Indian Economy : मूलभूत प्रश्‍नांना कधी हात घालणार?

Government Policy and Scheme : सर्वच मुले-मुली आपल्या आई-वडिलांचे, आजी-आजोबांचे; भावा-बहिणींचे लाडके असतात. पण यापैकी कोणीच आपल्या लाडक्या मुला-मुलींना, नातवंडांना, भावा-बहिणीना ते प्रौढ झाले तरी कडेवर घेऊन फिरवत नाहीत.
Indian Economy
Indian EconomyAgrowon
Published on
Updated on

संजीव चांदोरकर

सर्वच मुले-मुली आपल्या आई-वडिलांचे, आजी-आजोबांचे; भावा-बहिणींचे लाडके असतात. पण यापैकी कोणीच आपल्या लाडक्या मुला-मुलींना, नातवंडांना, भावा-बहिणीना ते प्रौढ झाले तरी कडेवर घेऊन फिरवत नाहीत. किंवा त्यांना आयुष्यभर कडेवर घेऊन फिरवणे हाच ते लाडके / लाडक्या असण्याचे द्योतक आहे असे कोणी म्हणत नाही. आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो ती व्यक्ती सर्वार्थाने स्वावलंबी व्हावी, आपल्यावर अवलंबून राहू नये, त्या व्यक्तीला आत्मसन्मानाने जगता यावे म्हणून सर्व आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण जिवाचे रान करतात.

केंद्र व राज्य सरकारचा दृष्टिकोन मात्र तसा नाही. लाडकी बहीण, लाडका भाऊ प्रौढ व्यक्ती आहेत, त्यांनी संसार थाटले आहेत तरी देखील त्यांना पॉकेट मनी सारख्या रकमा द्यायच्या, हे सरकारचे धोरण असल्याचे दिसून येत आहे.

Indian Economy
Economy : व्यवस्था बदलासाठी कृतिशील हस्तक्षेप

शेतीला लागणाऱ्या गोष्टी किफायतशीर भावात मिळतील, शेतीमालाला वाजवी किमती मिळतील, शेतीसाठी पायाभूत सुविधा गुंतवणूक केली जाईल आणि शेतकरी कालांतराने वित्तीयदृष्ट्या किमान स्वतःच्या मिळकतीवर जगू शकेल हे न पाहता, दरवर्षी एक छोटी रक्कम त्याला द्यायची, अधून मधून थोडीफार कर्जमाफी जाहीर करायची; पण कोट्यवधी शेतकऱ्यांच्या जगण्या-मरण्याशी संबंधित असलेल्या शेती क्षेत्रातील मूलभूत प्रश्‍नांना कधी हात घालायचा नाही, असा सरकारचा दृष्टिकोन आहे.

शिक्षण क्षेत्रात सार्वजनिक पैसे न घालता, आहे त्या सरकारी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे कशी सुधारतील हे न बघता, विद्यार्थ्यांना कर्ज काढावे लागलेच तर त्यांना नोकरी मिळेल आणि त्या मिळकतीतून ते स्वतःहून कर्जाची परतफेड करू शकतील हे न बघता विद्यार्थ्यांना छोटी मोठी मदत द्यायची, छोटी कर्जमाफी द्यायची; पण विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या मूलभूत प्रश्‍नांना कधीही हात घालायचा नाही, याकडे सरकारचा कल आहे.

Indian Economy
Indian Economy : भारतातील आर्थिक विषमता सर्वोच्च टप्प्यावर

स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनंतर देखील आपल्या देशातील कोट्यावधी नागरिक एवढ्या वंचित अवस्थेमध्ये आहेत की ते सतत शासनाच्या अगदी छोट्या मदतीकडे देखील डोळे लावून बसलेले असतात. त्यातून त्यांच्या आत्मसन्मानाचा निखारा कधी फुलत नाही. त्यांच्यात एक प्रकारची मिंधेपणाची भावना वर्षानुवर्ष रुजते; नव्हे रुजवली जाते.

माणसासारखे जगणे म्हणजे म्हणजे फक्त अर्धीमुर्धी भाकर मिळणे नव्हे, तर स्वकष्टाने ती मिळवणे, स्वकष्टाने आपल्या कच्या-बच्याचे संगोपन करणे, हे सर्व करताना छान वाटणे आणि आयुष्यभर आत्मसन्मानाने जगणे म्हणजे माणसासारखे जगणे होय.

शासनाची अर्थसंकल्पीय तूट वाढते असे कारणे देऊन शासनाच्या कल्याणकारी योजनांना विरोध करणारे नवउदारमतवादी साहित्य वाचा; ‘माणसाचा आत्मसन्मान’ हा शब्द जरी त्या साहित्यात आढळला तर मला सांगा.

लाडक्या बहिणींनी, भावांनी, शेतकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी शासनाकडून मिळणारी सर्व मदत जरूर घ्यावी. कारण तो त्यांचाच म्हणजे सार्वजनिक पैसा आहे. पण आज ना उद्या आम्हाला तुमच्या मदतीची गरज लागणार नाही अशी धोरणे आखा, हे देखील त्याच वेळी ठासून सांगावे.

(लेखक प्रख्यात अर्थ विश्‍लेषक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com