डॉ. सोमिनाथ घोळवे
Soybean Cultivation : आज सकाळी छोट्या चुलत्यांना म्हणालो, "सोयाबीनचा भाव गेल्या दोन वर्षापासून पडलेला आहे, उत्पादनसाठी केलेली गुंतवणूक खर्च देखील मिळेना अशी स्थिती आहे. त्यावर सोयाबीन वगळून इतर कोणत्या पिकांची लागवड कराल?".
चुलते म्हणाले. मला तर दुसरं कोणतं पीक असं दिसत नाही... जे गुंतवणुकीचा परतावा देईल. कोणतं पीक आहे जे मला परतावा देऊ शकेल?. असा प्रती प्रश्न केला. त्यावर म्हणलो, तुर, बाजरी, ज्वारी, मूग, असे इतर पिकांची नावे घेतली.
चुलते म्हणाले.... ही पिके आता केवळ घरी खाण्यास घेण्यापुरतीच आहेत. यात पैसा नाही की आधार नाही. शिवाय या पिकांपासून काय मिळतंय ते सांग. या पिकांच्या बाजार भावाचा प्रश्न आहे. कवडीमोल भाव मिळतं असेल, तर पिकं का घ्यावीत? असा पुन्हा प्रतिप्रश्न केला.
चुलत्यांच मत मला बऱ्यापैकी मान्य होतं. कारण त्यांच्या म्हणाण्यामागे काहीतरी मतीत अर्थ जसा होता, तसा त्यांच्या वर्षभरातील जगण्याचं अर्थकारण देखील होतं.
चुलत्यांबरोबर बरीच चर्चा झाली.... पण मनात एक प्रश्न घोळत राहिला. तो म्हणजे "पुन्हा, पुन्हा सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांना का करायला लावले जात आहे?. पिके लागवडीचे स्वातंत्र्य धोरणांनी हिरावून घेतले आहे का?." हा चिंतन करायला लावणारा प्रश्न आहे.
गेल्या दोन वर्षापासून सोयाबीन उत्पादक शेतकरी तोट्यात आहे. तरीही शेतकऱ्यांचा ऐवढा विश्वास सोयाबीन या पिकावर का आहे?. शेतकऱ्यांना सोयाबीन हे पीक जिव्हाळ्याचे आणि वर्षी अर्थकारणाला उभारी देणारे आहे असे का वाटते असे अनेक प्रश्न यातून पुढे येतात.
या सोयाबीन उत्पादन घेणं भाग का पडतं आहे याच्या मुळाशी जाऊन शोध घेणे आवश्यक आहे. बाजार व्यवस्था, राजकीय धोरणे ही तर यामागे आहेतच. शिवाय बाजार व्यवस्थेतील अनेक व्यापारी वर्गाच्या लॉबिंगची भूमिका, प्रक्रिया उद्योग, सोयाबीन पासून इतर बनवले जाणारे विविध पदार्थ याचे अर्थकारण देखील याबरोबरच जोडले गेले आहे.
सोयाबीन या पिकांची मूल्य साखळी काय दर्शवते हे देखील पहाणे आवश्यक आहे. कारण शेतकरी वगळून मूल्य साखळी तयार झाली आहे. ही साखळी नफेखोरी आहेच. शिवाय शेतकरी/ उत्पादक वर्गाच्या विरोधात हितसंबंध जोपासणारी आहे. या साखळीला सरकारचे पाठबळ आहे.
कृषी धोरणे तपासले तर स्पष्टपणे दिसून येणारी एक बाब म्हणजे सरकारी धोरणांनी शेतकऱ्यांना पीक लागवडीचे पर्याय हळूहळू कमी करून टाकले आहेत. नगदी पिकांकडे वळवले आहे. त्यामुळे बाजार भाव कमी झाला तरीही पर्याय पिकांचा विचार शेतकऱ्यांच्या मनात येत नाही. जरी पर्याय पिके घ्यायचे ठरवले तरीही घेऊ शकतात नाहीत.
कारण पर्याय पिकांच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रश्न निर्माण होणारे आहेत. एकंदर सोयाबीन या पिकाची लागवड करायला भाग पडण्यामागे व्यापारी आणि सोयाबीन प्रकिया उद्योगाचे अर्थकारण देखील दडलेले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.