Human Psychology : बदलांना सामोरे जाताना

Change : बदल हा निसर्गाचा नियम आहे. अपरिहार्य अशा बदलांशी कसं जुळवून घ्यावं? त्यांना कसं सामोरं जाता येईल? बदलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निरोगी असेल तर आपण स्वत:ला परिवर्तनाच्या पातळीवर नेऊ शकू.
Human Psychology
Human PsychologyAgrowon

डॉ. आनंद नाडकर्णी
Dr. Anand Nadkarni Article : बदल हा निसर्गाचा नियम आहे. अपरिहार्य अशा बदलांशी कसं जुळवून घ्यावं? त्यांना कसं सामोरं जाता येईल? बदलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निरोगी असेल तर आपण स्वत:ला परिवर्तनाच्या पातळीवर नेऊ शकू. बदलांशी जुळवून घेणं आणि त्यातून आपली प्रगती साधणं जमू शकेल. परिवर्तन म्हणजे काय? आजूबाजूला घडणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी मला माझ्या पातळीवर- म्हणजे माझे विचार, भावना व वर्तन यांत- जो बदल घडवावा लागतो ते म्हणजे परिवर्तन.

काळानुरूप बदल हा निसर्गाचा नियमच. जंगलात राहणाऱ्या आदिमानवापासून आजच्या प्रगत मनुष्यापर्यंत आपला जो प्रवास झाला, त्याचं कारणच मुळी बदल घडत गेले आणि माणसानं त्यांच्याशी जुळवून घेतलं म्हणून. मात्र गेल्या काही वर्षात हे बदल घडण्याचा वेग थक्क करणारा आणि दमवून टाकणारा आहे. नव्या परिस्थितीशी जुळवून घेतो आहोत तोवर परत काहीतरी घडतं. नवे बदल, नवी आव्हानं पुढ्यात येतात. माणसाला बदलाशी जुळवून घ्यायला आताशा फारशी उसंत मिळेनाशी झालीय.

अपरिहार्य अशा बदलांशी कसं जुळवून घ्यावं? त्यांना कसं सामोरं जाता येईल? बदलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निरोगी असेल तर आपण स्वत:ला परिवर्तनाच्या पातळीवर नेऊ शकू. बदलांशी जुळवून घेणं आणि त्यातून आपली प्रगती साधणं जमू शकेल. परिवर्तन म्हणजे काय? आजूबाजूला घडणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी मला माझ्या पातळीवर- म्हणजे माझे विचार, भावना व वर्तन यांत- जो बदल घडवावा लागतो ते म्हणजे परिवर्तन.

घरात छोट्या बाळाचं आगमन हा हवाहवासा वाटणआरा बदल. त्याच्या जन्माच्या वेळी पेढे-बर्फी वाटून आनंद व्यक्त केला जातो. पण काही दिवसांनी बघा चित्र कसं असतं! हे बाळ रात्री झोपत नाही, खातापिताना गडबड करतं, रडतं, रात्री जागवतं! म्हणजेच नव्या बाळाच्या आनंदासोबत जबाबदाऱ्याही आल्या. हे गोड गोजिरं लाडकं बाळ विनासायास मोठं होणार नाही. आपल्याला रुटीनमध्ये बदल करायला हवा, आपल्या गरजा आणि प्राधान्य यांचा पुन्हा विचार करायला हवा. कोणताही बदल हा अशा नव्या बाळासारखा असतो. तो सुख आणतो, प्रगती घडवतो; पण त्याच बरोबरीने जबाबदारीचं भानही वाढवतो. कुठल्याही बदलातला हा त्रासाचा भाग स्वीकारावा लागतो. त्याबद्दल निष्क्रियतेने कुरकुर करत राहण्यापेक्षा सक्रिय राहून ‘मला काय करता येईल?' असा विचार करणं जास्त फायद्याचं!

Human Psychology
Human Psychology : आपल्या मनाचा सेल्फी

आपण स्वभावाचे किंवा स्व-प्रतिमेचे चार पॅटर्न पाहिले आहेत. प्रत्येकजण त्याच्या मूळ पॅटर्न प्रमाणे (core pattern) बदलांकडे कसं बघेल आणि जुळवून घेईल, हे थोडं समजून घेऊ.

तटस्थ व्यक्ती: बदल होवो अगर न होवो.. मला काही पडलेलं नाही. माझं चाललंय ते चालू दे. (मी आहे इतकंच.)
भिडस्त: “अरे बापरे, केवढं सगळं बदललंय..! आमच्या काळी जग किती सुंदर होतं...आजच्या जगात काही रामच राहिला नाही.” एकूण काय तर ही मंडळी स्वत: रडगाणं गात राहतात व स्वत:सोबत इतरांनाही नैराश्यात नेतात.
आक्रमक: “मी त्या बदलाच्या पुढे आहे ... मी बदलाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाईन.” ही मंडळी बदलाचा चांगला भाग ओरबाडून घेणारी असतात. जगात जे लेटेस्ट आहे, बदलांचा फायदा आहे तो मलाच मिळायला हवा असा हेका धरणारी असतात.
आग्रही: “या बदलांमुळे होणारे फायदे उपभोगणारा तो उपभोक्ता. मी असा या बदलांचा फक्त उपभोक्ता असणार आहे का? की मी बदलाच्या प्रवाहामध्ये आवश्यक तिथे काही बदल घडवू शकतो?”
बदलांमध्ये भेलकांडून जायचं नसेल तर बदलांकडे बघण्याचा आग्रही दृष्टिकोन विकसित करणे इष्ट.

Human Psychology
Human Psychology : आग्रही नेतृत्व

बदलांशी जुळवून घेताना काही सूत्रे लक्षात ठेवूया -
भविष्यातील बदलांचा अभ्यासपूर्ण अंदाज बांधणे
आजच्या समस्या आणि विकास बघता भविष्यात काय काय बदल
होऊ शकतील? ह्या बदलांचे थेट माझ्या आयुष्यावर होणारे परिणाम काय असतील? त्यातले फायद्याचे कोणते आणि त्रासदायक कुठले? हे बदल मी कसे स्वीकारणार आहे? या प्रश्नांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. उदाहरणार्थ आता आपण पेट्रोल-डिझेल या परंपरागत इंधनावर चालणाऱ्या गाड्यांकडून हळूहळू इलेक्ट्रिक गाड्यांकडे चाललो आहोत. सौर ऊर्जेचा वापर अधिकाधिक करतो आहोत. म्हणजे भविष्यात ह्या ऊर्जासाधनांचा आपल्याला स्वीकार आणि वापर करायचा आहे, त्यासाठी आवश्यक ते तंत्र शिकून घ्यायचं आहे, अशी आपली मानसिकता पाहिजे.

घडणाऱ्या बदलांकडे एक प्रक्रिया म्हणून पाहणे
कुठलाही बदल हा टप्प्याटप्प्यात घडत जातो, त्याच्या जोडीनेच आपण स्वत:मध्ये परिवर्तन करत नेऊ. आताची परिस्थिती आणि भविष्यातील नवी परिस्थिती याची सांगड घालायचा प्रयत्न करू. उदाहरणार्थ, आताच्या तरुण पिढीतील स्त्रिया शिक्षण घेतल्यावर कदाचित पूर्णवेळ घरकाम करणार नाहीत, त्या उद्योगात / शेतीत सक्रियपणे कामे करतील, नोकरी करतील. ह्या बदलाशी घरातील सर्वच पिढ्यांना आणि व्यक्तींना जुळवून घ्यायला लागेल. घरातील स्त्रीकडून असलेल्या पारंपरिक अपेक्षा बदलाव्या लागतील, मदतीचा हात पुढे करावा लागेल. शिक्षकाला नवे तंत्रज्ञान, व्हिडिओ वापरणे, ऑनलाइन शिक्षण यांचा स्वीकार आणि सराव करावा लागेल. गॅरेज चालवणाऱ्या तंत्रव कुशल व्यक्तीला इलेक्ट्रिक वाहने दुरुस्त करायचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. उद्योजक शेतकऱ्याला शेतीतील नवे कायदे आणि योजना यांची वेळोवेळी माहिती करून घ्यावी लागेल.

अचानक एका दिवसात हा बदल घडेल का? तर नाही, ही एक प्रक्रिया असेल. हळूहळू, टप्प्याटप्प्याने घडणारी. त्यात काही गोष्टी अचूक होतील तर काही ठिकाणी चुका होतील. पण आपण त्याकडे एक प्रक्रिया म्हणून पाहू शकू.

काही बदल स्वीकारताना, विरोधाचा सामना करावा लागेल. शेतीचे तंत्र बदलायचे किंवा नवी औषधे वापरायचे म्हटले तर कदाचित वयाने ज्येष्ठ लोकांना ते पटणार नाही. पण वास्तवपूर्ण अभ्यास, वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन स्वहित आणि परहित दोन्ही जोडून घेत परिवर्तनाच्या वाटेने निघालेल्या व्यक्तीला विरोधी मताचा सामना कसा करायचा हे शिकावे लागेल. वैचारिक, नैतिक संघर्ष, वादविवाद, विसंवाद हे सगळं अटळ आहे. त्यासाठी सगळ्या गोष्टी मोकळ्या मनाने तपासून बघाव्या लागतील. वैचारिक, वैज्ञानिक व नैतिक बाबींची फारकत करावी लागेल. आपल्याला आग्रही भूमिकेवर राहून, समोरच्या विरोधकांच्या भावनांची कदर करणाऱ्या, सहवेदना असणाऱ्या निरीक्षकाची भूमिका निभावावी लागेल. हे आपण करू शकलो तर आपण परिवर्तनाच्या वाटेवर आहोत, असं म्हणता येईल.

स्वत:मध्ये जेव्हा परिवर्तन होईल तेव्हा आपण आपल्या भवतालच्या लोकांच्या बदलाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवण्यासाठी मदत करू शकू. म्हणजेच स्वत:सोबत समूहाचे परिवर्तन आपण करू शकू. आणि मग त्यातून बदलांशी जुळवून घेतलेला, योग्य ते स्वीकारलेला आणि टाकाऊ गोष्टी बाजूला केलेला असा एक संघ / समाजगट तयार होईल.

सतत बदलणाऱ्या ह्या जगात आपल्या जीवनात स्थिरता कधी येते? काळाची गती व माणसाची गती यांत जेव्हा एक लय निर्माण होते तेव्हा. घडणाऱ्या बदलांशी जुळवून घेत, त्या गतीला आपलंसं करतो तेव्हा आपण गतिमान असतो आणि तरीही एक स्थैर्य असते. वेगवान फिरणारा भोवरा गतिमान असतो तेव्हा कलंडून पडत नाही. उलट त्या गतिमान अवस्थेत तो स्थिर असतो. मात्र गतीशी जुळवून घेतलं नाही तर भोवरा भेलकांडतो, कलंडतो आणि शेवटी थांबतो. म्हणजेच गतिहीन, निष्क्रिय होऊन जातो.

आपल्याला गतिहीन निष्क्रियता नाही तर गतिमान स्थिरता हवी आहे. व्यक्तीने आपले विचार, भावना आणि वर्तन सतत बदलाशी जुळवून घेतले तर त्या जुळवून घेण्याला एक लय आणि ताल येतो... आयुष्याला स्थिरता येते...
-------------------
संशोधन आणि शब्दांकन: डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी
kartashetkari@gmail.com
आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com