
Agriculture Pest Management: आग्नेय आशियामध्ये भात हे मुख्य पीक असून, त्यावरील किडींचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या ठरत आहे. अशा स्थितीमध्ये वटवाघळे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकत असल्याचा दावा थायलंडमधील लेईब्निज इन्स्टिट्यूट फॉर झू अॅण्ड वाइल्डलाइफ रिसर्च (एलआयझेडडब्ल्यू) आणि दि प्रिन्स ऑफ सांगक्ला युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यांच्या मते सुरकुतलेल्या तोंडाची, मुक्त
शेपटीची वटवाघळे (Wrinkle-lipped free-tailed bats) अन्नाच्या शोधामध्ये केवळ दूर अंतरच पार करत नाहीत, तर जमिनीपासून १६०० मीटर उंचीपर्यंत जाऊनही भातातील तुडतुड्यांचा फडशा पाडतात.
भात हे जगभरातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येचा मुख्य अन्न आहे. त्यांच्या अन्नसुरक्षेसाठी आग्नेय, दक्षिण आणि पूर्व एशियन प्रदेशातील भात उत्पादन ही महत्त्वाची भूमिका निभावते. या भात पिकाचे तुडतुड्यांच्या काही प्रजाती मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. ही कीड ३०० ते १००० मीटर उंचीवरील वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासोबत मोठे अंतर पार करते. अति उंचावरील वातावरणामध्ये कीडनियंत्रणाच्या पारंपरिक फवारणीसारख्या पद्धती तितक्या कार्यक्षम ठरत नाहीत.
कारण फवारणीवेळी तुडतुडे उड्या मारून आपली जागा सोडून जातात. त्यामुळे फवारणीचे द्रावणापासून बऱ्यापैकी बचाव करू शकतात. दक्षिण आणि पश्चिम आशियातील अन्न सुरक्षेच्या दृष्टीने भात उत्पादन वाचविण्यामध्ये सुरकुतलेल्या तोंडाची, मुक्त शेपटीच्या वटवाघळांची (शा. नाव - Mops plicatus) भूमिका लक्षणीयरीत्या महत्त्वाची ठरणार असल्याचे मत लेईब्निज इन्स्टिट्यूट फॉर झू अॅण्ड वाइल्डलाइफ रिसर्च (एलआयझेडडब्ल्यू) मधील उत्क्रांती पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. ख्रिस्तियन वोग्ट यांनी व्यक्त केले आहे.
ही वटवाघळांची प्रजाती अति उंचावरील पिकामध्ये व वाहत्या वाऱ्यामध्येही किडींची शिकार करण्यामध्ये कार्यक्षम असल्याचे आमच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रजातींचे संरक्षण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांचा हा लेख ओइकोलॉजिया या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
वटवाघूळ प्रजातीच्या खाद्य सवयी
सुरकुतलेल्या तोंडाची, मुक्त शेपटीच्या वटवाघळांची (शा. नाव - Mops plicatus) ही जात आग्नेय आशियामध्ये आढळते. मोठ्या गुहांमध्ये असलेल्या त्यांच्या वसाहतीमध्ये हजार ते दशलक्षांपर्यंत संख्या असू शकते. नुकत्याच झालेल्या अभ्यासात ही वटवाघळे भातातील तपकिरी तुडतुडे (शा. नाव - Nilaparvata lugens) आणि पांढऱ्या पाठीचे तुडतुडे (शा. नाव - Sogatella furcifera) यांचा फडशा पाडत असल्याचे दिसून आले. थायलंडमध्ये सामान्य उंचीवरील भात शेतीत तुडतुडे वाढतात व पुनरुत्पादन करतात. पुढे ते वाऱ्यासोबत अति उंचीवरील भात शेतामध्येही शिरकाव करतात. संपूर्ण भात उत्पादनावर विपरीत करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.
या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी मध्य थायलंडच्या लोपबुरी प्रांतातील एका गुहेतील काही प्रौढ वटवाघळे पकडली. त्यांच्या पाठीवर त्वचेवर ०.९५ ग्रॅम वजनाचे जीपीएस लॉगर विशिष्ट चिकटद्रव्याने चिकटले. हे लॉगर दर दहा मिनिटाने वटवाघळांची जागा व स्थिती त्रिमितीय पद्धतीने नोंदवत होते. त्यानंतर काही दिवसांनी ती काढून त्यावरील माहिती तपासली. त्याविषयी माहिती देताना डॉ. ख्रिस्तियन वोग्ट यांनी सांगितले, की या जीपीएसच्या नोंदीचे विश्लेषण केले असता या वटवाघळांचा खाद्यासाठी केल्या जाणाऱ्या भ्रमंतीचे क्षेत्रफळ १७४३ वर्ग कि.मी. इतके मोठे (साधारणतः बर्लिन शहराच्या दुप्पट) असल्याचे स्पष्ट झाले.
ज्या पृष्ठवंशीय सजीवाचे वजन केवळ १८ ग्रॅम आहे, त्याने केलेली व आजवर नोंदवलेली सर्वांत मोठी भ्रमंती ठरते. काही वटवाघळांनी तर एका उड्डाणामध्ये गुहेपासून २०० किमी पर्यंत फिरस्ती केली. एका संपूर्ण रात्रीत ते सलग ११.५ तास उड्डाण करत होते. त्यातही त्यांच्या उड्डाणातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक काळ जमिनीपासून १५० मीटरपेक्षा जास्त उंचीवर फिरत असले, तरी अनेक वेळा त्यांनी गाठलेली कमाल उंची १६०० मीटरपेक्षा अधिक होती.
संवर्धनासाठी रहिवास महत्त्वाचे
भातशेतीमधील कीडनियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वटवाघळांच्या संवर्धनासाठी त्यांचे नैसर्गिक रहिवास, विश्रांतीच्या जागा या सुरक्षित करण्याची आवश्यकता आहे. सध्या या लक्षावधी वटवाघळांच्या रहिवासाची जागा ही केवळ १२ मोठमोठ्या गुहांमध्ये आहे. या गुहांना माणसांचा, पर्यटकांचा होणारा त्रास रोखणे अत्यावश्यक आहे. या वटवाघळांचा केवळ मध्य थायलंडमधील शेतकऱ्यांनाच फायदा होतो असे नाही तर चीन, कोरिया आणि जपानमधील भातशेतीलाही फायदा होत असल्याचे या संशोधनाचे सहलेखक प्रो. सारा बुमरुंगस्री यांनी सांगितले.
Mops plicatus प्रजातीच्या वटवाघळांनी खाद्यासाठी केलेली हवेतील भ्रमंती, रहिवासाची व खाद्याची निवड याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. ही वटवाघळे भातशेतीचीच (ती अन्य पिकांपेक्षा फार दूरवर असली तरीही) खाद्य मिळविण्यासाठी निवड करतात. त्यामुळे भातशेतीमध्ये प्रादुर्भाव करणाऱ्या तुडतुड्यांसारख्या किडींचा फडशा पाडतात, हे सिद्ध झाले.
डॉ. सुपवान स्रिलोपान, शास्त्रज्ञ, प्रिन्स ऑफ सांग्कोला युनिव्हर्सिटी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.