
Crop Damage Compensation : पीकविमा भरपाईवरून सध्या चर्चा सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अगदी १०० ते २०० रुपयांपासून भरपाई जमा झाल्याची चर्चा आहे. पण विमा योजनेच्या नियमानुसार शेतकऱ्यांना किमान १ हजार रुपये भरपाई देण्याची तरतूद आहे. मग तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम का जमा होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र पीकविमा योजनेत किमान १ हजार रुपये देण्याचा नियम आणि भरपाई नेमकी कशावर अवलंबून असते, हे समजून घेणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात सध्या खरीप हंगाम २०२४ मधील विमा भरपाई जमा होत आहे. राज्यातील २९ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली भरपाई चांगलीच चर्चेत आली. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा झाल्याचे बॅंकेचे मेसेज व्हायरल झाले. त्यात शेतकऱ्यांना १०० ते २०० रुपयांपासून भरपाई मिळाल्याचे दिसते. पीकविम्याची भरपाई निश्चित करण्यासाठी काही नियम आहेत. तसेच शेतकऱ्यांना किमान १ हजार रुपये भरपाई देण्याचाही नियम आहे.
पीक विम्याची भरपाई मुळात विमा संरक्षित रक्कम, विमा संरक्षित क्षेत्र, नुकसानग्रस्त क्षेत्र आणि त्या क्षेत्रात किती टक्के नुकसान झाले यावर अवलंबून असते. मुळात विमा संरक्षित रक्कम कमी असेल तर खात्यात जमा होणारी भरपाईदेखील कमी दिसेल. पण विमा संरक्षित क्षेत्र आणि विमा संरक्षित रक्कम जास्त असूनही शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई कमी येऊ शकते. कारण या वेळी नुकसानग्रस्त क्षेत्र आणि नुकसानीची टक्केवारी महत्त्वाची ठरते.
समजा एखाद्या शेतकऱ्याच्या एक हेक्टरवरील पिकाचे पावसामुळे नुकसान झाल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने दिली. तर विमा कंपनी त्या शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करून किती क्षेत्राचे किती टक्के नुकसान झाले, हे निश्चित करते. अनेकदा विमा भरपाईच्या तक्रारी दिल्यानंतर जेवढ्या क्षेत्राचे नुकसान सांगितले तेवढे नुकसान ग्राह्य धरले जाईल, असे शेतकऱ्यांना वाटते. मात्र प्रत्यक्षात नुकसानग्रस्त क्षेत्र पंचनामा केल्यानंतर निश्चित केले जाते. एकदा नुकसानग्रस्त क्षेत्र ठरल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असतो तो नुकसानीच्या टक्केवारीचा. नुकसानग्रस्त क्षेत्रात किती टक्के नुकसान झाले हा मुद्दा महत्त्वाचा असतो. म्हणजेच नुकसानग्रस्त क्षेत्र किती आहे आणि किती टक्के नुकसान झाले आहे, यावरून मिळणारी भरपाई ठरत असते.
समजा, एका हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. पण नुकसानीची टक्केवारी १० टक्केच असेल, तर मिळणारी भरपाई कमी असेल. पण जर नुकसानग्रस्त क्षेत्र अर्धा हेक्टर आहे. पण नुकसानीची टक्केवारी ३० टक्के असेल तर भरपाई जास्त मिळू शकते. थोडक्यात, विमा भरपाई शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त क्षेत्र आणि टक्केवारीनुसार एकाच मंडळातील शेतकऱ्यांना वेगवेगळी भरपाई मिळू शकते. तसेच मिळणारी भरपाई कोणत्या विमा संरक्षित बाबीतून मिळाली हे देखील महत्त्वाचे असते. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे वैयक्तिक पातळीवरून झाले तर शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई वेगवेगळी असेल. पण अग्रिम भरपाई किंवा वाइडस्प्रेडमध्ये नुकसान गेल्यास भरपाईची रक्कम क्षेत्रानुसार बदलते.
थोडक्यात, काय पीकविम्याची भरपाई कोणत्या विमा संरक्षित बाबीतून भरपाई मिळत आहे, विमा संरक्षित रक्कम किती आहे आणि नुकसानग्रस्त क्षेत्र तसेच नुकसानीची टक्केवारी किती आहे या गोष्टींवरून ठरते. एकाच विमा संरक्षित बाबीमधून क्षेत्र किंवा नुकसानीची टक्केवारी वेगळी असेल तर मिळणारी भरपाईदेखील वेगळी असू शकते. शासनाच्या मदतीप्रमाणे विमा भरपाईची रक्कम हेक्टरसाठी सारखीच असेल असे नाही. एखाद्या शेतकऱ्याचे नुकसानग्रस्त क्षेत्र कमी असेल पण नुकसान जास्त असेल तर त्या शेतकऱ्याला दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याच्या त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकाचे कमी नुकसान असेल तर त्याच्यापेक्षा जास्त भरपाई मिळू शकते.
किमान एक हजार भरपाई ः
पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये विमा भरपाई देण्याची तरतूद आहे. यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम १ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. असे का होत आहे, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. मुळात शेतकऱ्याला पीक नुकसानीपोटी आलेली रक्कम १ हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर वरची १ हजारांपर्यंतची रक्कम सरकार देते. पण शेतकऱ्याला त्याच्या सर्व विमा अर्जातून मिळणारी भरपाई एक हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर सरकार वरची रक्कम देते. समजा एखाद्या शेतकऱ्याला त्याने हंगामात केलेल्या एकूण विमा अर्जातून मिळालेली भरपाई केवळ ५०० रुपये आहे, तर राज्य सरकार त्या शेतकऱ्याला ५०० रुपये देते. असे नुकसानीचा दावा केलेल्या शेतकऱ्याला किमान एक हजार रुपये भरपाई मिळते.
प्रत्येक विमा अर्जाला १ हजार मिळतात का?
पीकविमा योजनेची नुकसान भरपाई सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, या दोन विमा संरक्षित बाबीमधून भरपाई मिळत आहे. काही शेतकऱ्यांना अगदी १०० ते २०० रुपयांपासून विमा भरपाई मिळाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे विमा योजनेत तर किमान एक हजार रुपये भरपाई देण्याची तरतूद आहे. मग १०० ते २०० रुपये कसे जमा होतात, असा प्रश्न सर्वांनाच पडला. पण योजनेत प्रत्येक विमा अर्जातून किमान १ हजार रुपये भरपाई देण्याची तरतूद नाही. तर संबंधित शेतकऱ्याने केलेल्या एकूण विमा अर्जातून आणि त्या शेतकऱ्याला सर्व विमा संरक्षित बाबीतून मिळालेली रक्कम १ हजार रुपयांपेक्षा कमी असेल तरच सरकार फरक देते. प्रत्येक अर्जातून किंवा विमा संरक्षित बाबीतून किमान १ हजार रुपये देण्याची तरतूद नाही.
सध्या शेतकऱ्यांना केवळ दोन विमा संरक्षित बाबींमधून भरपाई मिळत आहे. तसेच वेगवेगळ्या दाव्याची रक्कम वेगवेगळी जमा होते. आणखी दोन विमा संरक्षित बाबींची भरपाई जमा होणे बाकी आहे. जेव्हा शेवटी खरीप हंगाम २०२४ मधील सर्व भरपाई वाटून झाली आणि एखाद्या शेतकऱ्याला सर्व विमा अर्जांसाठी मिळालेली भरपाई कमी असेल तर सरकार वरचे पैसे देईल. समजा एखाद्या शेतकऱ्याने खरीप २०२४ मध्ये चार विमा अर्ज केले. त्या विमा अर्जांतून केवळ ७०० रुपये भरपाई मिळाली. तर सरकार वरचे ३०० रुपये त्या शेतकऱ्याला देणार. आपण समजतो तसे प्रत्येक अर्जासाठी आणि विमा दाव्यासाठी किमान एक हजार रुपये देण्याची तरतूद नाही.
विमा संरक्षित रक्कम किती?
शेतकऱ्याला पीकविम्याची भरपाई मिळताना विमा संरक्षित क्षेत्र आणि विमा संरक्षित रक्कम किती, हेही महत्त्वाचे आहे. शेतकऱ्याचे क्षेत्र एकदमच कमी असेल तर विमा संरक्षित रक्कमही कमी असते. शहरी किंवा निमशहरी भाग, कोकण अशा भागात असे अर्ज जास्त आढळतात. १ रुपयात पीकविमा आणि किमान १ हजार रुपये भरपाई, यामुळे अशा अर्जांची संख्याही लक्षणीय आहे. मुळात विमा संरक्षित रक्कम किती, यावरूनही विमा भरपाई ठरते. विमा संरक्षित रकमेपेक्षा जास्त भरपाई तर मिळणार नाही.
पण राज्यात १ हजार रुपयांपेक्षा कमी संरक्षित रक्कम असलेल्या अर्जांची संख्या मोठी आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये अशा अर्जांची संख्या १ लाख २७ हजार ५८० होती. तर खरीप हंगाम २०२४ मध्ये १ हजार रुपयांपेक्षा कमी संरक्षित रक्कम असलेले अर्ज १ लाख ६ हजार ३३५ होते. म्हणजेच या अर्जासाठी मिळणारी कमाल भरपाई १ हजारांपेक्षा कमीच राहणार, हे निश्चित आहे.
खरीप हंगाम २०२४ मध्ये १०० रुपयांपर्यंत विमा संरक्षित रक्कम असलेले अर्ज ४ हजार ९१९ होते. तर १०१ ते ५०० रुपये एकूण विमा संरक्षित रक्कम असलेले अर्त ३३ हजार ८२३ होते. तसेच ५०१ ते १ हजार रुपयांच्या दरम्यान विमा संरक्षित रक्कम असलेले अर्ज ६७ लाख ५९२ होते. असे खरीप हंगाम २०२४ मध्ये १ लाख ६ हजार ३३५ अर्जांची विमा संरक्षित रक्कम एक हजार रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजेच खरीप हंगाम २०२४ मधील या अर्जांसाठी मिळणारी भरपाई १ हजार रुपयांपेक्षा कमीच असणार आहे. पण सरकार मिळालेली भरपाई आणि १ हजार यातील तफावत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल, असे हे गणित आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.