मनाची मशागत: प्रतिक्रिया आणि प्रतिसादात काय फरक असतो?

Psychology Update : मागील लेखात आपण स्वत:च्या विचारांची, स्वगताची जाण कशी वाढवायची, वेगवेगळे विचार ओळखून त्यांचे वर्गीकरण कसे करायचे ते पाहिले. उद्योजकता वाढवणारे, अष्टावधानी विचार ओळखायचे आणि वाढवायचे याचा सराव आपण करतो आहोत.
Reaction Response
Reaction ResponseAgrowon
Published on
Updated on

डॉ. आनंद नाडकर्णी

Reaction : आजवर आपण जे मनात येईल ते बिनधास्त बोलून टाकत होतो, येतील त्या विचारांच्या मागे भरकटत होतो. फार जाण नसताना, उत्स्फूर्तपणे जसे वाटेल तसे बोलणे, वागणे म्हणजेच प्रतिक्रिया (Reaction).

मात्र स्वगताची जाण आली, की आपण कुठले विचार फोकसमध्ये ठेवायचे ते निवडतो आणि त्याप्रमाणे विचार आणि वागणे घडते. स्वगताची जाण आल्यानंतरचे बोलणे, वागणे म्हणजे प्रतिसाद (Response). प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यांतला फरक एका उदाहरणातून समजून घेऊया.

समजा, द्राक्ष बागा पुढच्या आठवड्यात हार्वेस्ट होणार आहेत. पण आताच बातम्यांमध्ये आपण हवामानाचा अंदाज ऐकला की पुढील दोन दिवसांत अचानक, अनपेक्षितरीत्या पाऊस येईल.

ह्यावर ‘प्रतिक्रिया’ देणारी व्यक्ती काय करेल? तर नशिबाला, जागतिक हवामान बदलांना, हवामान खात्याला दोष देणे, हताश किंवा संतप्त होणे. मात्र जाणीवपूर्वक आपल्या विचारांकडे बघणारी व्यक्ती वाईट वाटून आणि काळजीपोटी अधिक माहिती मिळवणे, काय करता येईल यावर तज्ज्ञ लोकांशी बोलणे असा ‘प्रतिसाद’ देईल.

Reaction Response
Dr. Anand Nadkarni : विचारांचा स्वीकार म्हणजे काय?

प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यातील फरक अधिक विस्ताराने समजून घेऊ या. (इथे टेबल करावा. प्रतिक्रिया- प्रतिसाद)

प्रतिक्रिया (Reaction)

- सहज वृत्ती आहे, स्वाभाविकपणे प्रतिक्रियाच येते. मेंदूच्या रचनेत त्याची कारणे आहेत

- स्वतःच्या आणि इतरांच्या विचार व भावनांची जाण नसते. परिस्थितीची जाण कमी होते.

- पश्‍चात्ताप होईल असे वर्तन प्रतिक्रियेच्या भरात घडू शकते.

- इतरांचे दृष्टिकोन बदलण्याचे / त्यावर काही छाप पाडण्याचे सामर्थ्य नसते. (Influence)

- प्रतिक्रिया माणसाला उतावळा बनवते.

प्रतिसाद (Response)

- प्रतिसाद हे कौशल्य आहे, प्रयत्नपूर्वक शिकायला आणि वापरायला लागते.

- स्वतःच्या विचार व भावनेच्या बरोबरीने इतरांच्या विचार-भावनांची सुद्धा जाण असते. परिस्थितीची यथायोग्य जाण असते

- पश्‍चात्ताप होईल असे वर्तन घडण्याची शक्यता कमी असते.

- इतरांचे दृष्टिकोन बदलण्याचे / त्यावर काही छाप पाडण्याचे सामर्थ्य असते (Influence)

- काय बोलले पाहिजे, काय वागले पाहिजे, त्या वेळचे ध्येय काय आहे, परिस्थिती काय आहे ह्या सर्व गोष्टींचे भान असते. त्यामुळे प्रतिसादात मार्मिक उत्स्फूर्तता असते.

प्रतिक्रिया उतावळी असते, विचारांची छानबीन न करता आलेली! मात्र प्रतिसाद द्यायचा तर मध्ये थोडं थांबून स्वगताची चाचपणी करायला लागते. सरावाने हळूहळू प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद द्यायला सुरुवात होते. हा बदल व्हायला लागला की सुरुवातीला त्याचे काही तोटे देखील जाणवू शकतात, जसे की –

- संभाषणातील सहजता कमी झाली आहे असे वाटणे.

- प्रत्येक संवाद हा जपून, लक्षपूर्वक होतो; त्यामुळे तो कृत्रिम आहे असे वाटणे.

- आपल्या वागण्या-बोलण्यातील बदल इतर लोकांच्या लक्षात येणे आणि त्याबद्दल थोड्या नकारात्मक (कृत्रिम वागतोस, नेहमीसारखा नाहीस) अशा प्रतिक्रिया (कमेंट) येणे.

सुरुवातीला अशा नकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला त्रासदायक वाटू शकतील. ‘एवढे कष्ट का बुवा घ्यायचे?’ असंही वाटेल. तेव्हा काही गोष्टी आपण आपल्या स्वगतात स्वत:लाच सांगूया.

“स्वगताची सतत जाण ठेवणे, प्रतिसाद देणे हे एक कौशल्य आहे. कोणतेही नवे कौशल्य शिकताना सुरुवातीला त्यात सहजता नसतेच. कुटुंबीय म्हणत असतील, की आपल्या वागण्या-बोलण्यातील सहजता कमी झाली आहे तर ह्याचा अर्थ बदलास सुरुवात झाली आहे. म्हणजे खरं तर टीकेमागची प्रशंसाचं की ती!”

नव्याने सायकल किंवा बाईक चालवायला शिकलात तेव्हा अतिशय जपून आणि लक्षपूर्वक प्रत्येक कृती होत असते. वेग कमी असतो, इतर वाहनांकडे खूप जास्त लक्ष दिले जाते. पण एकदा अंगवळणी पडले की आपण गप्पा मारत, गाणी ऐकत आरामात सहजतेने सायकल किंवा बाईक चालवू शकतो!

Reaction Response
Dr. Anand Nadkarni : विचार म्हणजे काय?

मार्मिक आणि उत्स्फूर्त प्रतिसादाची इतिहासातील काही उदाहरणे -

राजाराम महाराजांचा जन्म

राजाराम महाराज जन्माला येताना पालथे जन्माला आले. मुलाचा पालथेपणी जन्म अपशकुनी समजला जाई. त्या समजुतीप्रमाणे, महाराजांच्या जन्मानंतर हा अपशकुन आहे, अशी सगळ्यांची लागलीच प्रतिक्रिया आली.

मात्र शिवाजी महाराज म्हणाले, “अरे, वाईट कशाला वाटून घेताय? हा तर संपूर्ण बादशाही पालथी पाडेल!” महाराजांनी उत्स्फूर्तपणे दिलेला हा प्रतिसाद किती मार्मिक होता! या प्रतिसादात इतरांचा दृष्टिकोन बदलण्याचे सामर्थ्य होते.

गोलमेज परिषदेत महात्मा गांधी

महात्मा गांधी गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले होते. इंग्लंडच्या राजाने सगळ्यांना चहापानासाठी बोलावले. गांधीजी नेहमीसारखेच त्यांच्या वेषात, म्हणजे एक पंचा कमरेला आणि थंडीसाठी पांघरलेली एक शाल असे आले होते. कार्यक्रम संपवून बाहेर पडताना पत्रकारांनी त्यांना घेराव घातला आणि एका पत्रकाराने त्यांना खवचटपणे विचारले, “मिस्टर गांधी, खुद्द राजाच्या भेटीला येताना तुम्हाला तुमचे कपडे जरा कमी आहेत असे नाही का वाटले?”

गांधीजी हसले आणि म्हणाले, “आम्हा दोघांनाही पुरतील एवढे कपडे राजानेच घातले होते!”

या उत्तरातील मर्म असे, की इंग्लंडच्या राजसत्तेने भारताकडून ओरबाडून सर्व वैभव स्वतःपाशी जमवले आहे.’

वरील दोन्ही उदाहरणातून काय दिसते? कठीण प्रसंगात, शिवाजी महाराज आणि गांधीजी दोघांकडे मार्मिक प्रतिसाद आणि त्याद्वारे इतरांचे मतपरिवर्तन करण्याचे सामर्थ्य होते.

कर्ता बनायचे तर आपला ठसा इतरांवर, समाजावर उमटावा यासाठी मतपरिवर्तन करण्याचे कौशल्य वापरणे खूप महत्वाचे!

उतावळी प्रतिक्रिया ते उत्स्फूर्त मार्मिक प्रतिसाद द्यायला शिकायचे, ते कौशल्य वाढवायचे तर खालील तीन गोष्टींवर सतत लक्ष द्यायला हवे. त्यातून स्वगताची जाण वाढायला मदत होईल आणि प्रतिक्रिया ते प्रतिसाद हा प्रवास करता येईल.

- परिस्थितीची जाण

- व्यक्तीबद्दलचा विचार

- माझे ध्येय नक्की काय आहे?

हे करताना स्वत:चा, स्वगताचा विचार करताना – ‘दाता’ म्हणवून घेणारा शेतकरी कंजूस किंवा स्वार्थी बनून जाईल का?

दाता (म्हणजे सगळेच देणारा) आणि कंजूस (म्हणजे काहीच न देणारा) ही दोन टोकं आहेत. ह्याचा सुवर्णमध्य म्हणजे उद्योजक.

व्यक्तिपरत्वे काय दान द्यावे यासाठी मदत करते ती विचारांची जाणच. एखाद्याला धान्य दान देता येईल, पण जर त्या व्यक्तीत धान्य उगवायची क्षमता आहे, तर त्याला धान्य देण्यापेक्षा बियाणे देणे अधिक योग्य ठरेल. कोणत्या व्यक्तीस कोणते दान योग्य राहील यांचे भान म्हणजे सत्पात्री दान!

परस्पर-नातेसंबंध (Co-operation) आणि परस्पर-अवलंबन (Interdependence)

माणूस प्रगत आणि बुद्धिमान असला तरी संपूर्ण, स्वयंभू नाही. आपण एका विशाल संपूर्णत्वाचा आणि स्वयंभूपणाचा भाग आहोत. जसे जंगलातील वृक्ष, वेली, वनस्पती वेगळ्या असतात तरी एकमेकांचा आदर करून एकत्र वाढतात. विविधतेतील सौंदर्य आणि सर्वांचे अस्तित्व टिकावे यासाठी जंगलाचे काही नियम असतात. सौहार्दपूर्ण नातेसंबंध आणि सह-अस्तित्व यासाठी हे नियम जंगलाकडून शिकण्यासारखे आहेत.

सगळी माणसे जीवशास्त्रीयदृष्ट्या ‘माणूस’ या एकाच प्रजातीतील असली तरी प्रत्येक जण वेगवेगळा आहे. प्रत्येक जण शरीराने वेगळा आहे, प्रत्येकात वेगवेगळ्या क्षमता आहेत. या सर्व क्षमता जगण्यास आवश्यक आणि उपयुक्त आहेत. वेगवेगळ्या क्षमतांमुळे आपण एकमेकांवर अवलंबून आहोत.

मी दुसऱ्याला उपयुक्त आहे आणि दुसरा मला. रोग निदान आणि उपचारासाठी शेतकरी डॉक्टरवर अवलंबून आहेत तर डॉक्टर अन्नधान्य उत्पादनासाठी शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. आपल्याकडे काही कौशल्ये असतील आणि इतरांकडे काही वेगळी. आपण जर एकमेकांना पूरकपणे उपयोगी पडत राहिलो, तर त्यामुळे फायदा तर आहेच पण नातंही (परस्पर नातेसंबंध) सुधारेल.

Reaction Response
Pandharpur Development Plan : विकास आराखड्यात भावनांचा विचार करा

अशा वेगळेपणाचा आदर बाळगणे हे उद्योजकाचे वैशिष्ट्य आहे. परस्पर उपयुक्तता आणि परस्पर नातेसंबंध या दोन गोष्टी जीवनाचा भाग बनवणे गरजेचे आहे. आपल्या सर्वांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या कौशल्यांचा फायदा एकमेकांच्या प्रगतीसाठी करणे महत्त्वाचे आहे.

परस्पर उपयुक्तता आणि परस्पर नातेसंबंध या प्रतिक्रियेकडून प्रतिसादाकडे जाण्याच्या दोन किल्ल्या आहेत.

परस्परनातेसंबंध आणि परस्पर उपयुक्तता या दोन गोष्टींची जाणीव आपण कुटुंबात, भावकीमध्ये, पंचायतीत, शिवारात अगदी सगळीकडे ठेवायला हवी.

संशोधन आणि शब्दांकन: डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी

kartashetkari@gmail.com

आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –

https://www.youtube.com/watch?v=Tkwv3ziVQbY&t=10s

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com