
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात पश्चिम भागासाठी वरदान असलेल्या गिरणा नदीतून अनेक भागांत बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. नदीत सात बलून बंधारे तयार झाल्यास वाळू उपसा थांबेल. आपले हित साधले जाणार नाही, अशा भीतीनेच या प्रकल्पास विलंब केला जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
युती सरकारचे तत्कालीन केंद्रीय मंत्री एम. के. अण्णा पाटील यांनी सुमारे २५ ते २६ वर्षांपूर्वी बलून बंधाऱ्यांची संकल्पना मांडली. सतत पाठपुरावा केला. पण त्या वेळेस काम मार्गी लागले नाही. सरकार अनुकूल नसल्याने हा प्रकल्प होत नसल्याची तक्रार त्या वेळच्या लोकप्रतिनिधींत होती. समविचारी सरकार हवे, आपले सरकार हवे, असे निवडणुकांत सांगितले जायचे.
राज्यात सध्या मंत्रिपदावर असलेल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी बलून बंधारे प्रकल्प करू, आमचे सरकार आणा, असे अनेकदा भाषणांत सांगितले. पण हा प्रकल्प मार्गी लागत नाही. गिरणा नदीत मोठा वाळूसाठा आहे. जिल्ह्यात अन्य नद्यांच्या तुलनेत गिरणातील वाळू उपयुक्त, दर्जेदार आहे. प्रत्येक तालुक्यात, मोठ्या गावांत मोठे अर्थकारण गिरणा नदीतील वाळूवर अवलंबून आहे. नदीकाठच्या अनेक गावांतील गावपुढाऱ्यांचे हितसंबंध वाळूत अडकले आहेत.
यात बलून बंधारे झाल्यास नदीतील वाळूउपसा शक्य होणार नाही. वाळूउपशात अडचणी येतील. यामुळेच की काय, बलून बंधारे प्रकल्प जाणीवपूर्वक दुर्लक्षित आहे, असा आरोप केला जात आहे. बलून बंधारे प्रकल्प चाळीसगाव, पाचोरा, भडगाव व जळगाव या तालुक्यांत असणार आहे.
या तालुक्यांत गिरणा नदीत सात बंधारे तयार होतील. नदीची सुरुवात ते शेवट या सर्वच भागांत बंधाऱ्यांमुळे पाणी राहील. त्यासाठी सुमारे ११०० कोटी रुपये खर्च सुरुवातीला अपेक्षित होता. पण प्रकल्प दुर्लक्षित असल्याने हा खर्च वाढत आहे. दुसरीकडे वाळूउपसा गिरणामध्ये सुरूच आहे.
कारवाईचा देखावा
गिरणा नदी चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव या तालुक्यांसाठी महत्त्वाची आहे. या नदीत जळगाव, धरणगाव, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव भागात वाळूची चोरी केली जाते. रात्रंदिवस वाळूउपसा सुरू असतो. याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे. तसेच गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी, कूपनलिका आटत आहेत.
कारण नदीत वाळू नसल्याने पाणी वाहून जाते. पाण्याचे पुनर्भरण होत नाही. शिवार उजाड होत आहे. कारण कूपनलिका, विहिरी आटत आहेत. केळी, लिंबू, भाजीपाला, रब्बी पिकांची शेती नष्ट होत आहे. याकडे प्रशासन लक्ष देत नाही. थातूरमातूर कारवाया केल्या जातात, असाही आरोप आहे.
स्थानिक संस्थांचे बळ
गावांमध्ये वाळूचे ढीग तयार केले जातात. वाळू उपसा करणारी वाहने सुसाट वेगात असतात. यात अनेक अपघात होतात. रस्त्यांची दुरवस्था होते. या प्रकाराला स्थानिक ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधींचे बळ आहे.
वाळू चोरी प्रशासनाला कशी माहिती नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे. अन्यथा गिरणा काठ उजाड होईल. शिवार कोरडे होईल, तेव्हा जाग येईल का, असा संतप्त सवालही शेतकरी करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.