Orchard plantation : फळबाग लागवडीचे नियोजन करताना...

Fruit Crop Management : पावसाळ्याच्या सुरुवातीस जून किंवा जुलै महिन्यांच्या पहिल्या पंधरवड्यात फळझाडांची लागवड करावी. अतिपावसात किंवा पावसाच्या शेवटी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फळझाड लागवड करू नये.
Orchard Plantation
Orchard PlantationAgrowon

डॉ. आदिनाथ ताकटे

Fruit Crop : पावसाळ्याच्या सुरुवातीस जून किंवा जुलै महिन्यांच्या पहिल्या पंधरवड्यात फळझाडांची लागवड करावी. अतिपावसात किंवा पावसाच्या शेवटी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फळझाड लागवड करू नये. पावसाळ्याच्या सुरुवातीस लागवड केलेल्या फळझाडांची चांगली समाधानकारक वाढ होते. ही फळझाडे काही कालावधीकरिता पाण्याचा ताणही सहन करू शकतात. जून-जुलैपर्यंत वेळेवर झाडांची लागवड झाल्यास वाढ जोमाने होण्यास मदत होते.

कलमांची निवड ः
- फळझाडांची कलमे, रोपांच्या निवडीवर फळांची गुणवत्ता आणि फळबागेचे एकूण यश अवलंबून असते. म्हणून फळबागेकरिता उत्कृष्ट आणि गुणवत्ता माहिती असलेली दर्जेदार आणि खात्रीशीर कलमे रोपे आणावी. कृषी विद्यापीठ किंवा शासकीय रोपवाटिकेमधून रोपे, कलमे आणावीत. शक्य नसल्यास आपल्या माहितीतील शासकीय परवानाधारक रोपवाटिकेतून कलमे /रोपे घ्यावीत.
- कलमांची निवड करताना ती किती उंच आहेत, यापेक्षा ती योग्य त्या जातीच्या मातृवृक्षापासून केलेली आहेत का? या बाबींकडे अधिक लक्ष द्यावे. रोपे घेताना कलम बांधलेली आहेत, जोड पूर्णपणे जुळलेले आहेत याची खात्री करावी. वाढीला जोमदार आणि निरोगी असावीत.

लागवड ः
प्रथम लागवड करण्यापूर्वी कलमाच्या पिशवीच्या दोन्ही बाजूंवर उभा काप द्यावा. मुळांभोवती असलेला मातीचा गोळा न फुटता पॉलिथिन बॅग काढावी. मोकळा झालेला गोळा दोन्ही हातांत धरून खड्ड्याच्या मधोमध ठेवून हलका दाबावा. मोकळ्या हाताने माती भरून गोळ्याभोवती माती टाकावी. अगोदर हाताने व नंतर पायांनी दाबावी, हे करताना मातीच्या गोळ्यावर पाय पडणार नाही याची काळजी घ्यावी. आवश्यकता वाटल्यास हलकेसे पाणी द्यावे. आधारासाठी पश्‍चिम बाजूस ६ इंच अंतरावर ४ ते ५ फूट बांबूची काठी रोवून त्याला कलम बांधावे.

फळबागेचे संरक्षण ः
- नवीन लागवड केलेल्या फळझाडांची मोकाट जनावरांपासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे असते. फळझाडांची झालेली वाढ जनावरे खातात. तसेच लहान रोपे व कलमे तुडवतात. त्यासाठी फळबाग लागवडीसाठी निवडलेल्या जागेभोवती चिलार, शिकेकाई, करवंद यासारख्या काटेरी झुडपांचे कुंपण करावे.
- बागेचे उष्ण वारे, थंडी व वादळापासून संरक्षण करण्यासाठी निलगिरी, शेवरीसारख्या उंच वाढणाऱ्या झाडांची बागेच्या पश्‍चिम व दक्षिण बाजूने २ ते ३ फुटांवर लागवड करावी.
- काही वेळा वाऱ्याच्या अडथळ्यासाठी लावलेली झाडे बागेतील मुख्य फळझाडांबरोबर पाणी आणि अन्नद्रव्ये घेण्यासाठी स्पर्धा करतात. हे टाळण्यासाठी अडथळ्यांच्या झाडांपासून १० फूट अंतरावर ३ फूट खोल आणि २ फूट रुंद खणून त्यामध्ये कुंपणाला लावलेल्या झाडाची आलेली मुळे छाटून टाकावीत.अशा प्रकारे मुळ्या छाटण्याचे काम प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी करावे.

Orchard Plantation
Orchard Plantation : नवीन फळबाग लागवडीचे नियोजन

सघन लागवड ः
- या पद्धतीमध्ये झाडांची छाटणी, विरळणी करणे सोपे जाते. पारंपरिक लागवडीपेक्षा जादा उत्पादन मिळते.
- सघन लागवड पद्धतीमध्ये फलोत्पादन लवकर मिळते. झाडांचा आकार लहान असल्याने कीड-रोग नियंत्रण व्यवस्थापन, फळांची काढणी सोपी व सहज शक्य होते. कमी क्षेत्रातून जादा उत्पादन, फळांचा दर्जा, प्रत व गुणवत्ता, निर्यात क्षमता वाढविता येते.

कलम लावतेवेळी होणाऱ्या चुका ः
- कलमांचा जोड मातीत दाबला जाणे.
- योग्य जातीची कलमे खरेदी न करणे. योग्य अंतरावर खड्डे न घेणे. बहुतांश ठिकाणी खड्डे भरताना फक्त मातीचा वापर करणे. रोपे किंवा कलमे वाहतुकीच्या दरम्यान काळजी न घेणे.
- मान्यताप्राप्त नसलेल्या खासगी रोपवाटिकेतून किंवा शेतकऱ्यांकडून कलमांची खरेदी करणे.

महत्त्वाच्या बाबी ः
- फळबाग यशस्वी करण्यासाठी जमिनीची निवड, हवामानानुसार फळझाडांची लागवड, पाण्याची उपलब्धता, फळबागेची आखणी, योग्य कलमांची निवड, लागवडीची योग्य वेळ आणि लागवड केलेल्या रोपांची काळजी या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या बाबी लक्षात घेऊन योग्य नियोजन केल्यास फळबाग लागवड नक्कीच फायद्याची ठरेल.
- वाहतुकीच्या दृष्टीने फळबाग लागवडीचे स्थानदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. फळबाग क्षेत्र हे वाहतुकीच्या रस्त्यापासून दूर असेल तर बागेस वेळोवेळी लागणारे साहित्य त्याजागी पोहोचविण्यास अडचणी येतात. दुर्गम भागातील लागवडीच्या ठिकाणी वाहनांची जाण्याची सोय नसेल तर अशावेळी मजुरांची मदत घ्यावी लागते. याशिवाय फळांची काढणी केल्यानंतर माल वाहतुकीवर होणाऱ्या खर्चात वाढ होते. त्यासाठी सुरुवातीलाच वाहतुकीच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(मृदा शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com