Jowar : मंगळवेढ्याची ज्वारी एवढी प्रसिध्द का?

तर मंगळवेढ्याच्या ज्वारीचं मूळ शोधत गेलं तर बऱ्याच रंजक गोष्टी आपल्याला समजतात. म्हणजे मंगळवेढ्याच्या ज्वारीला पण एक इतिहास आहे. देशभरात या ज्वारीला खास मागणी असते.
Jowar
JowarAgrowon

सोलापूरमध्ये प्रसिद्ध काय ? असं कोणी जर एखाद्या शेतकऱ्याला विचारलं तर हमखास उत्तर मिळत ज्वारी (Jowar) असं. त्यातही प्रसिद्ध आहे ती मंगळवेढ्याची ज्वारी (Mangalvedha Jowar). या ज्वारीची खमंग खरपूस अशी भाकरी (Jowar Bread) घास मोडल्याबरोबर तोंडात विरघळेल अशी आहे. ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेला हा भाग तसा पाण्याची कमतरता असणारा. दुष्काळ (Drought) या भागाला नवा नाही. पूर्वीच्या काळी बहमनी राजवटीत सलग बारा वर्षं दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांनी या भागाला ज्वारीचं कोठार कसं बनवलं त्याचीच ही गोष्ट.

Jowar
Parbhani Shakti Jowar: ही ज्वारी आरोग्यासाठी उपयुक्त का आहे?

तर मंगळवेढ्याच्या ज्वारीचं मूळ शोधत गेलं तर बऱ्याच रंजक गोष्टी आपल्याला समजतात. म्हणजे मंगळवेढ्याच्या ज्वारीला पण एक इतिहास आहे. देशभरात या ज्वारीला खास मागणी असते. एकेकाळी दुष्काळामुळे चर्चेत आलेला मंगळवेढा ज्वारीचं कोठार म्हणून सर्वत्र ओळखला जाऊ लागला. याला कारण म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांची दुष्काळाबरोबर दोन हात करण्याची ताकद.

बहमनी राजवटीत म्हणजेच १४६८ पासून ते १४७५ पर्यंत भीषण दुष्काळ पडला होता. याच काळात दामाजीपंत इथले तहसीलदार होते. दुष्काळात इथली जनावरं अन्न-पाण्यावाचून तडफडू लागली होती. लोक गाव सोडून जाऊ लागली होती. पण जिथे जाईल तिथं हीच परिस्थिती, सगळीकडे मरणासन्न अवस्था निर्माण झाली होती.

पण दुसरीकडे सुलतानाची गोदामं मात्र अन्नधान्यानं तुडुंब भरली होती. देशोधडीला लागलेली जनता भीक मागत फिरते, हे दामाजीपंतांना काही सहन झालं नाही. त्यांनी कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता सुलतानाची गोदामं जनतेसाठी खुली केली. ही खबर कानोकान पसरली. एक वेळचं जेवण मिळावं म्हणून लोक लांबून लांबून चालत मंगळवेढ्याला येऊ लागली. दामाजीपंतांनी कोठारं उघडी केल्याची बातमी सुलतानापर्यंत पोहोचली. सुलतानाने तात्काळ दामाजीपंतांना बेड्या ठोकल्या आणि बिदर दरबारात हजर केलं.

Jowar
Zipari Jowar: ११ ते १५ फूट वाढणारी झिपरी ज्वारी माहीत आहे का ? | ॲग्रोवन

यांसदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. या संकट काळात विठू महार नावाचा एक गरीब माणूस बिदर दरबारात आला. त्याने ६०० खंडी धान्यापोटी १ लाख २० हजार मोहरा भरून पावती घेतली आणि दामाजीपंतांची सुटका केली. हा विठू महार कोण? तर असं म्हटलं जातं की साक्षात पांडुरंगच विठू महाराचं रूप घेऊन बिदरला आला होता. दामाजीपंतांना आपल्यावर पंढरीच्या पांडुरंगाची कृपा झाल्याची जणू खात्री पटली. त्यानंतर त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. आणि आपलं आयुष्य पांडुरंगाच्या सेवेत घालवायचं ठरवलं.

पण सलग बारा वर्षे पडलेल्या दुर्गादेवीच्या दुष्काळानंतर इथल्या शेतकऱ्यांनी जगण्यासाठी मोठे कष्ट उपसले. त्यांनी मोठ्या जिद्दीन मंगळवेढ्यात ज्वारीची शेती फुलवली. दुष्काळी भागात शेती फुलवनं तितकसं सोपं नव्हतं. पण मंगळवेढ्याची जमीन अगदी कसदार. मंगळवेढ्याच्या पूर्व भागात १४५ चौरस किलोमीटरचा सलग सपाट कसदार जमिनीचा पट्टा आहे. असा पट्टा फक्त महाराष्ट्रातच नाही तर आशिया खंडातला एक वैशिष्ट्यपूर्ण पट्टा आहे. या भागात अतिशय खोल काळ्याभोर चिकन मातीने तयार झालेली सपाट जमीन आहे.

इथं पावसाचं पाणी पटकन बाहेर जात नाही. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर जमिनीच्या वरच्या भागात साचलेलं पाणी जणू काही समुद्रासारखं दिसतं. जास्त झालेलं पाणी वाहून जाण्यासाठी मध्यभागी छोट्या छोट्या वगळी दिसतात. उरलेलं पाणी शक्य तेवढं मुरतं. बाकी पाणी बाष्पीभवनाने उडून जात. इथल्या जमिनीत कुठंच चढ-उतार दिसत नाही. लिंब बाभळीची झाडं पण किरकोळ आहेत.

जमिनीची हीच सुपीकता ज्वारीसाठी जमेची बाजू ठरली. त्यामुळेच आजही मंगळवेढ्यात ज्वारीचं सर्वाधिक उत्पादन होतं. आता मंगळवेढ्यानंतर बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर अक्कलकोट भागात सरसकट ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं. इथल्या ज्वारीला एक वेगळीच चव आहे. ज्वारीच्या या मुबलक उत्पादनामुळे ज्वारी फक्त हुरडा आणि भाकरीपुरती मर्यादित राहिली नाही. आता ज्वारीपासून उपीट, इडली, चकली असे पदार्थ तयार केले जातात. त्याची बाजारपेठ सुद्धा जिल्ह्याला उपलब्ध झाली आहे.

आज अनेक महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था ज्वारीच्या कडक भाकरीच्या व्यवसायात उतरल्यात. सोलापूर जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच हमरस्त्यावरील हॉटेल्स, ढाब्यांवर मागणीनुसार ताजी आणि कडक भाकरी हमखास मिळते. शिवाय छोट्या-मोठ्या किराणा दुकानांतही ज्वारीची कडक भाकरी मिळते. तिची चव आणि लज्जत न्यारीच आहे. सततच्या पाठपुराव्यानंतर २०१६ मध्ये केंद्र सरकारकडून मंगळवेढ्याच्या ज्वारीला जीआय मानांकन मिळालं. साहजिकच इथल्या ज्वारीचा लौकिक जगभरात पोहोचला. ज्वारीची भाकरी हा महाराष्ट्राच्या परंपरागत आहारातला महत्त्वाचा घटक आहे. आरोग्याच्या दृष्टीने ज्वारीचं महत्त्व वाढत चाललंय. या सगळ्यामुळे जगाच्या नकाशावर मंगळवेढा आणि मंगळवेढ्याच्या ज्वारीला एक वेगळंच महत्व प्राप्त झालंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com