
लेखक - ऐश्वर्य पाटेकर
बहीण-भावाची एक गोष्ट मी लहानपणी ऐकली होती. बहिणीच्या घरी भावू निघतो तेव्हा त्याची आई त्याला तहान-भुकेचे लाडू सोबत देते. म्हणजे तहान-भुकेचे लाडू कसे असतील? असा प्रश्न मला लहान पणी पडला होता.
तशीच मला एक गोष्ट सुचली, बहीण- भावाच्या गोष्टीसारखीच. फक्त ते बहीण-भाऊ (The Sister Brother Thing) वेगळे अन हे वेगळे आहेत. ती तुम्हाला ऐकवतो.
एक आई अन दोघे बहीण-भाऊ. बहीण खूप मोठ्या तालेवार घरी दिलेली. तीन तालाची माडी तिला राहायला असते. भावाची परिस्थिती बेताचीच असते.
मायलेक खावून पिऊन सुखी असतात. बेताची परिस्थिती जरी होती; तरी त्याच्या आईनं कधी कुणापुढे हात पसरलेले नसतात. झालं काय गावावर जरा जास्तच दुष्काळ पडला.
मग अन्नपाण्यावाचून मायलेकाचेही खूप हाल होऊ लागले. कुणापुढे हात पसरवणार? त्या गावात सगळ्यांचीच हालत एकसारखी झाली. आईला मात्र तिची तालेवार घरात दिलेली लेक आठवली.
तिच एकमेव आधार ठरली तर ठरू शकते. रिकामे डबडे-डुबडे चाळता चाळता आई गुडघ्यात मान घालून बसलेल्या लेकाला म्हणाली.
‘लेका, पातोरे ताईच्या घरी जाऊन! तिला सांग अशा नं असं झालं. लई वायीट वखुद आला. माझ्या संगुला द्या येईल. ती तुला रित्या हाती धाडायची न्हायी.’
‘हा आई संगुताई मला रित्याहाती धाडायची न्हायी!’ असं म्हणत जयराज आपल्या बहिणीच्या घरी जायला निघाला. वाटचालीला आईनं दिले शिळे कोरके फडक्यात बांधले; अन त्याच्या हातात पिशवी देता देता म्हणाली.
‘लेकां ये ऱ्हावदे वाटचालीला तहान-भुकेचे लाडू!’
भाऊ निघाला बिगी बिगी बहिणीच्या गावाला मजल-दरमजल करत. चालून चालून त्याचे पाय शिणले. बाभळीच्या सावलीला त्यानं बुड टेकलं.
पोटात भूक दाटून आलीच होती. त्याला आईचे तहान भुकेचे लाडू आठवले. त्यानं शिळ्या कोरक्याचं गाठोडं सोडलं. त्याला उगाच आपल्या आईच्या बोलण्याची गंमत आठवली.
आई याला का तहान-भुकेचे लाडू म्हणाली? आईची गोष्टच निराळी. अशा दिवसातही आपली आई कशी दु:खाला सामोरी जातेय. ती दु:खाला दु:ख कधी समजतंच नाही.
आपण लहान असताना बाप वारला. तरी आईनं आपल्याला अन ताईला वाढवलं. पण दु:ख करीत भुईधरुन बसली नाही. आपली आई फार धीराची. कोंड्याचा मांडा करणारी. तहान-भुकेचे लाडू ही तिचीच कल्पना.
शिळे कोरके खाऊन त्याची भूक भागली होती. पुन्हा बहिणीच्या गावाकडे निघाला. मजल दरमजल करीत. त्याला वाटलं आपली ताई आपल्याला मदत करेल का? करेलच संगुताईचा आपल्यावर खूप जीव. तिला जर कळलं आपण असे दिवस काढले तर ती उलट रागवेल.
‘कायरे उपास तापास काढत बसला तुझी बहीण मेली व्हती का? निरोप धाडायचं नं हातोपरहाती मदत पाठवली नसती का मी? न्हायीतर मीच आले असते धावत पळत.
माझी आई अन भाऊ उपाशी अन मला घास उतरला असता का गळयाखाली!’ अशी प्रेमानं खरडपट्टी काढली असती तिनं.
एखाददिवशी पिठाची एकच भाकर झाली तर तिघांत वाटून खायचो. उरलेली चतकोर आई अन ताई न खाता आपल्याला मिळायची. अशी आपली बहीण आपल्याला रित्याहाती पाठवायची नाही.
चालता चालता एक म्हातारी भेटली रस्त्यात. खरंतर तिचाच जीव तिला जड झाला होता. तरी भलीमोठी सरपणाची मोळी उचलायचा प्रयत्न करत होती.
‘ये पोरा, सरपणाच्या मोळीला हात लावतो का उलसा!’
‘आजी तुम्हाला पेलवेल का एवढी मोळी!’
‘पोरा दुष्काळाचं वझं त लई जडय; तरी पेलावंच लागतं!’ म्हातारिला खोकल्याची उभळ आली. ती खोकू लागली. जयराम इकडे तिकडे पाणी दिसतं का पाहू लागला.
म्हातारी खोकत खोकतच जमिनीला टेकली. जयराजला चऱ्हाट- बादली दिसली. त्यानं विहिरीतून पाणी शेंदल. म्हातारीला पाणी दिलं. पाणी पिऊन हुशारी आली
‘देव तुझं भलं करो! लेका तहानीनं जीव व्याकूळ झाला व्हता. आत्मा निवला बग!’
‘आज्जे तुझं लेक सांभाळीती नाही का तुला!’
‘दुष्काळचं आसा हाये नं बाप लेकाला धेरीना माय लेकाला, जग लई खुजं झालं. आपल्यापुरतं पातं. गंज चार लेकय मला. इसरले पार, आपणच आपल्याला जतवायचं! तू कुड निंगाला?’
‘माझ्या बहिणीकडं तिच्या कानावर घालतो आमची हलत. तिला येईल द्या. करील काही मदत!’
‘काही न्हायी लेका काहीच खरं न्हायी!’
‘माझी बहीण न्हायी इसरायची!’
‘देवाच्या दयेनं तसच व्हू; पण यक कर, ह्या दोन भाकरी ऱ्हावदे वाटचालीला. अजुक तुला लई वाट चालून जायची हाये!’
‘तुला –हावदे आजी!’
‘माझं पोट भरलं लेका तुह्या माणूसकिनं! ती काही चुल्यावर भाजता येत न्हायी. न्हायी त मोप भाकरी भाजून ठीवल्या अस्त्या माणुसकीच्या!’
म्हातारीला मोळी उचलून देवून भाऊ निघाला; बहिणीच्या गावाला. वाटामागून किती वाटा सरल्या. त्या काही मोजल्या नाही. त्याला बहिणीचं गाव लागेपर्यंत चालतंच राहायचं होतं.
थकून भागून चालणार नव्हतं. बहिणीचं गाव लागलं. तसा त्याच्या हातापायात जीव आला. जसा त्याला सुखाचा सुगावा लागला होता. सगळा शीणभार तो विसरला.
बहिणीच्या घरी आला. भिंतीला टेकून बसला. बहिणीला त्याला सांगायची होती हकीकत. त्या आधीच बहिणीनं तिची हकीकत सांगायला सुरुवात केली.
‘जयराज आमचेही लई हाल वहून राहिले या दुष्काळाने.’तीन तालाच्या माडीत राहणारी बहीण. धान्याच्या पोत्यांची मोठीच मोठी थप्पी घरात असलेली म्हणाली.
‘तुला काय सांगू आज सकाळच्या जेवणाला आम्हाला दोन भाकरी त्या झाल्या नाही.’
जयराजला खरंच वाटलं आपली बहीणच उपाशी. त्यानं जवळच्या दोन भाकरी आपल्या बहिणीला दिल्या
‘ताई या दोन भाकरी ठिव!’
असं म्हणत आल्या पावली निघाला. बहिणीनं पाणी ते दिलं नाही. आधी आईची अन त्याची त्याला चिंता होती. आता बहिणीच्या चिंतेचं ओझं त्यानं मनावर घेतलं. अन आपल्या गावाकडे निघाला.
पिंपळाखाली बसलेला म्हाताऱ्याने जयराजला हटकवलं.
‘कुणीकडचं पाव्हणं?’
जयराजला तर बिलकूलही इच्छा नव्हती. तरी तसाच जड झालेले पाय ओढीत त्याच्या जवळ गेला. अन म्हणाला,
‘मी संगिताबाई संसारेचा भाऊ!’
‘कसं येनं केलं?’
दिवस हे असे आले म्हणलं बहिणीकडं मदत मागावी काही!’
‘तुम्ही त रित्याहाती निंगला!’
‘तिलाच लई वाईट दिवस आलेय!’
‘काय सांगता काय की चेष्टा करताय. आरं गावचे पाटील हायेत ते. चेटून दिलं सहा महिनं इझायचं न्हायी म्हनं त्यायला वायीत दिस आलं. मायापातळ झाली लेका. कशाचं वायीत दिस. वायीत तुमच्या माझ्या सारख्यासाठी!’
मग तर जयराजला आणखीनच वाईट वाटलं. की आपली बहीण फारच निखरट निघाली. जयराज रित्याहाती आलेलं पाहताना आई काय समजायचं ते समजली. त्याला म्हणाली.
‘जाव दे लेका, दिवस कायी बसून ऱ्हात न्हायी. जमिनीचीही कळा बदलते आपन त माणूसय! अन लेका मनाला लावून घ्यायचं न्हायी, द्भ्ती गाय आटली त आपण नीळंवल्ल टाकायचं बंद करतो का न्हायी.
हिरीचं पाणी आटलं त तिच्याकडं बी कुणी फिरकत न्हायी. फिरतात दिवस आपण दम धरायचा! तवरुत खाऊ तहान-भुकेचे लाडू!’
आईची वाचा खरी ठरली. तहान-भुकेचे लाडू जास्त दिवस खायची गरज पडली नाही. पाणीपाणकाळे नितनेमाने पडले. भावाची शेती बहरली. गोठ्यात दूधदुभतं.
घरातही त्याची पोरं खेळू लागली. इकडे बहिणीचं सारं शेत धरणाखाली गेलं. चिमुटभर मातीही कपाळाला लावण्यापुरतीही राहिली नाही. सारं सारं गेलं तीन तालाची माडी गेली. ती नवऱ्याला म्हणाली,
‘आपण माझ्या भावाच्या घरी जाऊ. तो आपल्याला हुसकावून लावायचा नाही!’
‘तू तर त्याला हुसकावून लावलं व्हतं; मी तर म्हणलो व्हतो मदत करु, त्यांच्यावर वेळ आलीय! तर म्हणाली, आपण त्यायला मदत केली त आपल्याच मागं घोंगडं लागल..’
बहीण भावाच्या घरी आली. भाऊ म्हणाला
‘ताई रहा इथच!’
‘तुला रे कसं कळले माझं शेत धरणाखाली गेलं!’
‘तहानभुकेचे लाडू खावून जगलेला भाऊय तुझा! त्याला न सांगताच सारं कळतं! तू इसरली बाई तहानभुकेच्या लाडूची चव..! तुझा भाऊ न्हायी इसरला.
बहीण खजिल झाली.. गोष्ट संपली. तहान-भुकेचे लाडू मात्र संपणारे नाहीत. ते तुम्हीही खाल्ले असतील किंवा नसतीलही..!
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.