Abhijeet Ghorpade : बेडकांचा आवाज का हरवला?

आपल्या आसपासच्या इतर असंख्य जीवांबाबत हेच वास्तव आहे. स्थानिक पातळीवरील जीवांची विविधता आता मोठ्या प्रमाणात घटली आहे. चहुबाजूला पाहिलं तर हेच दिसून येतं.
Frog
FrogAgrowon
Published on
Updated on

Frog Story : गेली काही वर्षं पावसाळ्यात आवर्जून एका गोष्टीकडं लक्ष देतोय. ती म्हणजे, बेडकांचा आवाज ऐकायला मिळतोय का? इतर काही जणांशीही बोललो. सर्वसाधारण सर्वांचंच म्हणणं आहे- बेडकांचा आवाज कमी झालाय.

काही भागातून तर पूर्णपणे हरवलाय! त्याचा काही संबंध पावसाच्या लहरीपणाशी जोडला जाईल, पण बेडकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झालीय हेही एक वास्तवच. एखादा म्हणेल, बेडकांचं काय एवढं घेऊन बसलात.

पण त्यांची संख्या कमी होण्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि होत आहेत, हे कीटकशास्त्राचा अभ्यासक / तज्ज्ञ सविस्तर सांगेल. आपणही त्याची कल्पना करू शकतो. बेडूक हा परिसंस्थेतील एक प्रमुख घटक. आपल्याकडं तो मुख्यत: पावसाळ्यात सक्रिय असतो.

पावसाळा हा असंख्य जीवांचा आधार. स्वाभाविकपणे त्या काळात कितीतरी जीवांच्या प्रजाती सक्रिय होतात. त्यात मोठी संख्या कीटकांची असते. या कीटकांवर काही प्रमाणात पक्षी नियंत्रण ठेवतात. हीच भूमिका बेडूकही पार पाडतो. त्याच्या विविध प्रजाती आणि त्यांची असंख्य पिल्लं या किटकांवरच जगतात.

या स्थितीत बेडकांची संख्या कमी झाली तर..? मग कीटकांचा उच्छाद वाढेल. परिणामी त्या परिसंस्थेचा समतोल ढासळेल. त्याचा विपरित परिणाम शेतीसह संपूर्ण वनस्पतिजीवन आणि प्राणिजीवनावर होतो.

अधिक खोलात जाऊन पाहिलं तर त्याचे गंभीर परिणाम असल्याचे पाहायला मिळेल. बेडकांची संख्या का टिकायला हवी, ही बाब समजून घेण्यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे.

Frog
मंगेशने घेतलाय बेडूक संवर्धनाचा वसा...

बेडकांच्या निमित्तानं हा विषय निघाला खरा, पण हे बेडकांपुरतंच मर्यादित नाही. परिसरातील जैवविविधता किती झपाट्याने संपली / संपत आहे, हे याचे आणखी एक उदाहरण म्हणजे नद्यांमधील माशांच्या प्रजाती. मी स्वत: राज्याच्या बहुतांश नद्यांच्या पात्रात फिरलो आहे.

या दौऱ्यात नद्यांमधील विविध स्थानिक माशांची काय स्थिती आहे, हेही समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात असे आढळून आले की बहुतांश नद्यांमधून त्या त्या भागातील स्थानिक प्रजाती संपुष्टात आल्या आहेत. या नद्यांच्या पात्रांचा, तलावांचा ताबा चिलापीसारख्या बाहेरून आणलेल्या माशाने घेतला आहे.

नद्यांचे प्रदूषण, त्यांचे न वाहणे, वाळूचा प्रचंड प्रमाणात उपसा, त्यांच्यावर झालेली बेसुमार अतिक्रमणे, नद्यांच्या प्रवाहात बांधांचे अडथळे निर्माण होणे अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. त्यांनी नद्यांमधील जीवांची विविधता पार संपवून टाकली आहे.

आपल्या आसपासच्या इतर असंख्य जीवांबाबत हेच वास्तव आहे. स्थानिक पातळीवरील जीवांची विविधता आता मोठ्या प्रमाणात घटली आहे. चहुबाजूला पाहिलं तर हेच दिसून येतं.

मग ते पावसाळ्यात उगवणारं गवत असो, लहान-मोठ्या वनस्पती असोत, रानभाज्या, बेडकासारखे जीव, मधमाशा, मुंगळे-मुंग्यांसारखे इवसेले जीव, नदी-ओढ्यातले मासे, नाहीतर विविध प्रकारचे पक्षी... सर्वच जीवांच्या प्रजातींची संख्या कमी झाली आहे.

ही बाब अगदी सहजपणे डोळ्याला दिसते, अनुभवताही येते. विशेषत: गेल्या काही दशकांमध्ये यात मोठा बदल झाला आहे. काही नजरेला पडणाऱ्या प्रजाती, तर काही आडबाजूला असलेल्या प्रजाती... सर्वानाच हा धक्का सहन करावा लागला आहे.

मी पाणी, पर्यावरणाच्या प्रश्नांना वाहिलेले "भवताल" हे मॅगझीन चालवतो. त्यात या पावसाळ्याच्या निमित्ताने स्थानिक जैवविविधतेच्या मुद्द्याची सविस्तर चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात आढळणाऱ्या किंवा पावसाळ्याशी संबंध असलेल्या प्रातिनिधिक नऊ जीवांच्या सद्यस्थितीची मांडणी त्या त्या विषयातील तज्ज्ञांनी केली.

या सर्वांचेच निरीक्षण व मत असे होते की स्थानिक जीवांच्या प्रजातींना आता मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. बेडकासारखा संवेदनशील जीव असेल किंवा जळू, भूछत्रासारखे (आळिंबी) आडबाजूचे जीव, सर्वांचीच अवस्था केविलवाणी बनली आहे. त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत.

हे सर्व जीव नदी, तळे, वन, गवताळ माळराने, दलदलीचा प्रदेश अशा कोणत्या ना कोणत्या परिसंस्थांचे घटक आहेत. कोणत्याही परिसंस्थाची समृद्धी ही त्यातील जीवांच्या विविधतेवर अवलंबून असते. तीच कमी झाल्याने आता या परिसंस्थांचा समतोल ढळणार की त्या पूर्णपणे कोलमडून पडणार? एवढेच पाहणे बाकी आहे.

इथे एक तुलना आवर्जून करावी लागेल. अलीकडे सर्वत्रच वन्य प्राण्यांबाबत जागरूकता वाढत आहे. वाघ, सिंह, हत्ती, गेंडा, माळढोक, मोर, समुद्री कासवं अशा प्राण्यांबाबत भरभरून बोलले जाते. त्यांची काळजी घेण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जातात. या वेळच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्तही त्याची दखल घेण्यात आली होती.

या पर्यावरण दिनाची थीम होती- गो वाईल्ड फॉर लाईफ! जगभरात वन्य जीवांची शिकार आणि त्यांच्या अवयवांच्या तस्करीप्रती अजिबात सहिष्णूता दाखवायची नाही, असा या दिनाचा संदेश होता. हत्ती, गेंडे, वाघ, अनेक सरपटणारे प्राणी, पक्षी यांसारख्या वन्यजीवांची किंवा त्यांच्या अवयवांची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

संपूर्ण जगाच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय आहे. या तस्करीमध्ये अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होते. केनियामध्ये तस्करांकडून पकडण्यात आलेले हत्तींचे सुळे आणि गेड्यांची शिंगे असे तब्बल १०५ टन वजनाचे अवयव मे महिन्यात जाळण्यात आले.

त्यातून या वन्यप्राण्यांची शिकार आणि त्यांच्या अवयवांची तस्करी यांचे प्रमाण किती प्रचंड आहे, याची कल्पना येते. पण त्याचबरोबर या जप्त केलेल्या अवयवाची होळी करून त्याच्या विरोधात संदेशही दिला गेला.

Frog
Crop Loss : पावसामुळे शेतकरी संकटात, बहुतांश पिकांचं नुकसान

या मोठ्या व काही प्रमाणात 'ग्लॅमर' लाभलेल्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत आहेत, पण आपल्या परिसरातून हरवत चाललेल्या स्थानिक जीवांची दखल आपण घेणार का? जवळच्या झाडावर पोळं करणारी मधमाशी, अंगणात तुरूतुरू धावणारे मुंगळे, झाडांवर वसाहती करून राहणारे पोपट, आजूबाजूला उगवणारं गवत, रानफुलं, त्यांच्यावर येणारे कीटक-फुलपाखरं... हे सारे वन्यजीवच.

पण अतिपरिचयामुळे आपणाला त्यांची आणि ते निसर्गात निभावत असलेल्या भूमिकेची किंमत नाही. त्याचाच परिणाम म्हणून की काय, वाघ, माळढोक यांच्या घटलेल्या-वाढलेल्या संख्येबद्दल भरभरून बोलले जाते, पण पावसाळा असूनही बेडकांचं गाणं का ऐकू येत नाही, पूर्वी पावलोपावली दिसणारे काजवे आता कुठं गुडूप झाले, या प्रश्नांचे सोयरसुतकही नसते.

जंगलातील वाघ महत्त्वाचाच, पण त्याचा आपल्याशी थेट संबंध येतोच असं नाही. परिसरातील जीवांचा मात्र आपल्याशी थेट संबंध येतो. त्यांचं अस्तित्व असणं-नसणं हे आपल्यावर थेट परिणाम करतं. तरीही त्यांच्याप्रति आपण इतके गहाळ कसे, हा प्रश्न राहून राहून मनात येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com