्यांचे जिवंत कोंबडी-कोंबड्याचे दर 600 रुपये किलोपेक्षा जास्त आहेत.
पण विक्रीसाठी उपलब्ध नाही असेच चित्र. गाव यात्रेत किंवा आमच्याकडील आकाढी (आषाढी) यात्रेत विलायती कोंबड्या देवाच्या नावाने कापल्या जातात. देवानेही हे स्वीकारले आहे असं वाटतं.
आमच्याकडे आषाढी एकादशी झाल्यानंतरचा पंधरवडा (15 दिवस) आषाढी यात्रेचा असतो. अनेक गावांमध्ये या दिवसांमध्ये पाहुण्यांना आमंत्रण देऊन मटणाचा पाहुणचार (यात्रा) केली जाते. या यात्रेत देवाच्या नैवेद्य (निवध) पावशेर-अर्धाकिलो बोकडाचे मटण घेतले जाते. सार्वजनिकरित्या बोकड वाट्याने कापले जाते.
एकीकडे मटण खाणे मध्यम वर्गीयांकडून चैन-मेजवानी मानले जात असेलही पण शारीरिक कष्ट-श्रम करायचे म्हटले तर मांसाहार करणे आवश्यक आहे. कारण सततचे कष्ट आणि सकस आहार मिळत नसल्याने अनेकदा शरीरातील अनेक घटकांची कमतरता निर्माण होते.
त्यातील काही घटकांची पूर्तता मांसाहातून होते. उदा. मांसाहारातून कॅल्शिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बी १२ अधिक प्रमाणात मिळते. त्यामुळे शारीरिक क्षमता टिकून राहण्यास मदत होते. दुसरे, लहान मुलांची वाढ होताना मांसाहार केलेला चांगला.
अनेकदा डॉक्टरही सल्ला देत असतात. कारण त्यातून अधिक प्रमाणात प्रोटीन आणि फॅट मिळतात. तिसरे, अनेकदा सकस आहार न मिळाल्यामुळे रक्ताची कमतरता निर्माण होते. यामूळे पेशी कमी होणे, अशक्तपणा येणे असे आजारही होतात. यावर मटन खाणे फायद्याचे आहे. कारण मटणात भरपूर लोह असते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
शेतकऱ्यांकडून चार पैसे नडी-अडीला तात्काळ पैसा हाताशी असावा म्हणून शेळी-मेंढी पाळली जाते. ज्यांनी या शेळी-मेंढीचे येणाऱ्या पैशाचे महत्त्व माहीत आहे, अशा शेतकऱ्यांकडे दोन-चार शेळ्या पाळलेल्या दिसून येतात. ऐन पेरणी, घरातील आजारी व्यक्ती किंवा मुलांच्या शिक्षणासाठी या शेळी-बोकड विकून चार पैसे हाती येतील या आशेने शेळ्या पाळल्या जातात.
अलीकडे वाढलेले मटणाचे दर पाहता , शेळ्या-मेंढ्या पाळण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. पण खाण्याची वेळ येते तेव्हा महागाईचा अनेकदा विचार करावा लागतो. सीमांत शेतकऱ्यांकडून शेळीपालन व्यवसाय हा मांस उत्पादन करण्यासाठी करण्यात येत असला, तरीही स्वतःच्या ताटातून हा पदार्थ हळूहळू गायब होऊ लागला आहे हे मात्र निश्चित.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.