Water Management
Water ManagementAgrowon

Water Management In Soil : मातीत योग्य प्रकारे पाणी मुरण्यासाठी काय करावं?

पाणी खडकात मुरून भूजलामध्ये रूपांतरित होण्यासाठी ते आधी मातीत मुरायला तर हवे ना! शेतीतील पाणी शेतात मुरण्यासाठी मातीची सच्छिद्रता (porosity) म्हणजेच मातीच्या कणांमधील पोकळीची टक्केवारी जास्त हवी. ती वाढविण्यासाठी काय करता येईल, याची माहिती या लेखातून घेऊ.

सतीश खाडे

Water Management : मागील एका लेखामध्ये मातीचे प्रकार आणि त्यांच्या सच्छिद्रतेविषयी माहिती घेतली. एकेकाळी चांगली सच्छिद्रता असलेल्या मातीमध्येही हल्ली पाणी मुरत नसल्याचे जाणवते. येथे वेगळीच अडचण आहे. मातीची मूळ सच्छिद्रता कमी झाली आहे.

कारण शेताला भरपूर व सतत पाणी देत राहणे. दिलेल्या पाण्यातील बरेचशे पाणी बाष्पीभवनातून उडून जाते. शिल्लक राहतात ते क्षार. असेच पाण्यातील क्षार, रासायनिक खते, तणनाशके आणि कीडनाशके जमिनीतच साठत राहतात.

माती चिबट, तर संपूर्ण राने कडक झालेली दिसतात. अगदी ट्रॅक्टरने नांगरून, सर्व ढेकळे फोडून माती अगदी लोण्यागत केली तरी पहिल्या पावसात किंवा पहिल्या सिंचनानंतर रान वाळले की रान कडक होते. मग त्यातून खाली झिरपत किंवा मुरतच नाही.

पाणी मुरण्याचा वेग तपासणे

मातीची सच्छिद्रता आणि तिच्यात पाणी मुरण्याचा वेग आपण ढोबळमानाने तपासू शकतो. त्यावरून आपल्याला मातीचे आरोग्य समजू शकते. पाणी मुरण्याचा वेग कमी असल्यास त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करता येतात.

या प्रयोगासाठी लोखंडी पाइपचे साधारण नऊ इंच ते एक फुटाचे दोन तुकडे लागतात. शेतात एका वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे पाइप मातीत ठोकून उभे करावेत. त्यात अर्धा (किंवा एक) लिटर पाणी टाकावे. हे पाणी जमिनीत पूर्ण मुरण्यासाठी लागणारा वेळ ‘स्टाॅप वाॅच’ ने मोजावा.

Water Management
Water Storage : कमी खर्चाचे पाणी साठवण हौद शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

त्यावरून आपल्या मातीचा पाणी मुरण्याचा वेग समजेल. माझ्या निरीक्षणावरून तरी रासायनिक खते देत असलेल्या जमिनीत पाणी मुरण्याचा वेग आढळला आहे.

त्याच शेतात झाडाखाली जिथे कायम पालापाचोळा कुजून पडलेला असतो, तिथे किंवा जिथे सेंद्रिय खताचा वापर केलेला असतो अशा ठिकाणी पाणी वेगाने मुरत असल्याचे दिसते. हाच नियम अधिक लांबवला तर जंगलातही वेगाने पाणी मुरते.

ज्या फळबागांमध्ये पालापाचोळा व सेंद्रिय खतांचा भरपूर वापर असतो, तिथेही पाणी वेगाने व अधिक प्रमाणात मुरते.

जोपर्यंत विदर्भ मराठवाड्याच्या काळ्या, खोल जमिनीत जोवर कृत्रिम रासायनिक खतांचा वापर होत नव्हता, तोवर तिथल्या फक्त पावसावरच दोन पिके सहज हाताला लागत. नगर, सोलापूरमध्येही दोन व तीन पावसातच मोत्यांच्या दाण्यासारखी ज्वारी तरारून येई.

पुढे सर्वत्र रासायनिक खतांचा वापर वाढला. रसायनांच्या वापरामुळे जमिनीची पाणी मुरण्याची, धरून ठेवण्याची क्षमता हळूहळू संपत आली. रासायनिक खतांमुळे खाली खडकांपर्यंत पाणी पोहोचून मुरणेच बंद झाले. दुसरीकडे जमीन पाणी धरून ठेवत नसल्यामुळे पिकाला पाणी देण्याच्या पाळ्याही वाढल्या. त्यासाठी पुन्हा भूजलाचा उपसा वाढत गेला.

या दुहेरी बाबींचा परिणाम म्हणजे भूजल पातळी खाली जात आहे. अगदी ९०० मिलिमीटर वार्षिक सरासरी पर्जन्यमान असलेल्या विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये, व मराठवाड्यातील परभणी, हिंगोलीसारख्या जिल्ह्यांमध्येही हेच घडताना दिसत आहे.

नक्की काय घडते मातीतल्या या रसायनांमुळे?

रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांच्यामुळे माती मृत होत जाते. कारण या रसायनांमुळे मातीतील सूक्ष्मजीव, मुंग्या, गांडुळे, वाळवी, भुंगेरे, विविध प्रकारच्या बुरशी आणि झाडांची वाढलेली नाजूक मुळे हे सर्व मरतात. त्याला जोड मिळते ती अति नांगरट, पालापाचोळा जाळणे यामुळे. शेतामध्ये असंख्य सूक्ष्मजीव हे याच पालापाचोळ्यावर जगत असतात. त्यांना अन्न उरत नाही,

किंवा रसायनामुळे विषारी झाल्याने त्यांची वाढ खुंटते किंवा ते मरतात. त्यांना तितकी हालचाल शक्य असल्यास दुसरीकडे आश्रय घेतात. हे सर्व सूक्ष्मजीव, वाळवी, भुंगेरे, गांडुळे जमिनीला अधिक समृद्ध आणि सच्छिद्र करतात.

झाडांची वाळलेली मुळे, बुरशी आणि जिवाणू हे सर्व मातीच्या कणांना एकमेकांना चिटकून ठेवायला मदत करतात. गांडुळाच्या शरीरावरील चिकट श्‍लेष्मल पदार्थ, कीटकांच्या लाळेतील प्रथिने, त्यांच्या येण्याजाण्याच्या मार्गातील बिळांना आणि भुयारांना अगदी प्लॅस्टरसारखे लेपन करतात. हे सारे सूक्ष्म मार्ग पाणी खाली खडकांपर्यंत जाण्यासाठी मदत करतात.

आपल्या ठिबक सिंचनाच्या भाषेत बोलायचे तर मेन, सबमेन, लॅटरल, मायक्रोट्यूब तयार होतात. या सर्व नैसर्गिक रचनेमुळे पडलेल्या पावसाचा थेंब थेंब माती पिऊ शकते. तिने प्यायलेल्या पाण्यातील काही भाग खाली खडकांमध्ये जाऊन भूजल बनते.

या मरणासन्न मातीला सेंद्रिय खते व जिवामृताद्वारे पुन्हा जिवंत करता येईल. मात्र त्यासाठी भान हरपून रासायनिक बाबी वापरणाऱ्या आपल्यालाच आपण रोखले पाहिजे.

Water Management
Seena River : सीना नदीसह कुरुल कॅनॉलमध्ये पाणी सोडा

सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक (एस. आर.टी. टेक्निक)

मालेगाव, नेरळ (ता. कर्जत. जि. ठाणे) येथील चंद्रशेखर भडसावळे यांनी विकसित केलेले हे तंत्र‘पिकांची काढणी झाल्यावर बुडखे न् पेंढा जाळू नका’ हे सांगते. शेतीसाठी अनेक अंगानी फायदा देणारी ही पद्धत भूजल वाढीसही तितकीच अनुकूल आहे.

भूजल वाढीसाठी पाणलोट क्षेत्र विकास पद्धती जशी परिणामकारक आहे, तशाच प्रकारे सगुणा संवर्धित शेती पिकांचे उत्पादन घेतानाच विनाखर्च भूजल विकास साधला जातो. विशेषतः भात, कापूस, तूर, ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल, सोयाबीन, गहू, चवळी, पालेभाज्या, कांदा, हुलगा, कोबी, भेंडी, हरभरा इ. पिकांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे.

भातासाठी तर अधिकच. या पद्धतीने पिके घेतल्यास १. पिकाला पाणी कमी लागते. २. उत्पादन खर्च कमी येतो. ३. पीक उत्पादन उत्तम येते ४. महत्त्वाचे म्हणजे भूजल वाढते.

या तंत्रात भाताची रोपे न लावता बी थेट लावतात. म्हणजेच रोपवाटिका, चिखलणी आणि रोपांच्या पुनर्लागवडीची गरज नाही. पाणी तुंबवावे लागत नाही. मातीची धूप थांबते. मातीची कण रचनाही विस्कळीत होत नाही. पुढे भात काढणीवेळीही पिकाची मुळे, बुडखे जागेवर तशीच ठेवली जातात.

पेंढा, बुडखे जाळली जात नाहीत. पुढील वेळी त्यातच पुढील पीक विनामशागत किंवा कमी मशागतीसह बियांची टोकण करून घेतले जाते. अन्य पिकेही कायमस्वरूपी गादीवाफ्यावरच एका मागून एक फेरपालट करत घेतली जातात.

प्रत्येक पिकांची काढणी झाल्यानंतर बुडखे, मुळे तसेच ठेवतात. जीवन चक्र संपलेले असल्याने मुळे जमिनीत वाळून हळूहळू कुजत जातात. परिणामी, प्रत्येक पिकाचा हंगाम संपल्यावर जमिनीत सेंद्रिय कण वाढतच जातात.

सेंद्रिय कणांच्या वाढीमुळे जमिनीची जलधारणा क्षमता वाढते. सोबतच खाण्यासाठी सेंद्रिय पदार्थ भरपूर उपलब्ध असल्यामुळे सूक्ष्मजीवांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढते. परिणामी, पिकांची उत्पादकताही वाढत जाते.

मुळे वाळणे व कुजण्याच्या प्रक्रियेत त्यांचे आकारमान कमी झाल्याने जमिनीत पोकळ्या वाढतात. त्याचा पाणी मुरण्यासाठी फायदा होतो. पाणी मुरण्याचे प्रमाण जास्त राहून शेतातून वाहणारे पाणी कमी होते. पर्यायाने त्यासोबत होणारी मातीची धूपही कमी होते.

गावच्या शिवारातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे तंत्र वापरले तर परिसरातील भूजलात आपोआप वाढ होईल. सर्वांच्या शेतातले पाणी मुरेल जास्त आणि वाहील कमी. वाहत्या पाण्यासोबत होणारी मातीची धूप कमी होईल.

परिसरातील गाळाने भरणारे बंधारे व नद्यात जाणारा गाळही कमी होत जाईल. सगुणा संवर्धित शेती तंत्राने मातीचे आरोग्य, पिकांचे चांगले उत्पादन आणि त्यासोबतच भूजल पुनर्भरण साधेल. विशेषतः जिरायती शेतकऱ्यांसाठी तर हे तंत्रज्ञान वरदान ठरते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com