कल्पना दुधाळ
Rural Story : वळणावर एक वाकडी बाभळ आहे. तिची साल रखरखीत, खरबरीत काळी आहे. पांढऱ्या काट्यांच्या रेखीव ओळींमधे नाजूक, हिरवट पोपटी पालवी बहरलेली आहे. खोडावर मधून मधून कुणीतरी कु-हाडीनं घाव घातलेले आहेत.
चिंधाडलेली साल लालसर होऊन तिथं बारीकसे चकचकीत डिंकाचे गोळे आलेले आहेत. जमिनीपासून काहीशी वर आल्यावर तिची एक फांदी आडवी गेलीय. मग तिथून फुटलेली दुसरी फांदी सरळ वर जाऊन अनेक फांद्यांची छत्री झाली आहे.
ही बाभळ लहान असताना कुणीतरी तिचा शेंड खुडला असावा किंवा वा-याकाव्हारानं मोडला असावा किंवा एखाद्या बाजिंद्या शेळीनं पळत पुढं जाऊन शेलका शेंडा उडवला असावा किंवा अजून काही वेगळं कारण असेल तर ते बाभळीलाच माहीत. मी माझे अंदाज सांगितले. खरंतर या वळणावर ती इतकी वाढेपर्यंत तगली हेच फार झाले.
आता तर तिला भीतीच नाही. कारण हा रस्ता सरकारी झालाय. तिच्या बुडख्यावरचे हे तपकिरी पांढरे पट्टे म्हणजे तिचं संरक्षण कवच म्हणू आपण. तर ती सरकारी हद्दीत वाढतेय म्हणजे तिला सहजासहजी कुणी तोडणार नाही. रस्त्याचे कामबीम निघाले तर मात्र तिची उचलबांगडी व्हायला वेळ लागणार नाही.
पण रस्त्याचा कंत्राटदार जरा ब-या विचारांचा असेल तर तिच्या वरच्या फांद्या साळून मुळ्यांसहित अज्जाद जेसीबीनं उचलून पाहिजे तिथं तिचं पुनर्रोपन करेल. वर त्या भुंड्या बाभळीच्या पाण्याची सोयही करेल.
त्यातही समजा त्याला वाटलं की, आंबाबींबा असता तर एवढा कुटाना करायला हरकत नव्हती. ही पडली काटवानाची खाण. कशाला वाढवा ? मग मात्र बाभळीचं सरपण निब्बार जळतं म्हणून सगळ्यात आधी चुलीत गेलंच म्हणून समजायचं.
या बाभळीच्या शेजारी वावभर अंतरावर बोरीचं झुडूप आहे. बाभळीच्या खूप नंतर उगवलेलं असावं ते. गुडघ्याइतकं सरळ वाढल्यावर बोर एका अंगाला कललेलीय. त्यामुळे तशीच वाकलेली. बारीक बारीक गोलसर चपटी चकचकीत पानं.
ही पानं खालच्या बाजूनं पांढरट आहेत. उलटे सरसरीत टोकदार काटे. आता बोरांचा हंगाम संपून गेलाय. बोर बहरात असताना कुणीतरी काठीनं झोडपली असणार. म्हणून पिकलेल्या बोरांबरोबर कच्ची बोरंपण खाली पडून वाळून गेलेली आहेत.
काही लालसर आटोळ्या बोरीखाली पडलेल्या आहेत. काही आटोळ्यांना अर्धीमुर्धी साल वाळून चिकटलेली आहे. बोरीवर एक छोटं घरटं आहे. पण घरट्यात पाखरू दिसत नाही. पाखरू घरटं सोडून गेलं असावं. जवळपास कुठं पाणी असण्याची थोडीपण शक्यता नाही.
ही जवळपासची झाडंझुडपं कशावर तगलीत मग ? या बाभळीची मूळं बोरीच्या मुळांना म्हणत असतील का, ही जराशी ओल आहे तिथं, ती तू शोषून घे. माझी मूळं खोल आहेत मी तिथं पाणी शोधते. असा शेजारधर्म झाडं पाळत असतील काय ? जमिनीखाली काही का असेना.
ते काही आपल्याला कळणार नाही. पण भोवताली पडलेल्या पांढुरक्या शेंगा, धामुकं आहेत ना ते काही बाभळीचा वंश मरू देणार नाहीत. थोडंजरी थेंबटं पडलं ना तरी ते तरारून हिरवा हिसका दाखवणारंच.
दाटीवाटीनं उगवतील, कड उन्हानं सुकतील पण जरा शिरवाळ पडलं की काट्यांचा फणा उगारतील. पुन्हा असंही आहे की बाभळीची भीस्त जशी स्वतःच्या औषधी गुणधर्मांवर आहे तशी या धामुक्यांवर आहेच आहे.
या बाभळीवरून आठवलं मी लहान असताना आमच्या दारात एक मोठं बाभळीचं झाड होतं. त्या बाभळीखाली ओळीनं खुंट्या ठोकून आमची जनावरं बांधलेली असायची. आम्ही खेळायला, जेवायला, अभ्यास करायला बाभळीखालीच असायचो.
फाटलेलं पुस्तक चिकटवायला बाभळीचा ताजा डींक असायचा. त्यावेळी फेविकॉल वगैरे विकत आणायची भानगडच नव्हती. घरी आलेला पाहुणारावळा अगोदर बाभळीखाली बसणार मग घरात येणार. त्या बाभळीवर कायम होले असायचे.
दुपारच्या उन्हात आम्ही बाभळीच्या सावलीला बसायचो. बाभळीवर बसून बरेच होले काहीतरी घोकत असायचे. आम्ही दगडं हाणून होल्यांना उठवून लावायचो तेव्हा आजी म्हणायची, त्या बिचा-यांना नका रे हाकलू. ते त्यांच्या बायकांना बोलवतेत.
त्यावरून आजीने होला काय म्हणतोय त्याची एक गोष्ट सांगितली होती- कधीकाळी एका होल्याला दोन बायका होत्या. एक आवडती, दुसरी नावडती. एके दिवशी होल्याला गव्हाची खीर खूप खावीशी वाटते. तो दोन्ही बायकांना सांगतो, लवकर खीर खायचीय मला.
मग आवडती बायको काय करते, तर आहे तशाच गव्हाची पटदिशी खीर करून त्याला खायला देते. त्याची खीर खाऊन झाली तरी नावडतीची खीर शिजलेली नसते. नावडतीने अगोदर गहू निवडले, मग पाण्याचा हात लावून उखळात सडले, पाखडले.
मग शिजायला घातले. आवडती बायको होल्याला भडकून देते, बघा तिचे अजून झाले नाही, किती गहाळ आहे. असली कसली खीर करतेय ती, कधी खायला द्यायची तुम्हाला. ते ऐकून होल्याला राग येतो.
तो रागाच्या भरात जातो आणि नावडतीच्या डोक्यात दगड घालतो. परत येता येता होल्याला खिरीचा खमंग वास येतो म्हणून तो तिची थोडी खीर चाखून बघतो. तर खीर फारच चविष्ट असते. तो नावडतीकडं वळून बघतो तर इकडे ती मरून पडलेली असते.
मग होल्याला खूप पश्चाताप होतो. तो आवडतीला सोडून एकटाच बाभळीच्या झाडावर जाऊन बसतो आणि नावडतीला बोलवत म्हणतो, ये गं खुई, तुझं खाऊ, माझं ठेऊ, ये गं खुई. तेव्हापासून नंतरचे सगळे होले असंच घोकतात.
होल्याची ही गोष्ट खरी असण्याची काही शक्यता नाही. मात्र त्याच्या बरोबर आपण ‘ये गं खुई, तुझं खाऊ माझं ठेऊ, ये गं खुई.’ असं म्हणायला लागलो तर तो अगदी हेच म्हणतोय असं वाटतं.
लहानपणी पायात बाभळीचे काटे नेहमीच मोडायचे. मग घरातली माणसं आम्हाला म्हणायची, खाली बघून चालायला येत नाही का ? वर थोबाड करून चालल्यावर काटं मोडणारच. मग आपण सूई कुठं आहे ते हुडकायची, सापडली नाही तर सरळ बाभळीची एखादी फांदी वाकवून चांगला दणकट काटा काढून आणायचा.
त्या काट्यानं पायातला काटा काढायचा. पुन्हा काटं मोडू नये म्हणून बाभळीला वाकडं दाखवायचं. पाय टेकवला की सलत असल्यामुळे लंगडत लंगडत चालावं लागायचं. मग रात्री आई भाकरी करत असताना चुलीपुढं बसून काटा काढलेल्या जागी नखभर गूळ किंवा मेणाचं बोट लावून चरका द्यायचा.
गूळ किंवा मेण तापलं की ते आतपर्यंत भाजत रहायचं. त्या जागेची कळ मरायची. चरका द्यायला रोज कुणी ना कुणी चुलीपुढं असायचं. तेव्हा आम्हाला चपला, बूट नसायचे. या बाजारातून आणलेल्या चपला पुढच्या बाजारच्या दिवसापर्यंत तुटलेल्या असायच्या.
लांबच्या शाळेत चालत येताजाता दगडाधोंड्यातून त्या आठ दिवसपण धड टिकत नसायच्या. चप्पल तुटली की मोठी माणसं म्हणणार, पाय उचलून चालता येत नाही. टाचा खरडत खरडत वर थोबाड करून चालल्यावर कशा टिकायच्या चपला आं ? आता चपला बिपला मिळणार नाहीत.
मग आपलं अनवाणी चालायचं. त्यांचंपण बरोबरच होतं. घरात सात-आठ पोरंपोरी. कुणाला म्हणून भारी चपला घ्यायच्या ? पावसाळ्यात भिजलेल्या पायात खोल टोचलेले काटे प्रचंड दुखायचे. काही काटे कुरपं करून पायात रहायचे.
एकदा जोराचं वादळवारं सुटलं होतं. तेव्हा आमच्या दारातली बाभळ मुळांसहित उपटून पडली. ती पडली पण अशी की, जनावरांच्या अंगावर एकही फांदी पडली नाही की घरावर कलली नाही. मग दुसऱ्या दिवशी बैलं लावून पुन्हा बाभळ पहिल्यासारखी उभी केली.
नंतर आमचे ते घर पडले. जागा बदलून दुसरे घर बांधल्यावर बाभळ घरामागे गेली. तिथंही बरीच वर्षे होती. आता इतक्या वर्षानंतर एखाद्या माणसाची आठवण यावी तशी ती दारातली बाभळ आठवतेय.
काही वर्षांनी शाळेत जायला सायकल मिळाली. वाटेत ब-याच बाभळी. त्यात एका मोठ्या बाभळीखालून वाट होती. तिथून सायकल जपून चालवावी लागायची. आमच्या बरोबरची एक मुलगी फारच खोडील होती.
तिच्याशी कुणी भांडलं किंवा तिची काही खोडी केली तरी वरवर ती गोड बोलायची. ‘ये मी बाभळीपाशी थांबते’ म्हणायची. आपली सायकल पुढे आणून लावायची. बरेच काटे गोळा करून संपूर्ण वाटेवर काटे खोचून ठेवायची.
मग तिथून सायकल आली की साहजिकच काही वेळानं चाकातली हवा गेलेली असायची. मग ती म्हणायची, बघ मी थांबले होते तुझ्यासाठी. पण आता तुझी सायकल पंक्चर झाली. आता मी जाते पुढं. तू ये मागून.
तिची ही खोड एकदा तिनं हळूच वर्गातल्या एका मुलीला सांगितली. तिनं आम्हाला सांगितल्यावर आम्ही तिच्याशी खूप भांडलो. तिचे नाव काटाडी पाडले. बाभळ आपणहून कधी कुणाला काटे टोचवत नाही पण अशा काही माणसांमुळे ती बदनाम होते.
एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी बाभळीची साल चांगली वाळवली. उखळात कुटून, चाळून दात घासायला डबीत भरून ठेवली. त्याने दात घासताना हिरड्या आवळून यायच्या. कुटताना नावं ठेवणा-या सगळ्यांनी दात घासायला वापरली होती.
बाभळीची फूलं फुलण्याआधी जी बारीक नक्षीदार कळी असते ती नाकातली मोरनी, कानात पिवळी फूलं, पायात शेंगांची पैंजणं, गळ्यात फुलांची बोरमाळ अशी दागिण्यांची हौस लहानपणी बाभळीने पुरवली.
बाभळीच्या काट्यात सुबाभळीच्या वाळलेल्या शेंगाचं टरफल खोचून टोकाशी शेळीची लेंडी खोचली की वा-यावर भिंगणा-या कितीतरी भिंग-यांनी बालपण खेळतं केलं.
मागच्या दोन पायावर उभं राहून शेळ्या बाभळीचा पाला खाताना आपणच टाचा उंच करून फळीवरचा गुळाचा डबा किंवा शेंगदाण्याचं कूट खायला कुटाचा डबा काढतोय असं वाटायचं.
आज ही वळणावरची वाकडी बाभळ दिसली आणि किती बाभळी गोळा झाल्या. आता ही आपली देशी बाभळ मागं पडली. थोडाफार फायदा होईल अशीच झाडं बांधावर जोपासली जातात. शोभेची, सुंदर दिसणारी परदेशी झाडं लोक दारात लावतात.
परदेशी झाडांकडं पक्षी फिरकतसुद्धा नाहीत. अशावेळी ‘ये गं खुई, ये गं खुई’ असं होल्यासारखं घोकत बाभळीसारख्या झाडांना बोलवावंसं वाटतं. आपल्याकडं काही गावांची नावंपण बाभुळगाव, बाभळी, बाभुळबन, बाभळवढा अशी आहेत.
त्यावरून त्या त्या ठिकाणी अगोदर किती बाभळी असतील याचा अंदाज येतो. आता पहिल्यासारखी बाभळीची झाडं फार दिसत नाहीत.
शेतीच्या औजारांसाठी, घरांसाठी, सरपणासाठी, फळ्यांसाठी, रस्त्यासाठी बाभळी तोडल्या गेल्या. पण बाभळीची रोपं आवर्जून कुणी लावल्याचं माझ्यातरी पाहण्यात नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.