Kajava
KajavaAgrowon

Kajava : काजवे शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचे?

Nilima Jorwar : काजवा हा निसर्गातील कीटकांच्या अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. टणक पृष्ठभाग असलेल्या कीटकांना बीटल (भुंगे) म्हणले जाते. तर गोगलगाय, अळी किंवा गांडूळ गीळगिळित त्वचेचे असतात, त्यांना स्लग असे म्हणतात.

नीलिमा जोरवर

Fire Fly : काजवा हा निसर्गातील कीटकांच्या अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. टणक पृष्ठभाग असलेल्या कीटकांना बीटल (भुंगे) म्हणले जाते. तर गोगलगाय, अळी किंवा गांडूळ गीळगिळित त्वचेचे असतात, त्यांना स्लग असे म्हणतात. गोगलगाय पिकांसाठी उपद्रवकारक असतात. काजव्यांची भूमिका इथे महत्त्वाची आहे. कारण जमिनीवर आढळणारे गोगलगाय, स्लग्स व इतर छोटे मऊ लुसलुशीत किडे हे त्यांचे खाद्य आहे. त्यामुळे काजवे शेतकऱ्यांसाठी ‘मित्रकीटक’ ठरतात.

वठलेल्या झाडांना
हिरवी झालर,
रातीच्या अंधाराला
मेघांची चादर

झाडांच्या अंगावर
खेळती दिवे
हे तर अवतरले
धरणीवर काजवे

तवा रानातला माणूस
म्हणे, येईल आता
पावसाची सर,
बाळू, विठोबा, सखु
लगबगीने काम आवर !

Kajava
Stevia plant : हर्बल शुगर स्टीव्हियाबद्दल माहिती आहे का?, 'हे' आहेत याचे महत्त्वाचे फायदे

मृग नक्षत्र लागले आणि पाऊसही आला डोंगरांत. तापलेल्या उन्हानंतर हवा हळूहळू बदलू लागते तेव्हाच काजवे चमकू लागतात. पाऊस आता काही दिवसांत येणार याचा हा आणखी एक ठोकताळा. बरोबर पावसाच्या आधी काजवे जमिनीवर अवतरतात. अंडी-अळी-कोष या अवस्थेतून वर्षभर जाणारे हे कीटक बरोबर या हंगामात उत्पन्न होतात. या वेळी पूर्ण वाढ झालेले प्रौढ कीटक काजवे असतात. काजवे त्यांच्या विशिष्ट प्रकाशामुळे आकर्षक दिसतात. हौशे, गवशे, नवशांची काजवे बघण्यासाठी झुंबड उडते. खरे तर प्रौढ काजवे-काजविणी यांचा हा मिलनकाळ असतो. ठरावीक झाडांवर यांचे छान स्वयंवरच भरते. विशिष्ट चाळीत ओळीने बसलेले काजवे विशिष्ट लयीत व तालात आपला प्रकाश निर्माण करतात. हे बघणे खरेच अद्‍भुत असते. मादी काजवे हे दुरून बघत असतात. एकदा का यातील उत्तम व आपल्याला हवा तो प्रकाश असणारा काजवा तिने हेरला की त्यांचे मिलन होते.

निसर्गात पाऊस येण्यापूर्वी अशा अनेक कीटकांची उत्पत्ती होत असते. त्यामध्ये मृगाचे किडे, फुलपाखरे, चमकणारे गांडूळ, गोल गोल वेटोळे करणारे व मोठ्या समूहात असणारे वाणी / पैसा, रातकिडे, हिरवे/लाल /पिवळे/निळे भुंगे व माश्‍या, शेणातले किडे, गुंजाच्या रंगांचे व पाठीवर काळे ठिपके असणारे छोटे भुंगे, मधमाश्‍यी, मातीची घरे बांधणाऱ्या कुंभारणी, गांधीलमाश्‍या अशी भरपूर मोठी यादी आहे. निसर्गात कीटकांचे खूप मोठे साम्राज्य असते. त्यांचे आयुष्य खूप कमी असते, पण आपल्या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका खूप मोठी असते.

पिके जोमदार येण्यासाठी इतर घटकांसोबत कीटकांची भूमिकादेखील महत्त्वाची आहे. निसर्गात अन्नसाखळी असते. उदाहरणार्थ, बेडूक/उंदीर- साप- मोर- वाघ ही साखळी. बेडूक, खेकडे, उंदीर अशी मोठी फौज आपल्या शेतात अवतरते. उंदरासारखे प्राणी आपल्या पिकांची नासधुस करतात, म्हणून त्यांना खाण्यासाठी साप असतात. सापांमुळे उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणत मर्यादित राहते. मोरासारखे घटक सापांची संख्या जास्त वाढू देत नाहीत. कारण ते त्यांचे अन्न असते. मोरांची संख्या जास्त वाढली तर तेही चालणार नाही, म्हणून वाघासारखे प्राणी त्यांची शिकार करतात. याने मोरांची संख्यादेखील मर्यादेत राहते. अशा कितीतरी छोट्या-मोठ्या अन्नसाखळ्या निसर्गात असतात. याचे नैसर्गिक संतुलन बिघडले की मग माणसांना त्याचा उपद्रव होतो. उंदीर, मोर आपल्या शेतात येऊन धिंगाणा घालत असतील तर समजावे की अन्नसाखळीत बिघाड झाला आहे. माणसाच्या कृतीमुळे बिघाड होण्याचे प्रमाण जास्त आहे आणि शेवटी त्याचा तोटाही माणसालाच सहन करावा लागतो.

हीच बाब लागू आहे काजव्यांना. काजवा हा निसर्गातील कीटकांच्या अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. टणक पृष्ठभाग असलेल्या कीटकांना बीटल (भुंगे) म्हटले जाते. तर गोगलगाय, अळी किंवा गांडूळ गिळगिळीत त्वचेचे असतात, त्यांना स्लग असे म्हणतात. गोगलगाय पिकांसाठी उपद्रवकारक असतात. काजव्यांची भूमिका इथे महत्त्वाची आहे. कारण जमिनीवर आढळणारे गोगलगाय, स्लग्स व इतर छोटे मऊ लुसलुशीत किडे हे त्यांचे खाद्य आहे. त्यामुळे काजवे शेतकऱ्यांसाठी ‘मित्रकीटक’ ठरतात. मध्यंतरी शेतकरी गोगलगायींमुळे त्रस्त झाले होते. शेतात गोगलगायींची संख्या अमर्यादित वाढल्यामुळे पिककांचे मोठे नुकसान झाले. या गोगलगायी बादलीत गोळा करून मारून टाकण्याची वेळ अनेकांवर आली. काजव्यासारखे मित्रकीटक कमी झाल्याचा हा परिणाम आहे.

काजव्यासारखे अनेक मित्रकीटक असतात निसर्गात. उदाहरणार्थ, लेडी बीटल नावाचा कीटक. पिकावर पडणारा मावासारखा प्रकार तो नियंत्रित करतो. मधमाश्‍या फुलपाखरे, भुंगे आपल्या शेतातील पिकांचे परागीकरण मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे फलधारणा वाढते. कीटकांचे मित्रकीटक आणि शत्रूकीटक असे दोन प्रकार पडतात. मित्रकीटक आपल्याला अन्ननिर्मितीसाठी, शत्रूकीटकांचे नियंत्रण करण्यासाठी मदत करतात. पण आपण हा भेद समजून न घेता ऊठसूट कीटकनाशके वापरत असतो. कीटकनाशकांची फवारणी केली की ते हवेत सगळीकडे पसरते. शत्रूकीटकांसोबत मित्रकीटकही त्याला बळी पडतात. अनेकदा कीटकनाशकांची विषबाधा होऊन माणसेसुद्धा मरण पावतात. तरीही कोणताही अभ्यास न करता, नैतिकतेचे विचार बाजूला ठेवून कीटकनाशकांचा सर्रास बेसुमार वापर केला जातो. जेथे जेथे या कीटकनाशकांचा वापर वाढला तेथे काजवे संपुष्टात आल्याचे आढळून येईल.

भंडारदरासारख्या परिसरात हे काजवे मोठ्या प्रमाणात दिसतात. अनेक ठिकाणी आदिवासी शेतकरी आजही कीटकनाशकांचा वापर करत नाहीत. त्या सगळ्या ठिकाणी हे काजवे आढळतात. भंडारदऱ्यासारख्या ठिकाणी आढळणारे काजवे पाहायला पर्यटक गर्दी करतात. म्हणून काही लोक याचा विरोध करतात. काजवे पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर बंदी आणा, असा सूर निघतो. परंतु स्थानिकांचा रोजगार या काजव्यांशी संबंधित असतो. त्यामुळे या प्रश्‍नावर मार्ग कसा काढायचा, या जटिल वाटणाऱ्या प्रश्‍नाचे उत्तर खूप सोपे आहे. त्यासाठी पुढील उपाय करावे लागतील ः
- पर्यटकांना शिस्त लावणे.
- रात्रीचे कोणतेही वाहन या परिसरातून जाऊ नये, यासाठी नियम बनवणे.
- काजवे इथेच का आढळतात व ते जपण्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल पर्यटकांचे व स्थानिकांचे प्रबोधन करणे.
- जबाबदार पर्यटनातून शाश्‍वत रोजगार निर्माण करणे.
काजवे बघण्यावर बंदी घालण्यापेक्षा शासकीय यंत्रणेने वरील साधे नियम अंमलात आणावेत. सर्वांनी त्याचे पालन करावे. त्यासाठी सर्व मिळून आग्रह धरूया का? कीटकनाशकांचा अमर्यादित वापर कमी होण्यासाठी खरे तर जास्त प्रयत्नांची आवश्यकता आहे.

भंडारदरा व सह्याद्रीतील स्थानिक लोक आताही काजव्यांचे निवास असलेली विशिष्ट झाडे जपतात; कारण त्यांना माहीत आहे, की काजव्यामुळे आपल्याला रोजगार मिळतो. शिवाय अशी मोठी झाडे जपणे हे त्याच्या शेतीसाठीही आवश्यक असते. भाताचा राब करायला त्यांना याच झाडांच्या फांद्या उपयोगी पडतात. त्यामुळे या झाडांचा त्यांना दुहेरी फायदा होतो. अजूनपर्यंत इथे पारंपरिक शेती केली जात होती. पण आता विकासाची स्वप्ने हेही पाहू लागलेत. टोमॅटे, कांदे, फरसबी, वालवड अशी नगदी, बागायती पिके इथेही काही प्रमाणत घेतली जात आहेत. या पिकांची लागवड केली की खते-रसायनांचा वापर वाढतो. हळूहळू जहाल कीटकनाशकांचा वापर वाढत जातो. हा प्रकार शेवटी काजव्यांच्या जिवावर उठतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com