River Pollution: ‘गंगेच्या मावशी’ची अवस्था काय? नद्यांच्या आरोग्यावर मोठा प्रश्‍नचिन्ह

Ganga River Crisis: पूर्वी गाव जवळ आल्याचे संकेत होते उंच टाक्या, आता मात्र नाकात जाणाऱ्या दुर्गंधीने हे समजते. नद्यांचे आरोग्य दिवसेंदिवस ढासळत असून, भाविकता आणि दांभिकतेच्या सीमारेषा धूसर होत चालल्या आहेत. कुंभमेळा आणि धार्मिक विधींमुळे नद्यांकडे लक्ष वेधले जात असले, तरी त्यांची स्वच्छता आणि अस्तित्व रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत का?
Ganga River
Ganga RiverAgrowon
Published on
Updated on

River Conservation: पूर्वीची जवळपास ‘पाण्याची उंच टाकी’ दिसली, की गाव जवळ आल्याचे लक्षात यायचे. आता उग्र भपकारा नाकात गेला की गाव जवळ आल्याचे लक्षात येते, कारण अशाच दर्जाचे पाणी घेऊन सर्वच गावा-शहरांमधून नद्या वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर नद्यांच्या काठावर साजरे होत असलेले मेळे, उत्सव यांच्यामध्ये भाविकता जास्त आहे की दांभिकता, असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही.कुंभमेळ्याचा एक फायदा असा, की या निमित्ताने तरी आपण नद्यांच्या पात्रात जातो. एरवी त्यांच्याकडे ढुंकूनही बघायला आपल्याला वेळ नसतो.

सचिनशी बराच वेळ संपर्क होत नव्हता. संपर्क झाला तेव्हा म्हणाला, ‘‘उज्जैनला आहे. प्रयागराजला गेलो होतो, येताना उज्जैन करून येतोय.’’ सचिन माझा मित्र. सचिनप्रमाणेच संपर्कातले अनेक जण महाकुंभमेळ्याचा मुहूर्त साधत प्रयागराजला गेले आणि गंगेत डुबकी मारून आले. तिथली गर्दी, वाहतूक कोंडी, राहण्याची गैरसोय अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या; पण १४४ वर्षांतून येणारा महाकुंभचा योग साधल्याच्या तुलनेत या गोष्टींबद्दल त्यांची फारशी तक्रार नव्हती. त्याबाबत ते समाधानीच होते.

कुंभमेळ्याचा संबंध विशिष्ट काळानंतर येणाऱ्या ग्रहगोलांच्या स्थितीशी आहे, तसाच तो नद्यांशी सुद्धा आहे. म्हणून तर कुंभमेळा नद्यांच्या काठी भरतो आणि विशिष्ट मुहूर्तांवर नद्यांमध्ये डुबकी मारण्यासाठी गर्दी केली जाते. प्रयागराजला गंगेत डुबकी मारण्याचा पावित्र्याशी संबंध आहे, ही भाविकांची श्रद्धा. पण आपल्या पावित्र्याप्रमाणे नद्यांच्या पावित्र्याचे काय? हा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. किंबहुना, नद्या पवित्र (शुद्ध व स्वच्छ या अर्थाने) राहिल्या तर आपल्यालाही अधिक पवित्र होता येईल. पण प्रत्यक्षात संपूर्ण देशभरातील नद्यांची स्थिती विपरीत आहे. दरवर्षी नियमितपणे प्रसिद्ध होत असलेले अहवाल यावर भाष्य करतात. गंगेच्या शुद्धतेबद्दल नेहमीच चर्चा होत असते; पण सध्या तो आपला प्रांत नाही. तिच्या खोऱ्यातल्या लोकांची ती जबाबदारी. ते तिचं पाहून घेतील. आपण आपल्या नद्यांचे पाहू. आपल्याला मिळणारे पाणी, आरोग्य आणि दैनंदिन जीवनासाठी त्या महत्त्वाच्या आहेत.

Ganga River
River Pollution : नीरा नदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

आपण सांस्कृतिक संदर्भात गंगा-यमुना यांना अधिक पवित्र मानत आलो आहोत आणि त्यांना तसे महत्त्वही देत आलो आहोत. म्हणून तर ‘गंगाजला’ला देव्हाऱ्यात स्थान मिळते. त्या तुलनेत आपल्या गावातल्या, शहरातल्या नदीबद्दल आपल्याला फारसे देणे-घेणे नसते. तसे असते तर त्यांच्या स्थितीबद्दल आपल्याला काळजी असती आणि त्या स्वच्छ राहाव्यात, वाहत्या राहाव्यात म्हणून आपण कृतीसुद्धा केली असती. पण आपण म्हणायला काहीही म्हणत असलो तरी आपल्या त्यांच्याबद्दल काय भावना आहेत, हे प्रत्यक्ष नद्यांच्या अवस्थेवरूनच समजते.

आपल्या नद्या जास्त प्राचीन

गंगा, यमुना यांना पवित्र जरूर मानावे. कारण त्या त्यांच्या खोऱ्यातील मोठ्या लोकसंख्येला, शेतीला पाणी पुरवतात. तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाला त्यांनी आकार दिला आहे. पण या नद्यांकडे जाताना आपल्या नद्यांबद्दलची एक वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. ती बहुतांश मंडळींना ठाऊक नसते. ती म्हणजे- आपल्या महाराष्ट्रातल्या, सह्याद्रीतल्या नद्या या गंगा-यमुना यासारख्या उत्तर भारतातल्या नद्यांच्या तुलनेत जास्त जुन्या आहेत. इतक्या की त्यांना ‘गंगेच्या मावश्या’ म्हणावे लागेल. त्याचे कारण या नद्या जिथून उगम पावतात, त्या भूभागांच्या, खडकांच्या निर्मितीशी संबंधित आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भूभागावर काळा कातळ (बेसॉल्ट) आढळतो. आपल्या नद्या याच खडकाच्या डोंगरांवरून उगम पावतात आणि याच खडकातून वाट काढत वाहतात. या खडकाची निर्मिती सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर या नद्यांची निर्मिती झाली आणि त्या वाहायला लागल्या.

गंगा-यमुना यासारख्या नद्यांबद्दल बोलायचे तर त्यांचा उगम हिमालय पर्वतातून होतो. पण आपल्या सह्याद्रीच्या तुलनेत हिमालय खूप तरूण आहे. म्हणजे त्याची निर्मिती पाच-साडेपाच कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली. त्याला बऱ्यापैकी आकार आला तो सर्वसाधारणपणे चारेक कोटी वर्षांपूर्वी. आणि त्यातून उगम पावणाऱ्या नद्या हिमालयाच्या निर्मितीनंतरच्या. म्हणूनच वयाचा विचार केला तर आपल्या नद्या गंगा-यमुना आणि हिमालयातील इतर नद्यांपेक्षा कितीतरी आधीच्या ठरतात. त्या दृष्टीने गंगेच्या मावश्या, काक्या, आत्या ठरतात.

अर्थात, कोणतीही नदी इतरांपेक्षा जास्त महत्त्वाची किंवा कमी महत्त्वाची ठरत नाही. ती लांबीने किंवा पाण्याच्या प्रवाहाने लहान असो वा मोठी, तिच्या खोऱ्यातील जनजीवन आणि सर्वच जीवांसाठी तितकीच महत्त्वाची असते. या दृष्टीने आपल्या नद्यांकडे पाहिले तर त्यांना सुस्थितीत ठेवणे, टिकवणे महत्त्वाचे आणि आवश्यक ठरते. पण प्रत्यक्षात आपण नद्यांशी तसा व्यवहार करतो का?

Ganga River
River Conservation : नीती नद्या वाचविण्याची!

सगळा भर कर्मकांडांवर

कुंभमेळ्याला गर्दी करणे, नद्यांना माता म्हणणे, त्यांना फुले वाहणे, त्यांच्या पाण्याने आचमन करणे यात आपण धन्यता मानतो. पण याच्या जोडीने त्यांना स्वच्छ ठेवण्याची, त्यांच्यावर अतिक्रमण न होऊ देण्याची आणि त्यांचे शोषण न करण्याची काळजी घेतली तरच आपली त्यांच्याविषयी खरी भावना काय आहे, ते स्पष्ट होईल. याबाबतीत आपण सपशेल नापास ठरतो. परिणामी, आपण कुंभमेळा किंवा इतर निमित्ताने नद्यांचे गोडवे गातो आणि वर जे काही करतो, ते केवळ आणि केवळ कोरडे कर्मकांड ठरते. नद्यांप्रति श्रद्धेचे प्रदर्शन मांडणे आणि त्यांचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे यात मोठे अंतर असते... या संदर्भात महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत नद्यांच्या पात्रांत मी प्रत्यक्ष केलेला प्रवास आठवतो.

नद्यांचे ऱ्हासपर्व

ते २००८ वर्ष होते. नद्यांची सद्यःस्थिती आणि त्यांचा एकूणच जनजीवनावर झालेला परिणाम जाणून घेण्यासाठी मी उभा-आडवा महाराष्ट्र पालथा घातला. कोकणापासून ते विदर्भापर्यंत आणि धुळ्यापासून ते कोल्हापूरपर्यंत अशा सर्वच भागांतील नद्या फिरलो. केवळ मोठ्या नद्याच नव्हे, तर त्यांच्या उपनद्या, त्यांना मिळणारे ओढे-नाले हे सारे पाहताना प्रत्यक्ष नद्यांची स्थिती अनुभवता आली. त्या दृष्टीने सर्वच भागांतील नद्यांच्या समस्यांमध्ये एक समान सूत्र असल्याचे पाहायला मिळाले. मोठी शहरे असोत वा नव्याने वाढणारी गावे; सर्वच प्रकारची वस्ती वाढत असताना पहिल्यांदा बळी जातो तो नैसर्गिक जलस्रोतांचा- नद्यांचा, ओढ्यांचा, नाल्यांचा आणि तळी-तलावांचा. इतकेच नव्हे तर आधीच्या पिढ्यांमध्ये नद्यांच्या पुराचे पाणी सामावून घेण्यासाठी व्यवस्था होत्या. सांगलीच्या पट्ट्यात त्या ‘ओत’ म्हणून पाहायला मिळायच्या, तर मुंबईत ‘अॅब्झॉर्बिंग पॉन्ड्स’च्या रूपात असायच्या. वाढत्या लोकवस्तीच्या विस्तारात त्यांचा बळी गेला. लहान-मोठे प्रवाह बुजवण्यात आले. नद्यांची पात्रे आक्रसून टाकली. पाणथळ जागांवर भर टाकून त्या सपाट करण्यात आल्या.

एकीकडे हे सुरू असतानाच वाढलेल्या शहरांचे वाढलेले सांडपाणी नद्यांच्या पात्रातच जिरायला लागले. मग त्यांचे रूपच बदलले. आधी झरे काढून पाणी पिणारी आणि अंघोळीसाठी पात्रांमध्ये निर्धोकपणे जाणारी माणसं, आता नदीपात्रात पाय घालायलाही कचरायला लागली. औद्योगिक वसाहतींनी त्यांच्या दुरवस्थेत भर टाकलीच, पण त्यांच्याकडे बोट दाखवून शहरे आणि नागरी वस्ती नामानिराळी राहिली. प्रत्यक्षात उद्योगांवर नियंत्रण आणणे ठरवले तर शक्य तरी आहे, पण शहरांमुळे होणारे जलप्रदूषण हे अवघड जागचे दुखणे बनले आहे. त्याच्याकडे ना दुर्लक्ष करता येते, ना नियंत्रण मिळवता येते.याच्या जोडीने वाळूउपसा, मातीसाठी काठ कोरणे अशा अनेक व्याधींनी नद्या पोखरल्या गेल्या. या सर्वांचा परिपाक म्हणून नद्यांची अवस्था आतासारखी न होती, तरच नवल! हे सारे कमी होते म्हणून की काय, आता नदीसुधारणेच्या नावाखाली त्यांच्या पात्रात बांधकामे करून सिमेंट-काँक्रीट ओतले जात आहे. त्यात सुधारणा कमी आणि वरवरचे दिखाऊ सुशोभीकरण जास्त, असे चित्र आहे. यावरून कोणालाही शंका येईल ती, प्रत्यक्षात नद्या सुधारण्याऐवजी त्यांचा वापर आता कॉन्ट्रॅक्टर्सची धन करण्यासाठी केला जात आहे का?... आणि कागदावर काहीही रंगवले, दाखवले तरी आताच्या कर्त्याधर्त्यांना या शंकेचे समाधानकारक उत्तर देता आलेले नाही. पुढे या नद्यांचा प्रवास कोणत्या दिशेने होत आहे याची यावरून कल्पना येईल.

भाविकता की दांभिकता?

पूर्वीची जवळपास ‘पाण्याची उंच टाकी’ दिसली की गाव जवळ आल्याचे लक्षात यायचे. आता उग्र भपकारा नाकात गेला की गाव जवळ आल्याचे लक्षात येते, कारण अशाच दर्जाचे पाणी घेऊन सर्वच गावा-शहरांमधून नद्या वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर नद्यांच्या काठावर साजरे होत असलेले मेळे, उत्सव यांच्यामध्ये भाविकता जास्त आहे की दांभिकता? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

कुंभमेळ्याचा एक फायदा असा की या निमित्ताने तरी आपण नद्यांच्या पात्रात जातो. एरवी त्यांच्याकडे ढुंकूनही बघायला आपल्याला वेळ नसतो. आता पात्रात जातच आहोत, तर त्यांची स्थिती कशी सुधारेल याकडेही लक्ष दिले, तर कदाचित जास्तीचे पावित्र्य पदरात पाडून घेता येईल!

abhighorpade@gmail.com(लेखक वरिष्ठ पत्रकार असून ‘भवताल’ या पर्यावरण विषयक मंचाचे संस्थापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com