
इंद्रजित भालेराव
Indrajit Bhalerao Article : मागच्या आठवड्यात नगर जिल्ह्यातल्या शेवगावला जाताना गढी फाटा ओलांडल्यावर अर्ध्या तासांनी एक झाडाझुडपांचं हॉटेल दिसलं म्हणून आम्ही थांबलो. सावलीत निवांत रेंगाळत कॉफी घेत होतो. बाहेर रखरखीत ऊन दिसत होतं. हातात भरपूर वेळ होता. कार्यक्रम उद्या होता.
संतोष पेडगावकर या आमच्या चक्रधरांना मी सहज म्हणालो, रस्त्यात काही पाहण्यासारखं असतं तर पाहिलं असतं.
संतोष म्हणाले, भगवानगड आहे की. म्हटलं कुठय ? म्हणाले, थोडं आपल्या रस्त्याच्या बाजूला जावं लागतं. मला तर कितीतरी दिवसापासून भगवानगड पाहायचा होता.आम्ही थेट भगवानगडाकडे निघालो.
मार्च महिन्याचा शेवट असल्यामुळे रखरखतं ऊन आणि गडावरचं सगळं वाळून गेलेलं गवत. वातावरण असं रुक्ष असलं तरी मनात मात्र खूप ओलावा होता, गड पाहण्याचा. त्यामुळे जसजशी गडाची कमान जवळ येऊ लागली तसं तसं माझं काळीज हिरवं होत गेलं.
आणि प्रत्यक्ष गड पाहिला आणि मी पूर्ण मोहरून गेलो. गड पहात असताना त्याचे टप्पे सहज लक्षात येतात. बाहेरचा नवा परकोट हा अगदी अलीकडचा. त्यानंतर आतल्या प्रसादालय वैष्णव निवास निकेतन वस्तुसंग्रहालय या काही इमारती त्याआधीच्या.
त्यानंतर भीमसिंग महाराज यांनी बांधलेल्या दगडी इमारती आणि मग मूळ भगवान बाबांनी बांधलेल्या दगडी इमारती. हे सगळं पाहताना संतोष यांचं फोटो सेशन सुरूच होतं.
भगवान बाबांची समाधी, भीमसिंगांची समाधी, विजयी पांडुरंगाचं मंदिर, जनार्दन स्वामींची समाधी आणि धौम्म्य ऋषींचे मंदिर हा सगळा भाग पाहताना मी पूर्ण भगवानमय होऊन गेलो होतो मला डोळ्यासमोर तो सगळा काळ दिसत होता.
मी समाधीचं दर्शन घेतलं, तिथं ध्यान लावलं, नंतर क्षणभर मंडपात टेकलो. नन्तर आम्ही भगवान बाबांचं वस्तुसंग्रहालय पाहिलं. भगवान बाबांच्या नित्य वापरातल्या वस्तू पाहत असताना बाबा खरंच राजयोगी होते हे पटत जातं.
त्यांची आलिशान डमणी, बैलांच्या घुंगुरमाळा, म्हातारपणी हातात धरायच्या विविध काठ्या ज्याला आपण बेत म्हणतो, तलवारी, बंदूक हे सगळं पाहताना बाबा खरंच योगीही होते आणि राजेही होते हे पटत जातं.
मग आम्ही मागच्या बाजूला जाऊन प्रचंड मोठ्या शिळाही पाहिल्या. इथल्याच दगडातून हे सगळं दगडी बांधकाम बाबांनी केलेलं होतं. इथले दगड संपल्यावर त्यांना नवगण राजुरीच्या पहाडातूनही काही दगड आणावे लागले होते. पण आता इथं पुन्हा हे प्रचंड मोठे टोळ उघडे पडलेले दिसतात. हे टोळ पाहताना तेलंगणात गेल्यासारखं वाटतं.
परत निघताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक दुकान दिसलं. तिथं काही पुस्तकं आणि भगवान बाबांचे फोटो विक्रीसाठी उपलब्ध होते. भगवान बाबांचं एखादं चांगलं चरित्र मिळालं तर घ्यावं म्हणून उत्सुकतेनं मी तिथं गेलो. मला भगवान बाबांचा मूळ फोटो पाहिजे होता. पण तो मिळाला नाही. सगळे डेकोरेट केलेले रंगीबेरंगी फोटोज होते.
भगवान बाबांचं राजयोगी नावाचं एक अतिशय सुंदर सर्वांगीण चरित्र इथं मिळालं. भगवान वामन मिसाळ नावाच्या एका एसटी खात्यातल्या साध्या कर्मचाऱ्यानं लिहिलेलं हे सहाशे पानांचं चरित्र इतकं उत्कंठावर्धक आहे की घरी परत आल्यावर तीन दिवसात मी ते भूतानं झपाटल्यासारखं वाचून काढलं.
अनेक संतांची जीवनचरित्रं आणि कादंबऱ्या मी वाचलेल्या आहेत. पण एखाद्या संताच असं उत्कट, रसाळ, परिपूर्ण, सुदीर्घ असं चरित्र माझ्या पाहण्यात नाही. भगवान मिसाळ यांनी बारा वर्ष संशोधन करून, गावागावात जाऊन, भगवान बाबांना पाहिलेल्या माणसांना भेटून, प्रत्येक आठवणीच्या साक्षीदार माणसांच्या मुलाखती घेऊन हे चरित्र तयार केलेलं आहे.
मला मराठीतल्या पहिल्या चरित्राची, चक्रधर चरित्राची, म्हणजेच लीळाचरित्राचीच आठवण झाली. म्हाईम भट्टानं देखील अशीच मेहनत करून ते चरित्र लिहिलेलं होतं. तसंच आणि तितकंच उत्कट हे भगवान बाबांचं चरित्रही झालेलं आहे.
म्हटलं तर चरित्र आणि म्हटलं तर ही कादंबरी देखील आहे. मिसाळ यांनी प्रत्येक प्रसंग जिवंत केलेला आहे. त्यामुळे सहाशे पानापर्यंत उत्कंठा टिकून राहते. कंटाळा येत नाही. भाविक भक्त हे चरित्र मोठ्या श्रद्धेनं वाचतीलच.
सहाशे पानाच्या या पुस्तकाच्या मागच्या दहा वर्षात तीन आवृत्ती झालेल्या आहेत. पण ही एक वाङ्मयकृती आहे आणि वाङ्मयविश्वानंही तिची दखल घ्यायलाच हवी. पण आपल्या मराठी वाङ्मयविश्वात अशी दखल कुणीही घेत नसतं.
एका संताचं चरित्र, एका अनामिक लेखकानं लिहिलेलं, त्यात काय वाङ्मय असणार आहे ? असा समज आपण करून घेतो आणि आपल्या गैरसमजात मग्न असतो. पण एखाद्या लोकसंताचं लोकचरित्र एखाद्या लोकलेखकानं कसं लिहावं त्याचा हा एक उत्तम नमुना आहे. त्या दृष्टीनेच या लेखनाचं कुणी संशोधनही करायला हरकत नसावी.
बाबांचा जन्म, बाबांच्या गावाची पार्श्वभूमी, बाबांचं बालपण, बाबांचं शिक्षण, बाबांना लागलेला अध्यात्माचा लळा, श्रीमंत पाटील घराण्यात असूनही नारायण गडावर माणिक महाराजांच्या सोबत राहण्याची इच्छा, तिथं राहून केलेलं आचरण, नंतर मुकुंदराजांच्या अंबाजोगाईच्या दरीत तीन वर्ष केलेली कठोर तपश्चर्या, त्यानंतर परत आल्यावर बंकट स्वामींनी आळंदीला नेऊन दिलेलं कीर्तनकलेचे आणि अध्यात्माचं शिक्षण, परत आल्यावर वाढत गेलेलं वैभव, बाबांचे कीर्तनाचे दौरे, त्यातून घडत गेलेलं समाज प्रबोधन, त्यातून सुसंस्कृत झालेल्या पुढच्या पिढ्या, अनेकांना व्यसनातून मुक्त करणे, अनेकांना दरोडेखोरीतून मुक्त करणे, हे सगळं लेखकानं अत्यंत परिणामकारक पद्धतीनं मांडलेलं आहे.
एक दिवस नारायण गडावरच्या जातीयवादाचा बसलेला फटका, सगळं वैभव सोडून आणि कपडे सुद्धा काढून केवळ उपरणं गुंडाळून बाबा बाहेर पडले ते हिमालयात जाण्यासाठी. पण लोकांचा आग्रह इतका की त्यांनी बाबांना थांबवून घेतलं, अनेक जागा दाखवल्या. अनेक टेकड्या दाखवल्या. हवी ती जागा द्यायला लोक तयार होते.
पण बाबांचं वय आता ४५ वर्ष होतं. तसं उतरतंच वय. आता या वयात पुन्हा नवं काही उभं करण्याची उमेद घेणं अवघड. पण लोकांचा आग्रह इतका की बाबांनी हिमालयात जाऊ नये म्हणून लोक काहीही करायला तयार होते. मग भगवान बाबांनी या गडाची निवड केली.
पाथर्डी तालुक्यात असलेल्या खरवंडी गावच्या मालकीच्या डोंगरावरील जागेची बाबांनी निवड केली.
या खरवंडी गावाचा इतिहासही मजेशीर आहे.मुळात तो शब्द खरवंदी असा आहे. खर म्हणजे गाढव. गाढवाला वंदन केलं ती जागा. एकनाथ महाराज गंगेचं पाणी घेऊन येताना त्यांनी जिथं उन्हामुळे तडफडणाऱ्या, तहानलेल्या गाढवाला दूरचा प्रवास करून आणलेलं गंगेचं पाणी पाजलं तीच ही जागा खरवंदी. तीच पुढे खरवंडी झाली. इथून पैठण फार दूर नाही.
त्यामुळेच एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी शेवटचा काळ कंठण्यासाठी या गडावर आले होते. धौम्म्य ऋषींनी तपश्चर्या केलेला हा गड. त्यामुळे सगळे त्या गडाला धौम्यगड असेच म्हणत असत. हे ठिकाण बाबांना आवडलं. याच ठिकाणी आपण नवा गड उभा करायचा असा बाबांनी निश्चय केला. आणि बाबा कामाला लागले.
गड उभा करतानाचं एकेका प्रसंगाचं, बांधकाम, जागा, इमारत, दगड, गवंडी, स्थापत्यशास्त्र स्वतः बाबांचं. हे सगळं लेखकानं इतकं तपशीलवार उभं केलेलं आहे की वाचताना खूप आनंद वाटतो. गडाची उभारणी झाली.
पांडुरंगाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची. महाराष्ट्राचे नव्यानेच मुख्यमंत्री झालेले यशवंतराव चव्हाण यांनी यावं असं लोकांना वाटलं आणि चव्हाण साहेब आले. तो दिवस होता १ मे १९५८, पुन्हा एकदा संरक्षण मंत्री असताना १९६२ सालीही यशवंतराव इथं आले. यशवंतराव दोन वेळा गडावर येऊन गेले.
पहिल्याच कार्यक्रमात बोलताना यशवंतराव म्हणाले होते बाबांनी बोलवलं तर मी पुन्हा पुन्हा गडावर येईल. यशवंतराव मुख्यमंत्री झाले तेव्हा काढलेल्या पहिल्या स्मरणिकेत भगवान बाबासोबतचा त्यांचा फोटो मी फार पूर्वी पाहिला होता.
पण या पुस्तकात यशवंतरावांच्या दौऱ्याचा आणि त्यांच्या भाषणाचा इतका तपशील आलेला आहे की मला लेखकाचं आश्चर्य वाटलं. त्या जुन्या काळात दोन लाखांचा समूह जमल्याचं लेखकांनी नोंदवलय. भगवान गडाचे भगवानगड हे नामकरण आणि यशवंतरावांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या तिथल्या विद्यालयाचे भगवान विद्यालय हे नामकरण देखील यशवंतरावांनीच केल्याचं या पुस्तकाचे लेखक मिसाळ सांगतात.
तिथून पुढं सरकारी कागदपत्रांमधूनही भगवानगड याच नावाची नोंद झाल्याचं लेखक लिहितात. पुढं कै.गोपीनाथराव मुंडे साहेबांनीही असाच भगवान गडाला जीव लावला. भगवानगडाचा डंका दिल्लीपर्यंत पोहोचवला. त्यामुळेच शताब्दी वर्षात भगवान बाबांचं पोस्टाचं राष्ट्रीय तिकीटही निघालं. त्यावेळी केंद्र सरकारनं राष्ट्रीय पातळीवर जारी केलेले त्रैभाषिक दस्तऐवजही या पुस्तकाच्या शेवटी दिलेले आहेत.
ज्या जातीयतेच्या कारणानं बाबांना नारायण गड सोडावा लागला तेच कारण आपणाला चिकटू नये म्हणून आयुष्यभर बाबा जपले. नव्या गडाच्या उभारणीसाठी वंजारी माणसांनी देऊ केलेली जमीन नाकारली आणि मराठा पाटलाची जमीन त्यांनी स्वीकारली.
शेवटच्या काळात आपला उत्तराधिकारी म्हणून वंजारी माणूस न नेमता बंकट स्वामींचे पुतणे भीमसिंह महाराजांची नेमणूक केली. भीमसिंह महाराज हे रजपूत होते. भगवान बाबांसारखेच भीमसिंह महाराजही सोनोपंत दांडेकर आणि बंकट स्वामींच्या तालमीत घडलेले होते.
पुस्तकाच्या शेवटी मिसाळ यांनी लोकपरंपरेतले भगवान बाबा सादर केलेले आहेत. निरक्षर, सामान्य माणसांनी आणि स्त्रियांनी लिहिलेल्या जात्यावरच्या ओव्या, पोवाडे, पाळणे, गीते यांचेही संकलन पुस्तकाच्या शेवटी दिलेलं आहे.
ते वाचताना सामान्य माणसांच्या मनात बाबांनी किती जागा मिळवली होती ते आपल्या लक्षात येतं. म्हणून मी वर त्यांना लोकसंत असं म्हटलेलं आहे. त्या अर्थानं ते लोकांमध्ये इतके लोकप्रिय होते की त्यांच्या निधनानंतर शोक सागरात बुडालेला लोकसमुदाय पाहताना आपलेही डोळे पाणवतात.
भगवानगडावर फिरत असताना मला कोणीही, कुठेही अडवलं नाही. विचारलं नाही. सगळ्यांना सगळीकडे मुक्त संचार होता. कुणीही काहीही सूचना देत नव्हतं. संपूर्ण गड अतिशय स्वच्छ होता. अगदी पायात काही न घालताही तुम्ही निवांत सगळीकडे फिरू शकता.
ही गोष्ट मला महत्त्वाची वाटली. भगवान बाबांची स्वतःची इच्छा होती की गड जातीपातीत वाटला जाऊ नये, ती इथं फलद्रूप होताना दिसते याचा मला आनंद वाटला.
भगवान बाबांच्या चरित्रासोबतच सध्याचे महंत नामदेव शास्त्री यांचंही ज्ञानेश्वरीवर लिहिलेलं एक पुस्तक मी घेतलं. भगवानबाबांची परंपरा चालवणारे सध्याचे नामदेव शास्त्री हे देखील अत्यंत विवेकानं जगणारे ग्रहस्थ दिसतात. त्यांचं पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही प्रकारचं उच्च शिक्षण झालेलं आहे.
संस्कृतमध्ये त्यांनी न्यायशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि मराठी विषयात एमएपीएचडी आहेत. त्यामुळे नव्या आणि जुन्या दोनही ज्ञानपरंपरा ते जाणून आहेत. नव्या समाज माध्यमाला त्यांनी आपलंसं केल्यामुळे त्यांच्या भाषणाचे काही अंश ऐकायला मिळाले.
त्यांनी नेहमीच अंधश्रद्धेच्या विरोधी भूमिका घेतलेली दिसते. त्यांचा दृष्टिकोन विज्ञानवादी दिसतो. गडावर सुरू झालेलं राजकारण मोडून काढताना त्यांनी दाखवलेली कठोर शिस्तही सगळ्या जगानं पाहिलेली आहे.
गडावरून उतरावं वाटत नव्हतं. पण इलाज नव्हता. गडावरून उतरून घरी आलो त्याला आता पाच दिवस झालेले आहेत पण गड अजूनही डोक्यातून उतरलेला नाही.
भगवान बाबा अजूनही डोक्यातून उतरलेले नाहीत. ते आता उतरण्याची शक्यताही नाही. इतके काळजात जाऊन बसलेले आहेत. जग किती विशाल आहे आणि आपल्या आयुष्याला किती मर्यादा आहेत याचा खेद अशावेळी नक्कीच वाटतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.