Healthy Diet : अन्न ही प्राणिमात्रांची मूलभूत गरज

Food Importance : अलीकडचा आहारशैलीतील बदल तपासला तर, हा प्रवास सुकडी ते सेरेलॅक, वरण-भाकरी ते खिचडी, भाकरी-चपाती ते न्यूडल्स-चौमिनचा आहे.
Healthy Diet
Healthy DietAgrowon

आत्याच्या लग्नातली गोष्ट. वर्ष असेल १९७० च्या आसपासचे. आत्या शिकलेली म्हणून नवरदेवदेखील नोकरी करणारा शिक्षक. एकंदर सुशिक्षितांची पिढी. लग्नाच्या दिवशी लगीनघरी वऱ्हाड पोहोचले. पाहुणे आल्या आल्या त्यांना चहा करायची पद्धत तेव्हा होती. पण हा चहा सगळीकडे गुळाचाच केला जायचा. चहात साखर वापरणे हे तेव्हा प्रतिष्ठेचे लक्षण समजण्याचा हा काळ.

चहासाठी वेगळी साखर घरात आणून ठेवलेली असताना देखील नवरीच्या मावशीने गडबडीत गुळाचाच चहा केला. यावर नवऱ्याकडच्या मंडळींनी भरपूर नाराजी व्यक्त केली, तो त्यांना त्यांचा अपमान वाटला. ही नाराजी आत्याच्या संसारात आयुष्यभर पुरली. आहारशैली जशी बदलत जाते, तशी संस्कृती वळण घेते व जशी माणसांची परिस्थिती बदलते, तसे आहार घेण्याची पद्धती बदलत जाते.

आदिमानवापासून ते आजतागायत ‘अन्न’ हा मानवी संस्कृतीच्या जडण-घडणीचा मुख्य भाग राहिला आहे. पृथ्वीवर आपले अस्तित्व टिकविण्यासाठी अन्न आणि अन्न मिळविण्यासाठी संपूर्ण जीवनभर धडपड! त्यासाठी माणसाचा अन्न इतिहास समजून घेणे बरेच रोचक असणार आहे. कंदमुळे, फळे, बिया, पाने इत्यादींचे संकलन करून जगणारा मानव... मासे, पक्षी, प्राणी इत्यादींची शिकार करून अन्न भोग घेणारा मानव... कसे असेल त्याचे आयुष्य?

भरपूर कष्ट म्हणून भरपूर उष्मांकाची गरज, शिवाय जेव्हा अन्न कच्चे खाल्ले जाते, तेव्हा चावण्यासाठी त्याला भरपूर वेळ लागत असणार. पुढे कधीतरी भाजलेले अन्न चवदार लागते हे समजल्यावर अन्न शिजवून खाण्याची सुरुवात झाली असावी. तेव्हा मसाले तर नक्कीच नसावेत. त्यामुळे आजसारखे जिभेचे चोचले नसणार. मुळात चावण्यासाठी आता कमी वेळ लागत असणार यातच मोठे समाधान असेल.

Healthy Diet
Importance of Food : अन्न म्हणजे फक्त ‘पोट भरण’ नव्हे

जेव्हा आदिम अन्न आहाराचा भाग होते, तेव्हा साहजिकच ते सभोवतीचे वातावरण व ऋतूनुसार उपलब्ध होणारेच असणार. त्या त्या भौगोलिकतेनुरूप उपलब्ध असणाऱ्या वनस्पती हा आहाराचा मुख्य भाग. ऋतूनुसार उपलब्ध असणारी फळे व पाने हे हजारो वर्षे माणसाच्या आहाराचा भाग आहेत. आजही आदिवासी भागातील काही जमातींच्या खाद्यसंस्कृतीचा अभ्यास केला की त्याची प्रचिती येते. हंगामातील रानभाज्या या आजही हमखास खाल्ल्या जातात, त्यासाठी दिवसभर हिंडून त्या गोळा केल्या जातात.

शेतीच्या शोधाबरोबर मानवाची काही प्रमाणात स्थिर जीवनाला सुरुवात झाली. नवनवीन निरीक्षणासाठी त्याला वेळ मिळू लागला. त्यातूनच अनेक शोध लागले. साहित्य व कलांचा उगम झाला. शोधांची देवाण-घेवाण होऊ लागली. विशेषतः वापरातली विशेष झाडे, बियाणे यांची देवाण-घेवाण जगभर मोठ्या प्रमाणात झाली.

मसाले, चव वाढविणारे पदार्थ व पाककृतींचा त्यामध्ये महत्त्वाचा वाटा होता. गरज हा घटकही महत्त्वाचा ठरला. उदाहरणार्थ, जास्त वयस्कर लोकांचे दात पडल्यावर अन्न चावणे शक्य नाही म्हणून त्यासाठी पेज, सूप असे प्रकार उदयाला आले. यातूनच विशिष्ट अशा पाककलेचा उदय झाला.

अगदी अलीकडच्या काळापर्यंत हिरवी किंवा लाल मिरची हा भारतीयांच्या आहारातील पदार्थ नव्हता. आपल्याकडे तिखटासाठी मिरे वापरले जात असे. राजेमहाराजांच्या पाककलेचा जो इतिहास आहे त्यात विविध खिरी, पेय व गोडाचे पदार्थ यांचा उल्लेख येतो. परंतु त्या वेळी सामान्य माणसांच्या आहारबद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही.

अगदी अनारसा, करंज्या, सांजोऱ्या हे फराळाचे प्रकार देखील राजे- श्रीमंत लोकांच्या आहाराचाच भाग होता. हळूहळू सामान्य माणसांची ऐपत जशी वाढत गेली, तसे हे पदार्थ त्यांच्या आहाराचा भाग बनले.

शंभर-दीडशे वर्षांपूर्वीचे जे संदर्भ सापडतात, त्यानुसार राळा, बाजरी, डेंगळे, हरिक असे भरडधान्य गरिबांच्या आहाराचा भाग, तर गहू व चांगले दर्जेदार भात हा श्रीमंतांचा खाण्याचा भाग असल्याचे दिसते. अगदी ५० वर्षांपूर्वी गहू ही परवडणारी गोष्ट नव्हती, तर भात जेथे पिकवला जातो तेथेच खाल्ला जाई.

अलीकडचा आहारशैलीतील बदल तपासला, तर हा प्रवास सुकडी ते सेरेलॅक, वरण-भाकरी ते खिचडी, भाकरी-चपाती ते न्यूडल्स-चौमिनचा आहे. ही देखील देवाण-घेवाण आहे; पण आज फक्त चव हा महत्त्वाचा भाग बनला आहे. अन्न हे भरण-पोषण हा विचार मागे पडत गेला. एक पिढी २५ वर्षांची धरली, तरी मागच्या तीन पिढ्यांपासून म्हणजे ७५ वर्षांपासून बदल व्हायला सुरुवात झाली.

शेतीपद्धतीत झालेले बदल हे त्याचे मुख्य कारण. या काळात सामजिक गोष्टींचा जास्त प्रभाव पाहावयास मिळतो. शेतीत आलेले संकरित बियाणे, रासायनिक तंत्राचा वापर, सुधारणेच्या नावाखाली अयोग्य पदार्थांचा आहारात समावेश यामुळे पुढची पिढी कमजोर बनली. आधी १३० किलोचे धान्य एका दमात उचलणारी माणसे आता ३० किलो उचलायला कचरू लागलेत. पूर्वी स्त्रिया आठ-दहा मुलांना जन्म देत; पण तरीही त्या सक्षम असत.

पूर्वी लग्न असायचे तेव्हाच गोड-धोड मिळायचे. लग्नात लाडू किंवा लापशी. हे लाडू मिळविण्यासाठीही चढाओढ असायची. ते विशिष्ट लाकडी पेटीत जपून ठेवले जायचे. आदिवासींमध्ये तर असे गोडाचे पदार्थ जवळ जवळ नाहीतच. कडू-कंदाची लापशी किंवा शेंगदाण्याची पोळी असे काही प्रकार आता बघायला मिळतात. सूपशास्त्र हे मराठी भाषेतील पहिले पाककृतीचे दस्तऐवजीकरण.

त्यात लेखक स्पष्टपणे म्हणतात, की अनेक महिला स्वयंपाक अदमासे जिनसा वापरून करतात. योग्य प्रमाणात जर साहित्य वापरले नाही, तर त्याची चव बिघडते शिवाय त्या पदार्थाचे औषधी गुणदेखील मिळत नाहीत.

म्हणजे पारंपरिक आहारात वापरलेले प्रत्येक साहित्य हे विचारपूर्वक वापरले गेलेले आहे. शिवाय या पुस्तकात स्पष्ट म्हटले आहे, की मानसिक स्वास्थ्य हे देखील घरातील अन्न बनवण्यावर अवलंबून आहे. म्हणजे एखादी गृहिणी उत्तम स्वयंपाक बनवत असेल तर त्या घरातील शांती चांगली राहते. त्या काळी आहारात लोणची, मुरांबे, सांडगे तसेच चटण्या या तोंडी लावण्याला अतिशय महत्त्व दिले गेले आहे.

Healthy Diet
Healthy Maharashtra : ‘निरोगी महाराष्ट्रा’साठी सरसावला शेतकरीपुत्र

अन्नाच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचा भाग मनाला जातो तो म्हणजे त्यासोबतची ‘मेमरी’ किंवा आठवण. त्या विशिष्ट पदार्थाच्या चवीबरोबर विशिष्ट आठवण जोडलेली असते. म्हणून घरी बायकोने किंवा आणखी कुणी तोच पदार्थ कितीही सुरस बनवला, तरी तो आपली आई बनवायची तसा चवदार बनला नाही, असे प्रत्येकालाच वाटते. हल्ली पदार्थाच्या चवीबरोबर तो दिसतो कसा याला जास्त महत्त्व आले आहे.

तांदूळ हा सर्वांत लोकप्रिय प्रकार. आपण रोज भात खातो, पण लाल, काळा. पिवळा, निळा अशा रंगांचेही भात असतात, हे आपल्याला ठाऊक आहे का? सह्याद्रीत एकेकाळी बहूतकरून सापडणारे लाल भाताचे वाण जसे तामकुडा, ढऊळ, भवड्या, सकवार, तांबडा आंबेमोहर, कमोद ही आता अत्यल्प प्रमाणात शिल्लक आहेत.

त्यांचा भात लाल रंगाचा दिसतो, म्हणून ते वाण गायब झाले. एकदा का एखादे पीक आहारातून गायब झाले की ते शेतातून देखील गायब होते. अतिशय पौष्टिक, हाडे मजबूत ठेवणारा, मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असणारा भात काळाच्या पडद्याआड गेला, तर ते मानवी समाजाचे मोठे नुकसान असेल.

एकेकाळी पृथ्वीवर ज्यांची दहशत होती ते अजस्र डायनासोर नामशेष झाले, त्याचे कारणही अन्न हेच असावे, अशी एक शक्यता व्यक्त केली जाते. एक वेळ अशी होती की त्यांना मुबलक अन्न अगदी तोंडाजवळ उपलब्ध होते. तोंड वर केले की अन्न, अशी स्थिती असल्यामुळे त्यांचा मेंदू क्षीण बनत गेला.

भयंकर दुष्काळ पडला, अन्नाची टंचाई भासू लागली, तेव्हा एका जागेहून दुसऱ्या जागी अन्नाच्या शोधात जावे इतकेही त्यांना उमजले नाही व उपासमारीमुळे त्यांचा अंत झाला, असे म्हणले जाते. वाघांची संख्या कमी होते, कारण त्यांचे खाद्य संपले म्हणून. बिबट्यांचे हल्ले वाढतात ते अन्नासाठी. अन्न ही प्राणिमात्राची मूलभूत नैसर्गिक गरज आहे. त्याला माणूसप्राणी तरी अपवाद कसा असणार?

(लेखिका निसर्ग अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत.) ९४२३७८५४३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com