Shri Ann Project : श्री अन्न उत्कृष्टता प्रकल्पाबाबत लोकप्रतिनिधी गप्प का?

Millet Crop : गेल्या आठ-दहा दिवसांपासून यावरून गोंधळ सुरू आहे. पण सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांचे लोकप्रतिनिधी ठोस भूमिका घ्यायला तयार नाहीत.
Millet
MilletAgrowon

Solapur News : जिल्ह्यासाठी मंजूर झालेला श्री अन्न उत्कृष्टता प्रकल्प कोणत्याही ठोस कारणाशिवाय थेट बारामतीला हालवण्याबाबत शासनाने ‘स्पष्टपणे’ परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून यावरून गोंधळ सुरू आहे. पण सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांचे लोकप्रतिनिधी ठोस भूमिका घ्यायला तयार नाहीत.

भाजपचे आमदार सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी हे केवळ माध्यमांनी त्यांना विचारलेल्या प्रतिक्रियेवर उत्तराचा उपचार म्हणून बोलतात, पण स्वतःची भूमिका घेऊन प्रत्यक्षात ठोस किंवा जबाबदारी स्वीकारून बोलत नाहीत, कधी नव्हे तो मोठा प्रकल्प सोलापूरच्या वाट्याला आला आणि आता डोळ्यादेखत तो पळवला जातो आहे, तरी लोकप्रतिनिधी गप्प का, असा प्रश्‍न पडतो.

मूळात सोलापूर हा कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळखला जातो, ज्वारी, बाजरी यांसारखी भरडधान्यातील विविध धान्ये जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादित होतात. सोलापूरच्या शेतीची ही वैशिष्ट्य ओळखून, या उत्पादनाच्या अनुषंगाने त्याचे उत्पादन अधिक वाढावे, त्यावर प्रक्रिया सुलभ व्हावी, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग व्हावे यासाठी राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्याला श्री अन्न उत्कृष्टता प्रकल्प मंजूर केला. त्यासाठी तब्बल २०० कोटी रुपयांची तरतूदही केली. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या एक-दोन बैठका झाल्या.

Millet
Millet Year 2023 : तृणधान्यांपासून पारंपरिक पदार्थांची स्पर्धा

आमदार सुभाष देशमुख यांनी त्यासाठी जागेचा पर्याय दाखवला. पण मंजुरी मिळून आता कुठे कार्यवाहीला सुरुवात होणार, तोवरच हा प्रकल्प थेट बारामतीला नेण्यात येत आहे. २४ नोव्हेंबरच्या शासनाच्या परिपत्रकात तसा स्पष्ट उल्लेख आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर मुख्य प्रकल्प सोलापूर आणि त्यातील प्रशिक्षणाचा प्रकल्प बारामतीला आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे.

पण असा कोणताही उल्लेख शासनाच्या परिपत्रकात नाही, त्यामुळे हा गोंधळ आणखीनच वाढला आहे. वास्तविक, हे परिपत्रक समोर आल्यानंतर सर्वच लोकप्रतिनिधींनी स्वतःहून यात लक्ष घालून नेमकी वस्तुस्थिती समोर आणली पाहिजे.

पण कोणीच बोलायला तयार नाही. या उलट माध्यमांच्या प्रतिनिधींनी आमदार देशमुख आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले आमदार कल्याणशेट्टी यांना प्रश्‍न विचारल्यानंतरच त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच त्यांनी बघू, करू, असे होऊ देणार नाही, अशी आळणी उत्तरे देऊन माध्यमांच्या उत्तराचा सोपस्कार पूर्ण केला आहे.

पालकमंत्र्यांचा अभ्यास...

या सर्व प्रकरणावर आतापर्यंत केवळ चर्चा सुरू आहेत. शासनाच्या २४ नोव्हेंबरच्या परिपत्रकावर किंवा नव्याने परिपत्रक दुरुस्ती करण्याबाबत शासनातील कोणीही पुढे येऊन काहीच माहिती देत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर मोघम उत्तर दिले आहे.

प्रकल्प इथेच असणार असेल, तर दुरुस्तीचे परिपत्रक कुठे आहे, कशाच्या आधारे हा प्रकल्प इथे आहे. यावर कडी म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत हा विषय गेला, त्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारल्यावर मी सध्या अभ्यास करतो आहे, नेमके काय झाले आहे, हे माहिती घेतो, त्यानंतर बोलतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Millet
Millet : ‘श्री अन्न उत्कृष्टता’वरून जिल्ह्यात संभ्रम कायम

...थेट फडणवीसांकडे विचारणा का नाही

राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या आमदार असलेल्या प्रणिती शिंदे या एकमेव विरोधी पक्षातील आमदार उरल्या आहेत. बाकी विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, समाधान आवताडे हे भाजपचे आमदार तर राजेंद्र राऊत हे भाजपपुरस्कृत आमदार आहेत. विधान परिषदेवर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या रूपाने एक भाजप आमदार आहे.

त्याशिवाय यशवंत माने, संजय शिंदे, बबनराव शिंदे हे अजित पवार गटाचे आणि शहाजी पाटील हे शिंदे गटाचे आमदार आहेत. म्हणजे जिल्ह्यातील १२ आमदारांपैकी सर्वाधिक ११ आमदार हे सत्ताधारी पक्षातील आहेत, तरीही कोणीच याबाबत जाब विचारु शकत नाही, एरव्ही छोट्या-मोठ्या आंदोलनावेळी थेट फडणवीसांना फोन करणारे काही लोकप्रतिनिधी आता मूग गिळून गप्प का? असा प्रश्नही उपस्थित होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com