Farmer Suicide : चिंतन शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचे

Agricultural Crop Loss/Debt : कृषी निविष्ठांचा अनियंत्रित वापर हे फक्त शेतकऱ्यांच्या अडचणींना त्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत नसून अगदी मानव, प्राणी, पर्यावरण यालाही ते तितकेच धोकादायक आहे. यावर नक्कीच उपाययोजना करावी लागेल; परंतु याशिवाय शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना इतर अनेक कारणे आहेत.
Farmers are worried
Farmers are worriedAgrowon
Published on
Updated on

Agricultural Issues : ‘अ नावश्यक कृषी निविष्ठांचा शेतकऱ्यावर भडीमार’, या शीर्षकाखाली दिनांक २ नोव्हेंबरला दै. ‘ॲग्रोवन’मध्ये बातमी वाचण्यात आली. बातमीचा आशय असा होता, की कृषी सेवा केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांची अनावश्यक विक्री केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो, अपेक्षित उत्पन्न मिळत नाही आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊन तो कर्जबाजारी होतो.

कर्जबाजारी काही शेतकऱ्यांना आत्महत्याही करावी लागली आहे. या बातमीलाच दुजोरा देणारी दुसरी बातमी १० नोव्हेंबरला ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झाली. महाराष्ट्रात मागील नऊ महिन्यांत १९३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी या बातमीमध्ये आहे.

यामध्ये प्रामुख्याने अमरावती विभाग ७९४ आणि छत्रपती संभाजी नगर विभाग ६८८ अशा या दोन विभागांतच १४८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजे एकूण आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ७५ टक्के आत्महत्या या दोन जिल्ह्यांमध्ये झाल्या आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कापूस आणि सोयाबीन ही दोन मुख्य पिके घेतली जातात. या आत्महत्या करणाऱ्यांमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकांची संख्या अधिक आहे.

Farmers are worried
Farmers Self Murder : धक्कादायक! साडेपाच वर्षांत सुमारे १५ हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अस्मानी सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही; परंतु याला कृषी सेवा केंद्र चालक किंवा कृषी निविष्ठांचा अधिक वापर हेच जबाबदार आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. अनेक कारणांपैकी ते एक महत्त्वाचे कारण नक्कीच आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या नुकसानीला इतर अनेक कारणे आहेत. ही कारणे नेमकी कोणती ते जाणून घेऊयात.

स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये केलेल्या जनगणनेमध्ये भारताची लोकसंख्या ही आजच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त २५ टक्के म्हणजे ३६ कोटी एवढीच होती. असे असले तरी देशातील त्या वेळेसच्या अन्नधान्याच्या उत्पादनावर त्यांचे पोषण करणे शक्य होत नव्हते. पारंपरिक शेती पद्धतीमुळे शेतीतील उत्पादनाचे दर हेक्टरी प्रमाण खूपच कमी होते. त्यामुळे भारताला परदेशातून अन्नधान्य आयात करावे लागत होते.

देशातील जनतेचे अन्नधान्यावरील परावलंबित्व दूर करण्यासाठी शेती उत्पादन वाढवणे आवश्यक होते. यासाठी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साह्याने दूरगामी बदल करणे आवश्यक होते. या माध्यमातून गहू आणि भात पिकांचे आधुनिक संकरित बियाणे निर्माण करण्यात आले. त्याला रासायनिक खते आणि कीडनाशके (कीटकनाशके आणि बुरशीनाशके) उपलब्ध करून देण्यात आली.

Farmers are worried
Farmer Death : सहा महिन्यांत १२६७ शेतकरी आत्महत्या

या सर्व संसाधनामुळे पिकांचे उत्पादन वाढले. भारतीय कृषिक्षेत्रात हरितक्रांती घडून आली. ही सर्व संसाधने म्हणजे या कृषी निविष्ठा कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. खासगी कृषी सेवा केंद्रांनी त्या वेळेस खूप मोठी भूमिका बजावली. कृषी निविष्ठा व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे खूप मोठे काम अगदी विनामोबदला आणि कमी कालावधीत, या कृषी सेवा केंद्रांनी केले.

सुरुवातीला बीएससी ॲग्री शिक्षण घेणाऱ्या तरुणांनी हा व्यवसाय सुरू करावा, म्हणून त्यांना शासनातर्फे प्रोत्साहन आणि काही प्रमाणात अर्थसाह्य देण्यात आले; परंतु अनेक कृषी पदवीधरांना हा व्यवसाय करणे शक्य झाले नाही. दरम्यानच्या काळात इतर क्षेत्रातील अनेक व्यापारी या व्यवसायात उतरले. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या निविष्ठा जवळच्या शहरात उपलब्ध होऊ लागल्या.

सुरुवातीला पिकावरील रोगाचे प्रकार आणि प्रमाण मर्यादित असल्यामुळे तसेच पिकांवर येणाऱ्या किडीची प्रतिकारशक्ती मर्यादित असल्यामुळे या कीडनाशकांचे चांगले परिणाम दिसून येत होते; कालांतराने या कीडनाशकांची किडीमध्ये प्रतिकारशक्ती वाढत गेली. खरं तर ही आपली सृष्टी जिवंत ठेवण्यासाठी निसर्गाने निर्माण केलेली प्रक्रिया आहे. त्यामुळे पहिल्यापेक्षा अधिक विषारी कीडनाशके बनवणे क्रमप्राप्त ठरले. संशोधकांनी वेगवेगळी तीव्र कीडनाशकाची निर्मिती करण्यास सुरुवात केली.

सध्या बाजारात हजारोंच्या संख्येने अशी कीडनाशके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांचा पुरवठा करणाऱ्या कृषी सेवा केंद्राची संख्या महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या घरात आहे. अगदी गावपातळीवरही असे कृषी सेवा केंद्र उभारले गेले आहेत. मागील काही दशकांमध्ये या व्यवसायात अनेक व्यापारी आले. या सर्वांना त्याचे परवाने सहजरीतीने मिळत गेले.

अशा प्रकारचे परवाने देण्यासाठी त्या वेळेस शासनाने शिक्षणाची अट घातली नव्हती; मात्र मागील दहा वर्षांपूर्वी शासनाने नवीन नियम करून असे परवाने फक्त बीएस्सी ॲग्री पदवीधरांना देण्याचा निर्णय घेतला. खत विक्रीसाठी ॲग्री डिप्लोमा शिक्षण घेणाऱ्याला परवाना देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. बियाणे विक्री परवान्यासाठी विशिष्ट शिक्षणाची अट नाही तसेच पूर्वीच्या सर्व परवानाधारकांना कृषी, सेवा, विस्तार पदविकेचे शिक्षण घेण्याचे बंधन, शासनाकडून घालण्यात आले आहे.

मागील आठ-दहा वर्षांमध्ये त्या माध्यमातून शासनाकडून हजारो व्यापाऱ्यांना शिक्षण देण्यात आले आहे. या मागील शासनाचा उद्देश विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून आवश्यक त्याच निविष्ठा पुरविल्या जाव्यात असा आहे. असे असले तरी काही व्यापारी स्वार्थापोटी शेतकऱ्यांना अनावश्यक कृषी निविष्ठाची विक्री करतात. हे कारण शेतकऱ्यांची शेती नुकसानीत जाण्याचे आहेच, त्याचबरोबर इतर अनेक कारणे शेतकऱ्यांच्या नुकसानीस कारणीभूत आहेत.

अ) पाऊस : अनियमित पाऊस, दुष्काळ, गारपीट, अति पाऊस किंवा कमी पाऊस या नैसर्गिक कारणांमुळे शेतीमधील उत्पादन अशाश्‍वत आहे.

ब) जमीन : महाराष्ट्रातील अनेक भागांतील जमिनीची गुणवत्ता ही निकृष्ट दर्जाची आहे. त्यामध्ये सेंद्रिय कार्बनचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे जमिनीच्या सुपीकतेचे प्रमाण खूप कमी आहे. अशा जमिनीमध्ये उत्पादनाचे प्रमाण खूप कमी असते.

क) पाणी : एकूण जमिनीच्या फक्त १८ टक्के भागावर बागायती शेती केली जाते. म्हणजे शिल्लक ७२ टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. अशी शेती ही पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. योग्य वेळेत योग्य प्रमाणात पिकाला पाणी न मिळाल्यास उत्पादनात खूप मोठी घट होते किंवा अति प्रमाणात पाऊस झाला तरी पिकाचे खूप मोठे नुकसान होऊन उत्पादनात घट होते. कोरडवाहू जमिनीमध्ये फक्त खरिपाचे पीकच घेतले जाते. त्या क्षेत्रावर रब्बी मोसमातील पिके खूप कमी क्षेत्रावर घेतली जातात. वर्षातून एकच पीक घेतल्यास उत्पन्न कमी होते.

ड) कमी जमीन धारणा : महाराष्ट्रातील ७८ टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. त्यांच्याकडील जमीन धारणेचे प्रमाण हे एक ते दोन हेक्टर एवढेच आहे. तसेच एक हेक्टरपेक्षा कमी जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाणही खूप मोठे आहे. अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीचे छोटे-छोटे तुकडे असतात. या छोट्या जमिनीच्या तुकड्यांमध्ये शेती पिकविण्याचा खर्च खूप अधिक होतो. तुलनेत उत्पन्न कमी मिळते.

(लेखक निविष्ठा उद्योगाचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com